Friday, November 22, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडSharad Pawar : भोसरी, पिंपरी, चिंचवडमधील महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी निवडणूक हातात घ्या-...

Sharad Pawar : भोसरी, पिंपरी, चिंचवडमधील महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी निवडणूक हातात घ्या- शरद पवार

राज्य हातात द्या, महाराष्ट्राला गतवैभव दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही- शरद पवार (Sharad Pawar)

भाजपच्या राजवटीत महाराष्ट्र सातव्या क्रमांकावर

शहरासाठी पारखून उमेदवार दिले; मतदारांनो जबाबदारी पार पाडा- शरद पवार

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : महाराष्ट्र राज्य हातामध्ये द्या, तुम्हाला खात्री देतो महाराष्ट्राचा चेहरा बदलल्याशिवाय राहणार नाही. महिलांचे संरक्षण, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, युवकांच्या हाताला काम अशा अनेक गोष्टी करायच्या आहेत. त्यासाठी तुमची भूमिका महत्त्वाची आहे असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार बुधवारी भोसरी येथील सभेत म्हणाले. (Sharad Pawar)

एकेकाळी देशात महाराष्ट्र क्रमांक एकचे राज्य होते. आज प्रत्येक बाबतीत महाराष्ट्राची घसरण सुरू आहे. गेल्या आठ वर्षाच्या भाजपच्या राजवटीत दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत महाराष्ट्र सातव्या क्रमांकावर फेकले गेले आहे.

महाराष्ट्राला गतवैभव मिळवून द्यायचे असेल तर राज्य महाविकास आघाडीच्या हातात द्या.महाराष्ट्राला पुन्हा गतवैभव दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही अशी खात्री देखील शरद पवार यांनी दिली. पिंपरी, चिंचवड आणि भोसरी मतदारसंघासाठी अतिशय पारखून उमेदवार दिले असून त्यांच्यासाठी निवडणूक हातात घ्या असे आवाहन देखील शरद पवारांनी या सभेमध्ये केले.

महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे भोसरी विधानसभेचे अधिकृत उमेदवार अजित गव्हाणे यांच्या प्रचारार्थ बुधवारी भोसरीतील गाव जत्रा मैदानावर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवसेनेचे उपनेते सचिन अहिर, राष्ट्रवादीचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष तुषार कामठे, काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम, शिवसेना (उबाठा) शहराध्यक्ष ॲड. सचिन भोसले, आम आदमी पार्टीचे शहराध्यक्ष चेतन बेंद्रे, माजी महापौर आझम पानसरे, संजोग वाघिरे, माजी आमदार विलास लांडे , गौतम चाबुकस्वार, जगन्नाथ शेवाळे, ज्येष्ठ नेते प्रकाश बापू म्हस्के, शिवसेनेच्या पुणे जिल्हा संघटिका सुलभा उबाळे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे, महाविकास आघाडी भोसरी मतदारसंघाचे उमेदवार अजित गव्हाणे, पिंपरीच्या उमेदवार सुलक्षणा शीलवंत, तसेच महाविकास आघाडीचे आणि माजी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.


शरद पवार यावेळी म्हणाले, बरेच दिवसांनी पिंपरी चिंचवड शहरामध्ये सभेच्या निमित्ताने आलो आहे. एकेकाळी या शहराने संसदेत पाठवत देशाच्या संरक्षणाची मोठी जबाबदारी माझ्यावर दिली होती. महाराष्ट्राचा कारभार पाहताना कै. यशवंतराव चव्हाण, अण्णासाहेब मगर, श्री.घारे यांच्या मदतीने या शहरांमध्ये कारखानदारी आणली. महाराष्ट्राची जबाबदारी माझ्या हातात दिल्यानंतर साखर कारखाना, हिंजवडीतील आयटी कंपन्या अशा अनेक गोष्टी करता आल्या. सत्ता आपल्याकडे असताना आपण शहराचा कसा कायापालट करू शकतो हे याचे उदाहरण म्हणून पिंपरी चिंचवड शहराचे उदाहरण सांगता येईल.

आज हिंजवडीमध्ये पाच लाखाहून अधिक लोक काम करत आहेत. कारखानदारी वाढली त्यातून शहर वाढले. नागरीकरण वाढले. त्यामुळे नवीन गोष्टी करायला येथे मर्यादा येत होत्या. कारखानदारी वाढवता येत नव्हती अशा वेळेला चाकण, जेजुरी, सासवड ,रांजणगाव, शिरवळ येथे कारखानदारी आणून पुण्याच्या आजूबाजूला देखील संपन्नता आणली.

हीच स्थिती पुन्हा आणायची असल्याचे सांगून शरद पवार म्हणाले, ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. सहा महिन्यांपूर्वी देशाची निवडणूक होती. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगत होते आपल्याला 400 खासदार निवडून आणायचे आहे. आम्हाला आश्चर्य वाटले.

300 खासदारांमध्ये सत्ता येऊ शकते. मग 400 खासदार भाजपला कशासाठी हवे आहेत. तेव्हा कळले यांना देशाच्या घटनेवर गदा आणायची आहे.

सामान्य माणसाच्या अधिकारांवर गदा येत होती, म्हणून त्यावेळी आम्ही सर्व एकत्र आलो आणि देशाच्या घटनेवर होणारा हल्ला परतवून लावला. यामध्ये महाराष्ट्राचा अभिमान वाटला पाहिजे अशी कामगिरी महाराष्ट्राने केली.

महाराष्ट्राने महायुतीला येथून हद्दपार केले. 30 हून अधिक आपल्या विचारांचे खासदार निवडून आणले हेच आता विधानसभा निवडणुकीमध्ये करायचे आहे.

शरद पवार पुढे म्हणाले, गेली दहा वर्षे राज्यात भाजपची सत्ता आहे. यातील दोन वर्ष सोडली तर भाजपने सत्तेचे केंद्रीकरण करण्यावर लक्ष ठेवले. गेल्या आठ वर्षांमध्ये सत्तेचे केंद्रीकरण झाल्यामुळे भ्रष्ट व्यवस्था तयार झाली आहे. यामध्ये महाराष्ट्रात अतिशय विदारक परिस्थिती आहे.

महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचार वाढले आहेत. एकीकडे माझी लाडकी बहीण योजना राबवता आणि दुसरीकडे राज्यात 886 मुली गायब असल्याचा केंद्राचा अहवाल आहे. एका बाजूने बहीण लाडकी म्हणता. आणि दुसरीकडे आमच्या बहिणी कुठे गायब झाल्या, हेच सत्ताधाऱ्यांना माहित नाही. महिलांना सन्मान, आधार आणि बळ देण्याची गरज आहे जे महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही देणार आहोत.

पुणे शहर विद्येचे माहेरघर म्हटले जाते. शिक्षणाचा , शिक्षण संस्थांचा येथे विस्तार झाला. आमची मुले पदवीधर झाली आनंद आहे. मात्र आमच्या युवकांच्या हाताला काम नाही. त्यामुळे एक प्रकारची निराशा तरुण पिढीमध्ये आली आहे. म्हणून महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर या युवकांना प्रोत्साहन म्हणून चार हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे. महिला, शेतकरी, युवक यांना प्राधान्य देऊन महाराष्ट्राचे गतवैभव आपल्याला पुन्हा मिळवून द्यायचे आहे. त्यासाठी मतदारांना त्यांची भूमिका अतिशय काळजीपूर्वक पार पाडायची आहे असे देखील शरद पवार यावेळी म्हणाले. (Sharad Pawar)


महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा द्या- शरद पवार

भोसरी येथील महाविकास आघाडीचे उमेदवार अजित गव्हाणे तसेच पिंपरी व चिंचवड येथील उमेदवारांना अतिशय पारखून संधी दिली आहे. त्यामुळे मतदारांची आता जबाबदारी वाढली आहे. या शहराची संपन्नता पुन्हा मिळवायचे असल्यास महाविकास आघाडीच्या उमेदवारांना ताकदीने पाठिंबा द्या असे आवाहन देखील शरद पवार यांनी केले.

हजारो कार्यकर्त्यांसोबत लांडे, लांडगे आणि फुगे यांची ‘रॉयल एन्ट्री’

माजी नगरसेवक रवी लांडगे तसेच भोसरीतील सामाजिक कार्यकर्ते संतोष लांडगे आणि सम्राट फुगे यांनी हजारो कार्यकर्त्यांसमवेत भोसरीतील गाव जत्रा मैदानावर ‘रॉयल एन्ट्री’ केली. कार्यकर्त्यांनी खांद्यावरून वाजत गाजत यांना सभास्थळी आणले. हजारो कार्यकर्त्यांसमवेत झालेल्या या रॉयल एन्ट्रीने सभेतील उपस्थित यांचे लक्ष वेधले.

भोसरीत राष्ट्रवादीत जोरदार ”इनकमिंग”

शरद पवार यांच्या उपस्थितीत भाजपचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब गव्हाणे, भाजपच्या माजी नगरसेविका सारिका लांडगे, माजी नगरसेवक लक्ष्मण सस्ते, ईश्वर ठोंबरे तसेच सामाजिक कार्यकर्ते संतोष लांडगे, सम्राट फुगे, गौतम कडूस, अमृत सोनवणे, नवीन भालेकर, महेंद्र सरवदे, अतुल कांबळे, शंकर कुऱ्हाडे यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला. (Sharad Pawar)

भोसरी मतदारसंघातील नागरिक परिवर्तनाच्या मनस्थितीत आहे. आता त्यांनीच निवडणूक हातात घेतली आहे. त्यामुळे परिवर्तन अटळ आहे. आगामी काळात 24 तास पाणी, वाहतुकीची समस्या दूर करणे, तरुण पिढीसाठी स्मॉल क्लस्टर, महिलांना संरक्षण, शैक्षणिक संस्थांना अद्यावत करणे, हिंजवडी तसेच शहराच्या औद्योगिक भागांमध्ये फॉरेन इन्व्हेस्टमेंट आणण्यासाठी प्रयत्न करणे अशा कामांसाठी पुढाकार घेतला जाईल.

अजित गव्हाणे
उमेदवार, महाविकास आघाडी
भोसरी विधानसभा मतदारसंघ

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

माजी मंत्री नितीन राऊत यांच्या कारला भीषण अपघात

अजितदादांसाठी अभिनेत्री प्रचाराच्या मैदानात ; व्हिडिओ शेअर करत मतदानाचं आवाहन

सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, जाणून घ्या आजचे दर

सुप्रिया सुळेंचा फडणवीसांना थेट इशारा, म्हणाल्या…

नारायण राणेंच्या पत्नीने मुलांच्या व नवऱ्याच्या स्वभावाबद्दल व्यक्त केली खंत

महाबळेश्वरमध्ये मतदान जागृतीसाठी सायकल व बाईक रॅली

छगन भुजबळांना मुख्यमंत्री न करण्यामागचं शरद पवारांचं धक्कादायक स्पष्टीकरण

धनंजय महाडिक यांच्यावर गुन्हा दाखल; लाडकी बहिण योजनेवर वादग्रस्त वक्तव्य

मतदानासाठी १२ प्रकारचे ओळखपत्र पुरावे ग्राह्य

संबंधित लेख

लोकप्रिय