Sunday, May 19, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडनिसर्गमित्र, गिर्यारोहक, सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर खांडभोर उर्फ चंदूमामा यांचे दु:खद निधन

निसर्गमित्र, गिर्यारोहक, सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर खांडभोर उर्फ चंदूमामा यांचे दु:खद निधन

मावळ / क्रांतिकुमार कडुलकर : नागाथली, मावळ येथील निसर्ग मित्र, गिर्यारोहक व ट्रेकर्स ग्रुपचे सदस्य व वुई टूगेदर फाउंडेशन या सेवाभावी संस्थेचे प्रमुख पदाधिकारी चंदशेखर खांडभोर (वय. 56) यांचे मौजे कळकराई या दुर्गम गावात दरी कोसळून 22 सप्टेंबर 2023 रोजी दुःखद निधन झाले. Nature friend, mountaineer, social activist Chandrasekhar Khandbhor alias Chandumama passed away

सुखवस्तू शेतकरी कुटुंबात जन्मलेले चंद्रशेखर खांडभोर यांचे शिक्षण इंग्रजी माध्यमात ज्ञान प्रबोधिनी, निगडी येथे झाले होते. 1970 च्या दशकात मावळातील अति दुर्गम भागातील इंग्रजी शिक्षण घेतलेला हा एकमेव तरुण विद्यार्थी पुणे, पिंपरी चिंचवड तसेच मावळ भागातील विविध सामाजिक विचारांच्या युवक विद्यार्थी संघटना, निसर्ग मित्र, पर्यावरण संस्था, सेवाभावी एनजीओ बरोबर कार्यरत होता.

मावळ मधील कुसवली, सावळा, नागाथली, खांडी या दुर्गम गावातील गोरगरीब आदिवासी ठाकर, कातकरी, दलित, निराधार, अपंग, उपेक्षित, वंचित महिला साठी त्यांनी आरोग्य सेवा, अन्नधान्य, शालेय साहित्य आदी मदत करण्यात त्यांनी आयुष्यातील दोन दशके काम केले.

पुणे, पिंपरी चिंचवड मधील शहरी मुलामुलींच्या सहली ते आयोजित करून शिवरायांच्या मावळ खोऱ्याचा इतिहास समजून सांगायचे. निसर्गाची आवड असलेले ते उत्कृष्ट पर्यटक होते.आंदरमावळच्या पंचक्रोशीत ते  चंदूमामा या नावाने प्रचंड लोकप्रिय होते.

त्यांचे वडील नथुराम खांडभोर सुप्रसिद्ध कीर्तनकार व डाहूली, वडेश्वर ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच होते. 1990 च्या दशकापासून उच्च इंग्रजी शिक्षण घेऊनही ते शहरी जीवनापासून दूर राहिले. मावळच्या डोंगर कडेकपारीतील निसर्ग जीवनाशी ते रममाण झाले होते.

पिंपरी चिंचवड मधील सेवा भावी डॉक्टर्स, वकील, सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून गरजू रुग्णांना त्यांनी मोफत वैद्यकीय सेवा मिळवून दिली. कोरोना काळात त्यांनी कुसवली, खांडी, सावळा या भागातील गरीब कुटुंबाना मोठ्या प्रमाणात किराणा किट उपलब्ध करून दिली होती. तसेच कुसवली येथे गरीब मुलींना सायकली मिळवून देण्यातही पुढाकार होता.

मागील दोन वर्षांपासून ते वुई टूगेदर फाउंडेशन, पिंपरी चिंचवड च्या माध्यमातून मावळ येथे सेवा केंद्र चालवत होते. 14 सप्टेंबर 2023 रोजी चिंचवड येथे एका मेळाव्यात त्यांची मावळ विभाग प्रमुख म्हणून नेमणूक करण्यात आली होती.

ते इलेक्ट्रिशियन, मोटार रिपेअरिंगची कामे करायचे. उत्कृष्ट बाईक रायडर असलेले चंद्रशेखर निसर्गभ्रमण, ट्रेकिंग करत होते. त्यांचे शहरातील मित्र मंडळी नागाथली येथील त्यांच्या फार्म हाऊस मध्ये सुटीच्या दिवशी येऊन कास पठारावर भ्रमंती करायचे. शुक्रवारी 22 सप्टेंबर रोजी दुपारी 1.17 वा त्यांचा मोबाईल संपर्क तुटल्यानंतर कान्हे येथील त्यांच्या भगिनी दौपदी रिंगे यांनी भाऊ कळकराई येथे कामासाठी गेला पण घरी आला नाही, अशी वडगाव पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवली.

सोमवारी सायंकाळी 3 वा सावळा गावचे पोलीस पाटील, ग्रामस्थ, ट्रेकर्स ग्रुप, पोलीस कर्मचारी, नातेवाईक यांनी त्यांचा मृतदेह खोल दरीतून बाहेर काढला. त्यांचा अपघाती मृत्यू असल्यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी कोणावरही संशय नाही, असे पोलिसांना सांगितले आहे.

आज मंगळवारी दुपारी 11.45 वा शेकडो लोकांच्या उपस्थितीत त्यांचा नागाथली येथे अंत्यसंस्कार करण्यात आला. या निसर्गवेड्या पर्यटक व सामाजिक कार्यकर्त्यांच्या मृत्युमूळे पिंपरी चिंचवड शहरात अतिशय हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय