Sunday, April 28, 2024
Homeराज्यरेशन कार्ड धारकांची संख्या कमी करण्यास विरोध - मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आक्रमक,...

रेशन कार्ड धारकांची संख्या कमी करण्यास विरोध – मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आक्रमक, राज्यव्यापी आंदोलनाची हाक

मुंबई : सणाच्या तोंडावर पुरेसे धान्य रेशनमधून पुरवा. रेशन कार्ड धारकांची संख्या कमी करण्यास विरोध करत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने आक्रमक भूमिका घेतली असून राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली असल्याची माहिती माकपचे राज्य सचिव डॉ. उदय नारकर यांनी दिली.

दसरा दिवाळीच्या तोंडावर जनतेला सण साजरा करण्यासाठी स्वस्त धान्य दुकानांतून पुरेसा गहू आणि तांदळाव्यतिरिक्त साखर, तेल, रवा, मैदा, गूळ आदी धान्ये आणि पदार्थ पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून दिले पाहिजेत, या मागणीसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष राज्यव्यापी आंदोलन करणार असल्याचा ठराव पक्षाच्या महाराष्ट्र राज्य कमिटीमध्ये मंजूर करण्यात आला. नव्या मुंबईतील बेलापूर येथे पक्षाचे पॉलिट ब्यूरो सदस्य डॉ. अशोक ढवळे आणि निलोत्पल बसू यांच्या विशेष उपस्थितीत झालेल्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी राज्य सचिवमंडळ सदस्य कॉ. विजय गाभणे होते.

गोरगरिबांनाही दसरा दिवाळी साजरा करण्याचा अधिकार आहे. पण सरकारच्या धोरणामुळे महागाई वाढल्याने गरिबांना सण साजरा करणे मुश्कील झाले आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने खाद्यान्नावर जीएसटी लावून महागाईच्या आगीत तेल ओतले आहे. त्यामुळे गोरगरिबांच्या अन्नात भाजपचे मोदी सरकार विष कालवत आहे. महाराष्ट्रातील जनतेने याला कसून विरोध केला पाहिजे, असे आवाहन पक्षाने केले आहे.

सरकारतर्फे तथाकथित स्वेच्छेने रेशनचा अधिकार सोडून देण्याची मोहीम राबवली जात आहे. रेशन लाभधारकांची संख्या वाढवण्याची गरज असताना सरकार गरिबांच्या डोक्यावरील अन्न सुरक्षेचे छत्र काढून घेऊ पहात आहे, असा आरोप करत याचा माकपने तीव्र निषेध केला आहे.

या धोरणाच्या विरोधात आणि वरील मागणीसाठी १४ सप्टेंबर रोजी राज्यभरात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष जिल्हाधिकारी आणि तहसिल कार्यालयांवर मोर्चे काढणार आहे. तसेच २३ सप्टेंबर रोजी विभागीय आयुक्त कार्यालयांवर मोर्चे काढण्यात येणार आहेत.

१४ आणि २३ सप्टेंबरच्या या आंदोलनात कामगार, शेतकरी, शेतमजूर, महिला, विद्यार्थी आणि युवकांनी मोठ्या प्रमाणात सामील व्हावे, असे आवाहन माकपने केले आहे.

Lic
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय