Friday, November 22, 2024
HomeAkoleशाळा संगणकीकृत करण्यासाठी शिंदे दांपत्य देत असलेले योगदान मोलाचे – एकनाथ मेंगाळ

शाळा संगणकीकृत करण्यासाठी शिंदे दांपत्य देत असलेले योगदान मोलाचे – एकनाथ मेंगाळ

अकोले : दुर्गम व वंचित भागातील सातवी पर्यंतच्या शाळा संगणकीकृत करण्यासाठी सुविधा शिंदे व संदेश शिंदे यांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. पहिली ते सातवीच्या संगणक नसलेल्या शाळांमध्ये संगणक पोहचविण्याचे अत्यंत प्रेरणादायी काम शिंदे दांपत्याने हाती घेतले आहे. आदिवासी वाड्यांवरील विद्यार्थ्यांना यामुळे संगणक शिक्षणाचे दार उघडले जात आहे. शहरात नोकरीसाठी गेलेल्या गावोगावच्या नागरिकांनी शिंदे दांपत्याप्रमाणे जनसेवेचा वसा हाती घेतला तर वंचितांना शिक्षण उपलब्ध करून देण्यात मोठी क्रांती झाल्या शिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन डेमोक्रेटिक युथ फेडरेशनचे जिल्हा अध्यक्ष व समशेरपूर गावाचे लोकनियुक्त सरपंच एकनाथ मेंगाळ यांनी केले. समशेरपूर येथील देवाचीवाडी शाळेला संगणक प्रदान कार्यक्रमात ते बोलत होते. 

शिंदे दांपत्याने आजवर अकोले तालुक्यातील १२, संगमनेर तालुक्यातील ४ व वेल्हे तालुक्यातील शाळांना मोफत संगणक दिले आहेत. अकोले तालुक्यातील विठे केंद्रातील सर्व शाळांना संगणक उपलब्ध करून देऊन हे केंद्र संपूर्णपणे संगणकीकृत करण्यात आले आहे. सुविधा शिंदे या अकोले तालुक्यातील सामाजिक चळवळीत मोलाचे योगदान दिलेल्या कॉम्रेड झुंबरनाना नवले यांच्या नात व धुमाळवाडी येथील स्व.श्री.विलासराव धुमाळ यांची कन्या आहेत. संदेश शिंदे हे नारायणगाव येथील प्रयोगशील शेतकरी गिरीषजी शिंदे यांचे चिरंजीव आहेत. दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना संगणक शिक्षणाची दारे उघडून देण्यासाठी ‘मिशन आपुलकी’ अंतर्गत ते स्वखर्चातून हा उपक्रम राबवीत आहेत. स्वत: वाड्यावस्त्यांवर जाऊन प्रत्येक शाळेत संगणक इंस्टोल करून देण्याचे अत्यंत परिश्रमाचे काम शिंदे दांपत्य स्वत: करत आहे.

अकोले तालुक्यात शिक्षणाची रास्त समज असलेले व सामाजिक बांधलकी असणारे असंख्य शिक्षक कार्यरत आहेत. वाड्या वस्त्यांवरील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ते अत्यंत समर्पित भावनेने योगदान देत आहेत. शिंदे दांपत्याप्रमाणे गावोगावच्या सजग नागरिकांनी शिक्षकांच्या या प्रयत्नामध्ये असे योगदान दिल्यास अकोले तालुक्यात नवी शिक्षण क्रांती घडू शकणार आहे. 

समशेरपूर येथे संपन्न झालेल्या संगणक प्रदान कार्यक्रमासाठी देवाचीवाडी शाळेचे मुख्याध्यापक सदानंद डोंगरे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुभाष मेंगाळ, उपाध्यक्ष संगीता मेंगाळ, ग्रामपंचायत सदस्य दत्तू माळी, मारुती उघडे, पेसा अध्यक्ष निवृत्ती मेंगाळ, योगेश भरीतकर, तुकाराम मेंगाळ, रामनाथ मेंगाळ, नारायण मेंगाळ व पालक वर्ग मोठ्या संख्येने हजर होते.

LIC

संबंधित लेख

लोकप्रिय