Monday, May 6, 2024
HomeAkoleआदिवासी दिन वैचारिक मंथनासह एकोप्याने साजरा व्हावा – मदन पथवे

आदिवासी दिन वैचारिक मंथनासह एकोप्याने साजरा व्हावा – मदन पथवे

अकोले : 9 ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिन व क्रांती दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. तालुक्यातील काही वैचारिक युवकांच्या माध्यमातून वेगवेगळे होणारे कार्यक्रम एकत्रित कसे घेता येतील याचा विचार करून तो विचार कृतीत उतरवण्यासाठी प्रयत्न केले आणि त्याला तालुक्यातील ज्येष्ठ नेत्यांनी साथ दिली आहे. युवकांनी पुढे आणलेली संकल्पना स्वागतार्ह आहे. आदिवासी दिन वैचारिक मंथनासह एकोप्याने साजरा व्हावा, असे आदिवासी प्रकल्प कार्यालय, राजूर प्रकल्प स्तरीय नियोजन आढावा समिती सदस्य मदन पथवे म्हणाले.

अकोले तालुक्याला आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे, क्रांतिकारक राया ठाकर, कॉम्रेड मुरली मास्तर नवले, कॉम्रेड न.बा.(दादा) मनकर, कॉम्रेड सक्रूभाई मेंगाळ, कॉम्रेड बी.के देशमुख यांसारख्या अनेक क्रांतिकारकांचा इतिहास आहे. यांच्यामुळे तालुक्याला स्वातंत्र पूर्वीपासून पुरोगामी विचारांचा वारसा आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात स्वातंत्र्याच्या चळवळी उभ्या करत असताना आदिवासी व बिगर आदिवासी बहुजन समाज नेते एकत्र येऊन चळवळीची आखणी करत असत. वेळ काळेनुसार कधी आदिवासी भागात चळवळीच्या बैठकांची आखणी केली जात असे तर कधी अकोले जवळील नवलेवाडी बैठका होत असत. या बैठकांचे नियोजन आदिवासी व बिगर आदिवासी बहुजन समाज असे एकत्र मिळून करत असत. तीच परंपरा स्वातंत्र्योत्तर काळात पुन्हा नव्याने सुरू करण्याचा प्रयत्न युवकांनी केला. त्याला  तालुक्यातील ज्येष्ठांनी साथ दिली ही महत्त्वाची बाब आहे.

अकोले तालुका हा आदिवासी बहुल भाग असल्याने 9 ऑगस्टला जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात आणि दिमाखास साजरा करण्याची परंपरा आहे. परंतु त्याचा हेतू बदलण्याचे काम काही राजकीय लोकांनी सुरू केले आहे. त्याला फाटा देण्याचे काम या माध्यमातून या युवकांनी करण्याचे ठरवले आहे.

9 ऑगस्ट हा आदिवासी दिन व क्रांती दिन एकत्र साजरा करताना एक तालुका एक कार्यक्रम ही संकल्पना उदयाला येऊन ती प्रत्यक्षात उतरवण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात आहे. सर्व धर्म समभाव हा हेतू मनात ठेवून 9 ऑगस्टला अकोले तालुक्यात अभिवादन सभा घेऊन आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्याचा मानस तालुक्यातील ज्येष्ठांनी घेतला आहे. ही तालुक्यातील महत्त्वाची व राज्याला दिशा देणारी गोष्ट आहे. या माध्यमातून आम्ही सर्व एक आहोत, आमच्यात विचार भेद असतील परंतु कुठेही मनभेदी नाहीत याची प्रचिती या माध्यमातून येत आहे. तालुक्यात होत असलेल्या या प्रयत्नांचे आम्ही स्वागत करत आहोत, असेही मदन पथवे म्हणाले.

Lic

LIC

Lic

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय