पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : आगामी लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुका विचारात घेऊन शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसने पिंपरी चिंचवड शहरात जोरदार तयारी सुरू केली आहे. या अनुषंगाने पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक चौकात सनशाईन मार्क्स इमारतीमध्ये दोन हजार चौरस फुटाचे विविध कक्ष असलेले भव्य कार्यालय तयार केले आहे.
यामध्ये स्वतंत्र महिला कक्ष, मध्यवर्ता वाचनालय, आधार कार्ड सुविधा कक्ष, आभा कार्ड सुविधा कक्ष, मतदान कार्ड सुविधा कक्ष, विविध शासकीय योजना (महापालिका ते केंद्र सरकार) कक्ष, सभा कक्ष, सोशल मीडिया रुम इत्यादीचा समावेश आहे. या कार्यालयाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवून त्यांना विविध सुविधा उपलब्ध करून देण्याचा मानस आहे.
विशेष बाब म्हणजे कुटुंबात आरोग्य विषयी गंभीर परिस्थिति निर्माण झाल्यास कुटुंबाला योग्य वैद्यकीय सल्ला व कमी खर्चात उपचार मिळण्यासाठी ‘शरद पवार संजीवनी आरोग्य मित्र’ ची सुविधा या कार्यालयामार्फत देण्यात येणार आहे. याचा फायदा शहर व जिल्ह्यातील गरजू लोकांना होणार आहे.
राष्ट्रवादी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा मध्यवर्ती कार्यालयाचे उदघाटन शनिवार दि. २ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर जाहीर सभा डालको ग्राउंड, एच. ए. कंपनीच्या बाजूला असणाऱ्या मैदानात होणार आहे. यावेळी सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, राजेश टोपे, जितेंद्र आव्हाड, एकनाथ खडसे, प्रकाश म्हस्के, प्रशांत जगताप, जावेद हबीब, मेहबूब शेख, तसेच यावेळी पक्षाचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.