Friday, May 10, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडगिर्यारोहकांचा केंद्र व राज्य सरकारने सन्मान करून प्रोत्साहन द्यावे - खा. छत्रपती...

गिर्यारोहकांचा केंद्र व राज्य सरकारने सन्मान करून प्रोत्साहन द्यावे – खा. छत्रपती युवराज संभाजीराजे

“सागरमाथा : गाथा एव्हरेस्टच्या विजयाची” या एव्हरेस्टवीर श्रीहरी तापकीर यांच्या पुस्तकाचे खा. छत्रपती युवराज संभाजीराजे यांच्या हस्ते प्रकाशन.

पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : दि.२४
– एव्हरेस्टसारख्या शिखरावर चढाई करणे ही एक प्रकारची लढाईच आहे. कसलेल्या गिर्यारोहकांची जन्म मरणाची ही कसोटी असते, त्यामध्ये यशस्वी झालेल्या गिर्यारोहकांचा केंद्र व राज्य सरकारने सन्मान करून त्यांना प्रोत्साहन द्यावे यासाठी आपण सरकार दरबारी पाठपुरावा करणार असल्याचे प्रतिपादन खासदार छत्रपती युवराज संभाजीराजे यांनी केले. खासदार छत्रपती युवराज संभाजीराजे यांच्या हस्ते चऱ्होली येथे रविवारी एव्हरेस्टवीर श्रीहरी अशोक तापकीर यांच्या “सागरमाथा – गाथा एव्हरेस्टच्या विजयाची” या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ गिर्यारोहक ऋषीकेश यादव, महाराष्ट्रातील पहिले एव्हरेस्टवीर सुरेंद्र चव्हाण, ज्ञान आशा फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. अमित आंद्रे, ज्ञानेश्वर तापकीर, माजी महापौर नितिन काळजे, साहित्यिक व कामगार नेते अरूण बोऱ्हाडे आदी यावेळी उपस्थित होते.



उपस्थितांशी संवाद साधताना खा. छत्रपती युवराज संभाजीराजे म्हणाले की, या साहसी क्रीडा प्रकारची शासकीय पातळीवर दखल घेतली जात नाही, हीच मोठी खंत आहे. वास्तविक गिर्यारोहण हे सामान्य व्यक्तीच्या कुवतीचे नाही. एव्हरेस्ट शिखरावर जाऊन भारताचा राष्ट्रध्वज उंचावणाऱ्या या खेळाडूंचा यथोचित सन्मान केंद्र व राज्य सरकारने करायला हवा. एवढेच नाही तर, त्यांना प्रोत्साहन देण्याची कायमस्वरूपी योजना असायला हवी. यासाठी आपण स्वतः पाठपुरावा करू. भारतातील इतर राज्यामध्ये एव्हरेस्टवीर अथवा इतर मोहिमवीर गिर्यारोहकांना भरीव आर्थिक मदत देण्यात येते, ती व्यवस्था महाराष्ट्रात नसावी, उलट शासनाने या साहसी खेळाचा समावेश पर्यटनामध्ये केला आहे याविषयी आश्चर्य व्यक्त करून खा. संभाजीराजे यांनी यासाठी आपण गिर्यारोहकांच्या पाठीशी सदैव उभा राहीन, असे स्पष्ट केले. सागरमाथा हे पुस्तक हे केवळ गिर्यारोहकांनाच नव्हे तर आव्हानात्मक काम करणाऱ्या प्रत्येकाला मार्गदर्शक ठरेल असेही ते म्हणाले.

यावेळी सागरमाथा गिर्यारोहण संस्थेचे आणि ज्ञान आशा फाउंडेशनच्या संकेतस्थळांचे खा. संभाजीराजे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. यावेळी बोलताना महाराष्ट्रातील पहिले गिर्यारोहक सुरेंद्र चव्हाण यांनी श्रीहरी चे कौतुक करताना सामान्य शेतकरी कुटुंबातील हा युवक जिद्द, चिकाटी आणि प्रखर आत्मविश्वास याच्या बळावर जगातील सर्वोच्च शिखरावर चढाई करून थांबला नाही, तर आपल्या अनुभवाची शिदोरी नवीन गिर्यारोहकांना देत राहिला, असे गौरवउद्गार काढले. यावेळी अध्यक्ष हृषिकेश यादव यांनी श्रीहरी तापकीर यांच्या पुस्तकातून प्रत्येक युवकाला जीवनातील कठीण प्रसंगाला धैर्याने सामोरे जाण्याचे मानसिक बळ मिळेल असा विश्वास व्यक्त केला. श्रीहरी तापकीर, नितीन काळजे, ज्ञानेश्वर तापकीर, अमित आंद्रे यांनीही मनोगत व्यक्त केले.

सागरमाथा गिर्यारोहण संस्था आणि ज्ञान – आशा फाउंडेशन या संस्थांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमात महाराष्ट्रातील नामवंत एव्हरेस्टवीर सुरेंद्र चव्हाण, शरद कुलकर्णी, किशोर धनकुडे, भगवान चवले, लहू उघडे आणि सुविधा कडलग या गिर्यारोहकांचा सन्मान करण्यात आला. तसेच दिवंगत गिर्यारोहक रमेश गुळवे आणि श्रीहरी तापकीर यांच्या माता पित्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास गिर्यारोहण क्षेत्रातील मान्यवरांसह ज्ञानेश्वर मोळक, बी. आर. मेहता, बाळासाहेब पाटील, विनायक खोत, निलेश गावडे, ब. हि. चिंचवडे, यश मस्करे, विलास मडेगिरी, विनया तापकीर, सुवर्णा बुर्डे, सचिन तापकीर, कुणाल तापकीर, संदीप तापकीर, सागरमाथा संस्थेचे अध्यक्ष प्रवीण हरपळे, सुमित दाभाडे, पांडुरंग शिंदे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक अरुण बोऱ्हाडे, सूत्र संचालन नाना शिवले आणि प्रशांत पवार यांनी आभार मानले.

हे ही वाचा :

धक्कादायक : मणिपूर हिंसाचारात स्वातंत्र्यसैनिकाच्या 80 वर्षीय पत्नीला जमावाने जिवंत जाळले

पत्नीसह पुतण्याची गोळी झाडून हत्या केल्यानंतर पोलिस अधिकाऱ्याची आत्महत्या

धक्कादायक : गेल्या सहा महिन्यांत तब्बल 87 हजार लोकांनी सोडले भारताचे नागरिकत्व

अक्षय कुमार आणि आलिया भारतात राहु शकतात तर मी का राहु शकत नाही, सीमा हैदरची राष्ट्रपतींकडे दया याचिका

विदर्भ : नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करून, स्थलांतरित नागरिकांना सर्व सुविधा पुरवा !

विशेष लेख : इर्शाळवाडी सारख्‍या दुर्घघटनांना मानवी हस्‍तक्षेपही कारणीभूत

सुवर्णसंधी ! सरकारी रुग्णालयात 14,000 पदभरती !

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय