Friday, November 22, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडआळंदीत माऊलींचे पालखी सोहळ्याचे हरिनाम गजरात आगमन

आळंदीत माऊलींचे पालखी सोहळ्याचे हरिनाम गजरात आगमन

थोरल्या पादुका मंदिरात पूजा व स्वागत ; गुरुवारी आषाढी एकादशी

आळंदी / अर्जुन मेदनकर
: आषाढी पायी वारी सोहळ्या अंतर्गत श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या वैभवी पादुका पालखी सोहळ्याचे परंपरेने माऊली मंदिरात हरिनाम गजरात आगमन झाले. हजारो वारकरी भाविकांचे उपस्थितीत सोहळा हरिनाम गजरात आळंदीत परतला. यावर्षी लाखो भाविकांचे उपस्थितीत पायी वारी सोहळा राज्यात साजरा करण्यात आला. पंढरीत श्रीविठ्ठल देव भेट , गोपाळपुर काला उरकून श्रींचे वैभवी पादुका पालखी सोहळ्याचे हजारो भाविक, वारकरी, नागरिकांच्या उपस्थितीत हरीनाम जयघोषात सोहळा बुधवारी ( दि.१२ ) अलंकापुरीत पोहचला. परंपरेने गुरुवारी ( दि. १३ ) आळंदीत आषाढी एकादशी सोहळा हरिनाम गजरात साजरा होत आहे. ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचे परंपरेने आळंदी मंदिरात पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर, राजेंद्र आरफळकर, ऋषिकेश आरफळकर यांचे प्रमुख उपस्थितीत श्रींचे पादुका आळंदी देवस्थानकडे वारीहून आल्यानंतर परंपरेने सुपूर्द करण्यात आल्या. श्रींचे पादुका पालखी मंदिर प्रदक्षिणा झाल्यानंतर विना मंडपातून माऊलींचे मंदिरात सोहळा आरतीने विसावला. तत्पूर्वी माऊली मंदिरातून श्रींचे स्वागत प्रथा परंपरेने दिंडी हरिनाम गजरात पालखी सोहळ्यास सामोरी जात महानैवेद्य झाला. अभंग हरिनाम गजरात सोहळ्याचे स्वागत व आगमन झाले.

वारकरी शिक्षण संस्थामध्ये सोहळा आळंदीत प्रवेश प्रसंगी पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर, राजेंद्र आरफळकर, आळंदी देवस्थानचे विश्वस्त व पालखी सोहळा प्रमुख अँड. विकास ढगे पाटील, प्रमुख विश्वस्त योगेश देसाई, वेदमूर्ती विष्णू महाराज चक्रांकित यांचे वंशज हंसराज चक्रांकित, व्यवस्थापक माऊली वीर, मानकरी माजी नगराध्यक्ष राहुल चिताळकर पाटील, योगीराज कु-हाडे, योगेश आरु, ज्ञानेश्वर दिघे, विठ्ठल घुंडरे, श्रींचे सेवक चोपदार बाळासाहेब रणदिवे, राजाभाऊ रंधवे चोपदार, उद्धव रणदिवे चोपदार, ज्ञानेश्वर गुळुंजकर,संजय रणदिवे, तुकाराम माने, भीमराव घुंडरे, ज्ञानेश्वर घुंडरे, नगारखाना सेवक मानकरी बाळासाहेब भोसले, समीर घुंडरे, विनायक घुंडरे, सचिन कुऱ्हाडे, महेश केदारी, महादेव रत्नपारखी यांचे सह मानकरी, दिंडीकरी, वारकरी भाविक उपस्थित होते. आळंदी मंदिरात ज्ञानेश्वर महाराज यांचे वैभवी पादुका आल्यानंतर श्रींचे संजीवन समाधी मंदिरात आरती झाली. आळंदीत पालखी सोहळ्याचे स्वागतास भाविकांनी रस्त्याचे कडेला दुतर्फा उभे राहून गर्दी करीत हरिनाम जयघोषात स्वागत केले. यावर्षी पालखी सोहळ्यावर कोणतेही निर्बंध नसल्याने सोहळा मोठ्या आनंदी उत्साही मंगलमय वातावरणात साजरा करण्यात आला. यावर्षी सोहळ्यास माजी विश्वस्त प्रशांत सुरु, सुधीर पिंपळे, अभय टिळक यांनी मार्गदर्शन केले.



आळंदीत श्रींचे सोहळ्याचे जोरदार स्वागत करण्यात आले. रांगोळ्यांचे पायघड्या, पुष्पसजावट करण्यात आली. ठिकठिकाणी माऊली भक्त मंडळांनी श्रींचे पालखीवर पुष्प वर्षाव करीत स्वागत केले. भाविकांना विविध ठिकाणी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. आळंदीतील प्रथा परंपरांचे पालन करीत श्री नरसिव्ह सरस्वती स्वामी महाराज यांचे मूळपीठ येथे ह,भ.प. विष्णू महाराज चक्रांकित आणि परिवाराचे वतीने पिठलं भाकरी चा महाप्रसाद वाटप करण्यात आले. यासाठी भाविकांनी मोठी परंपरा जोपासत महाप्रसादास गर्दी केली. अनेक दिवसांचे विरहा नंतर श्रींचे पालखी सोहळा आळंदीत येताच येथे चैतन्य अवतरले. मोठ्या ज्ञानभक्तीमय वातावरणात आळंदीकरांचे वतीने सोहळ्याचे स्वागत आळंदी देवस्थान व ग्रामस्थांचे वतीने व्यवस्थापक माऊली वीर, आळंदी नगरपरिषद प्रशासक मुख्याधिकारी कैलास केंद्रे, ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे विश्वस्त प्रकाश काळे, अध्यक्ष सुरेश वडगावकर, माजी नगरसेवक अशोक उमरगेकर, ज्ञानेश्वर रायकर, किशोर तरकासे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे, रमेश पाटील, शहाजी पवार, प्रकाश जाधव, पोलीस नाईक मच्छिंद्र शेंडे, मंडलाधिकारी स्मिता जोशी, आजी, माजी पदाधिकारी, विविध सेवाभावी संस्था, संघटना यांचे वतीने करण्यात आले. यावेळी वारकरी शिक्षण संस्थेच्या शालेय मुलांनी रस्त्याचे दुतर्फा उभे राहून तसेच सोहळ्यात छक्त्या पादुका ते आळंदी असा प्रवास करीत सोहळ्याचे हरिनाम गजरात स्वागत केले.या पालखी सोहळ्यात सर्व प्रकारच्या सेवा सुव्यवस्थित आणि सुसज्ज व्यवस्था, भोजन व्यवस्था, पिण्याचे पाणी मुबलक प्रमाणात देत सोहळ्याचे चोख नियोजन झाल्याने कोणीही आजारी पडले नाही. उत्साही आनंदात पायी वारी करीत सोहळा आळंदीत आल्याचे उपव्यवस्थापक तुकाराम माने यांनी सांगितले.

थोरल्या पादुका मंदिरात पालखी सोहळ्याचे स्वागत आरती

आषाढी पायी वारी सोहळ्या अंतर्गत श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या वैभवी पादुका पालखी सोहळ्याचे परंपरेने श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिर ट्रस्ट च्या वतीने मंदिरात हरिनाम गजरात स्वागत करण्यात आले. हजारो वारकरी भाविकांचे उपस्थितीत सोहळाचे स्वागत ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष अँड विष्णू तापकीर यांनी केले.यावेळी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे प्रमुख अँड विकास ढगे पाटील, श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थांनचे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई, पालखी सोहळ्याचे मालक राजेंद्र आरफळकर, राजाभाऊ चोपदार, बाळासाहेब चोपदार , राजाभाऊ चौधरी यांचा संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिर ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष अँड विष्णू तापकीर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, उपरणे देऊन मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ट्रस्टचे खजिनदार दत्तात्रय गायकवाड, मनोहर भोसले, हिरामण बुर्डे, ह भ प रमेश महाराज घोंगडे, राजेंद्र नाणेकर , बाळासाहेब चव्हाण, साहेबराव काशीद आदी मान्यवर उपस्थित होते. दिघी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मच्छिंद्र पंडित यांनी प्रभावी बंदोबस्त ठेवला होता. परिसरातील भाविक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी करून दर्शन घेतले. मंदिर समितीचे वतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे स्वागत सुशोभित रांगोळीच्या पायघड्या टाकीत रोहीनी परूतगल्ले यांनी लक्ष वेधले. मंदिरात लक्षवेधी रंगावली व पुष्प सजावट करण्यात आली होती.



आळंदी पंढरपूर आनंद वारीत स्वच्छतेचीही वारी


अखिल भारतीय मॉं नर्मदा परिक्रमा सेवा संघाच्या वतीने यावर्षी पहिल्यांदाच पंढरपूर वारीमध्ये स्वच्छता अभियानाचा उपक्रम राबविण्यात आला. एक तरी ओवी अनुभवावी याप्रमाणे आयुष्यात एक तरी वारी अनुभवावी. वारीच्या अप्रतिम अनुभूतीची संधी यावर्षी अखिल भारतीय मॉं नर्मदा परिक्रमा सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्षात अनुभवली. त्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर जाणवतच होता. एवढ्या मोठ्या विशाल वारीमध्ये आपलं काहीतरी योगदान लाभलं या समाधानाने सर्व सेवक तृप्त झाले होते. या उपक्रमात राष्ट्रीय संयोजक सतीश चौबे, सत्येंद्रजी कुशवाह, मनीषा पटेल, सुरुची नाईक, सुधीर कुलकर्णी, यशश्री तावसे, उपेंद्र पेंडसे, अमेय सोमन, दिलीप महाराज ठाकरे, अशोक महाराज चव्हाण, माधुरी लोणकढी, साधनाताई दीक्षित, कल्पनाताई पाटील यांचे मार्गदर्शन झाले. स्वच्छता वारीत प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभागी असणाऱ्या सर्व सेवक पदाधिकाऱ्यांचे दिलीप महाराज ठाकरे यांनी आभार व्यक्त केले. या पुढील स्वच्छता मोहीम अधिक मोठ्या प्रमाणात पदाधिकारी साधक, सेवक यांचे उपस्थितीत केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. सोहळ्यात उद्या गुरुवारी आळंदीत आषाढी एकादशी साजरी होत आहे.

चिखली जाधववाडी येथे येथील धोकादायक उताराचा रस्ता सुरक्षित करा – रोहन चव्हाण


नितेश राणे यांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा, तृतीयपंथीचे पुण्यात आंदोलन

जागतिक लोकसंख्यादिनी सुखी जोडप्यांचा सन्मान

संबंधित लेख

लोकप्रिय