Wednesday, June 19, 2024
Homeविशेष लेखरविवार विशेषBertold Russell : विशेष लेख ; बर्टोल्ड रसेल यांचा सामाजिक नवनिर्माणाचा विचार

Bertold Russell : विशेष लेख ; बर्टोल्ड रसेल यांचा सामाजिक नवनिर्माणाचा विचार

Bertold Russell : विसाव्या शतकातील नव -वास्तववादाची आग्रही भूमिका मांडणारे एक प्रगल्भ तत्त्वज्ञ म्हणून बर्टोल्ड रसेल यांचे नाव घेतले जाते. १८ मे १८७२ रोजी त्यांचा जन्म झाला आणि हा दीर्घायुषी तत्त्वज्ञ आणि थोर गणितज्ञ २ फेब्रुवारी १९७० रोजी कालवश झाला. इंग्लंड मधील एका उमराव घरात त्यांचा जन्म झाला. रसेल यांनी आपल्या बौद्धिक सामर्थ्याने मानवी जीवनाच्या अनेक अंगावर प्रकाश टाकला. व्यक्ती स्वातंत्र्याचे आणि मानवी मूल्यांचे महत्त्व, शिक्षणातील प्रायोगिकता, धर्म आणि नीतीच्या क्षेत्रातील नव उदारता, युद्धखोरीचा विनाश ही त्यांची भूमिका राहिली. ५५ पुस्तके आणि शेकडो लेखांमधून त्यांनी बहुविध प्रकारचे लेखन केलं होत. साहित्याचे नोबेल पारितोषिकही त्यांना १९५० साली मिळालेलं होतं. त्यांनी अणस्त्रांविरुद्ध मोहिम उघडली. (Bertold Russell)

माय फिलॉसॉफिक डेव्हलपमेंट, दि ऑटोबायोग्रफी ऑफ बर्टोल्ड रसेल, प्रिन्सिपिया मॅथेमॅटिका, प्रिन्सिपल्स ऑफ मॅथस, दी प्रॉब्लम ऑफ फिलॉसॉफी, ए हिस्टरी ऑफ वेस्टर्न फिलॉसॉफी, मॅरेज अँड मॉरल, ऑफ फ्री मेन्स वर्षीप, ऑन एज्युकेशन, व्हाय आय एम नॉट क्रिश्चन, कॉनवेस्ट ऑफ हॅपिनेस, दि सायंटिफिक आऊट लुक, पॉवर अ न्यू सोशल ऍनालिसिस, दि प्रिन्सिपल्स ऑफ सोशल रीकन्स्ट्रक्शन यासारखी त्यांची अनेक पुस्तके लिहिली. आपल्या ठाम भूमिकांसाठी त्यांना काही वेळा तुरुंगवास पत्करावा लागला, टीका व निषेध सहन करावा लागला, नोकरीवरही पाणी सोडावं लागलं पण तरीही रसेल त्यांची भूमिका सतत धीटपणाने मांडत राहिले.

त्यांच्याबाबत ‘यांनी घडलवलं सहस्त्रक’ या ग्रंथात म्हटलेआहे की ‘तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रातील त्यांचे कार्य अतुलनीय असेच आहे. आधुनिक गणिती किंवा चिन्हांकित तर्कशास्त्राचे ते प्रवर्तक आहेत. अरिस्टॉटल नंतर निर्माण झालेला सर्वात मोठा तर्कशास्त्रज्ञ असंच त्यांच्या बाबतीत म्हटलं पाहिजे. सर्व गणित हे काही तर्कशास्त्रीय शुद्ध संकल्पना आणि काही तर्कशास्त्रीय मुलाधार यांच्या सहय्याने सिद्ध करता येतं हा त्यांचा मूलभूत सिद्धांत आहे…. तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात वैज्ञानिक विचार पद्धतीचा अवलंब करणारे पहिले विचारवंत आहेत…… रसेल यांचा विसाव्या शतकातील समाजावर जो प्रभाव टिकून राहिला त्याचे तीन स्त्रोत आहेत. सामाजिक प्रश्नांवर त्यांनी केलेले प्रत्यक्ष कार्य, तत्कालीन प्रश्नावर आपल्या लेखणीने त्यांनी केलेले विस्तृत भाष्य आणि वैज्ञानिक दृष्टी समाजामध्ये रुजावी यासाठी त्यांनी दाखवलेली तळमळ हे ते तीन स्त्रोत आहेत…. विसाव्या शतकात तत्वज्ञानाच क्षेत्र रसरशीतपणे जिवंत ठेवण्याचे श्रेय त्यांना दिलेच पाहिजे.’

गेल्या काही वर्षात सोशल इंजिनिअरिंग, सामाजिक नवनिर्माण याची चर्चा सातत्याने होते. या पार्श्वभूमीवर रसेल यांच्या नवनिर्माणाचा विचार ध्यानात घेणे गरजेचे आहे. ‘दि प्रिन्सिपल्स ऑफ सोशल रीकन्स्ट्रक्शन ‘या ग्रंथातून त्यांनी सामाजिक नवनिर्माणाचा जो विचार मांडला तो फार महत्त्वाचा आहे. या ग्रंथात त्यांनी मानवाच्या सहज प्रेरणा, निर्मितीक्षम सामर्थ्य, राज्यसत्ता, राष्ट्रभावना, युद्धामागील प्रवृत्ती, शैक्षणिक संस्कार, कुटुंब व्यवस्था, मालमत्ता, धर्म, धर्मसंस्था, व्यक्ती आणि समाज आदी अनेक विषयांचे मूलभूत स्वरूपाचे विवेचन केले आहे. राजसत्ता म्हणजे नागरिकांच्या समुदायिक शक्तीचे एकत्रित स्वरूप असे ते मानतात. या शक्ती अंतर्गत व बाह्य अशा दोन स्वरूपाच्या असतात. पोलीस व कायदा ही अंतर्गत शक्ती आहे तर सैन्य आणि आरमार याद्वारे युद्ध पुकरण्याची ताकद ही बाह्य शक्ती. सर्व नागरिकांचे संकलन आणि संयोजन करणारे राज्य ही एक व्यवस्था आहे. त्यावर शासनाची सत्ता असते. (Bertold Russell)

सामाजिक बदलाच्या तत्त्वांमध्ये रसेल यांनी शिक्षण क्षेत्राचा गांभीर्याने विचार केलेला आहे. ते म्हणतात, शिक्षण ही एक राजकीय संस्था असून सामाजिक पुनर्घटनेबाबत ती आशादायी असते. व्यक्तिमत्व घडवण्यात आणि लोकमत बनवण्यात शिक्षणाचे समर्थ मोठे असते. शिक्षणाकडे केवळ उपजीविकेचे , चारीतर्थाचे साधन म्हणून पाहिले जाते. त्यामुळे नवी पिढी त्याकडे उपयुक्ततावादी दृष्टिकोनातून पाहते. पैसा मिळवण्याचा एक मार्ग म्हणून त्याचा विचार करते .ज्ञानप्राप्तीचा मार्ग म्हणून नाही. अनेकांना इतरांवर वर्चस्व गाजवण्याचे ते एक साधन वाटते. ज्यांना ज्ञानप्राप्तीत आवड नाही त्याचा फारसा प्रश्न नाही. पण जे बुद्धिवान आहेत, ज्यांना ज्ञानाबद्दल जिज्ञासा आहे त्यांच्यातही हा बदल झाला आहे.हे सर्वात मोठे दुर्दैव आहे.’ (Bertold Russell)

सामाजिक विषमतेमुळे शिक्षणक्षेत्र दूषित झाले आहे, हे स्पष्ट करून त्यावर उपाय सांगताना रसेल म्हणतात, भविष्यकाळास सुखद व सुफल बनवण्यासाठी प्रयत्नशील व आशावादी राहण्यास प्रोत्साहन देणारे शिक्षण युवा पिढीला दिले पाहिजे. भूतकालीन आयुष्य जपत बसण्यापेक्षा दिवसेंदिवस विश्वाला गवसणी घालून निरीक्षण शक्ती वाढवणारे शिक्षण त्यांना मिळाले पाहिजे. आपल्या विचारांच्या कक्षा रुंदावत जाणारे व कल्याणकारी दृष्टी देणारे शिक्षण त्यांना मिळाले पाहिजे. समाजाचे उदात्त्व स्वप्न बाळगून भविष्यात कशाप्रकारे विजय मिळवता येईल याचे ज्ञान त्यांना व्हायला पाहिजे, असे शिक्षण मिळाले तर व्यक्तीला जीवनात आनंद, जोम, नवी आशा यांचा लाभ होईल. उदासवृत्ती कमी होईल. मानवी प्रयत्नांमधून किती भव्य उदात्त जीवन तयार होऊ शकते याचा विश्वास त्यांच्या मनात निर्माण होईल.

सामाजिक नवनिर्माणाची रसेल याचं भूमिका अतिशय व्यापक आणि सूत्रबद्ध होती. नवनिर्मितीची आकांक्षा बाळगण्याऱ्या बाबत ते म्हणतात, ज्या लोकांना आपल्या विचारांनी नवे जग निर्माण करायचं असेल त्यांनी धैर्याने प्रस्थापिता विरुद्ध लढा द्यायला हवा. जुन्या कालबाह्य रितीरिवाजाना फाटा द्यायला हवा. चिरंतन मूल्यांचा मागोवा घेत, क्रौर्य, संघर्ष व द्वेष यांनी भरलेल्या जगात आपली सर्जनशील वृत्ती कायम ठेवता येते. मात्र त्यासाठी एकाकीपणा, विरोध ,दारिद्र्, अपमान यांना तोंड देण्याची तयारी ठेवली पाहिजे. सत्यप्रेम, बुद्धिवाद आणि अदम्य आशा यावर आपले लक्ष केंद्रित केले पाहिजे. आपल्या उद्दिष्टावर मनात निष्ठा पाहिजे. समाज निर्मितीत अशा उत्कट इच्छेने काम करणाऱ्या व्यक्तीपुढे काही काळाने का होईना जग नतमस्तक झाल्याशिवाय राहणार नाही. असा विश्वासही रसेल यांनी व्यक्त केला आहे. रसेल यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन…!

– प्रसाद माधव कुलकर्णी
(लेखक समाजवादी प्रबोधिनी, इचलकरंजीचे १९८५ पासूनचे कार्यकर्ते आहेत. प्रबोधिनीच्या वतीने गेली पस्तीस वर्षे नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती’ मासिकाचे संपादक आहेत. तसेच लेखक, कवी, गझलकार म्हणून सुपरिचित आहेत.)

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

मोठी बातमी : कन्हैया कुमार यांच्यावर प्रचारा दरम्यान हल्ला

शिरूर: स्ट्राँगरुममधील सीसीटीव्ही चित्रीकरणाचा सर्व डाटा सुरक्षित –जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे

शासकीय निमशासकीय विभागात विविध पदासाठी भरती; 10 वी, 12 वी, ITI उत्तीर्णांना सुवर्णसंधी

ब्रेकिंग : लिपिक टंकलेखक संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी उमेदवारांची यादी जाहीर

मतदारांनो…. मोबाईल ॲप व ऑनलाईन माध्यमातून काढा मतदार चिठ्ठी

MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत 524 जागांसाठी भरती

हिंदुस्थान उर्वरक आणि रसायन लिमिटेड अंतर्गत 80 पदांची भरती

मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत भरती

भारतीय सेना TES अंतर्गत भरती; आजच करा अर्ज!

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय