आधुनिक काळातही विद्यार्थ्यांवर पायपीट करण्याची वेळ ही दुर्दैवी – खांडगे
मावळ-पवनानगर / क्रांतिकुमार कडुलकर : आधुनिक काळातही शाळेत येण्यासाठी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पायपीट करावी लागते, ही बाब भूषणावह नाही.लायन्स क्लब सारख्या सामाजिक संस्थेच्या मदतीने ही पायपीट थांबण्यास मदत होईल. असा विश्वास नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सचिव संतोष खांडगे यांनी व्यक्त केला.
लायन्स क्लब ऑफ़ मेट्रोपॉलिस आणि इंटरनॅशनल लायन्स क्लब ३२३४ डिस्ट्रिक्ट २ च्या सहकार्याने पवना विद्यामंदिर विद्यालयातील पायपीट करीत येणा-या मुलींना २४ सायकलींचे वाटप करण्यात आले. यावेळी श्री खांडगे बोलत होते.
यावेळी नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ संस्थेचे संचालक सोनबा गोपाळे, महेश शहा, सुनील भोंगाडे, लायन्स क्लब ऑफ मॅट्रोपाॅलीसचे अध्यक्ष शंकर गावडे, सचिव महेंद्र परमार, खजिनदार रामचंद्र माने, झोन चेअरपर्सन शिरीष हिवाळे, अॅक्टिव्हिटी चेअरपर्सन भरत इंगवले, पवना विद्यालयाचे प्राचार्य भाऊसाहेब आगळमे, पर्यवेक्षिका अर्चना शेडगे ,ज्येष्ठ लायन्स सदस्य अनुप ठाकूर गुलशन पाल, नागेद्र शेरेगर, विश्वजीत बेडगे, संदीप कामठे, पुंडलिक दरेकर, चंद्रकांत दरेकर, महेश अलदगी, श्रीकांत रेवनार काशिनाथ निंबळे, प्रल्हाद कालेकर, मुकुंद ठाकर, ज्ञानेश्वर ठाकर,गोरख जांभूळकर, माजी उपसरपंच संदिप भुतडा, कालेच्या उपसरपंच छाया कालेकर, येळसे गावच्या माजी सरपंच सिमा ठाकर यांच्यासह पालक माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अॅक्टिव्हिटी चेअरपर्सन भरत इंगवले म्हणाले कि, या भागातील महागाव, सावंतवाडी, मालेवाडी, धालेवाडी या गावातून येणा-या विद्यार्थ्यांनी आपली कैफियत एका स्थानिक वृत्तवाहिनीवर मांडली होती.या बातमीची दखल घेत ही मदत करण्यात आली आजतागायत क्लबच्या माध्यमातून सुमारे ३५० सायकलींचे वितरण केले आहे.
यावेळी विद्यालयाने मान्यवरांचे लेझीम पथकाच्या गजरात स्वागत केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या अंगी जिद्द, चिकाटी हे गुण असतात या शिवाय चौकस बुद्धीने हे मुले अधिक ज्ञान मिळविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा अनुभव या कार्यक्रमात आला असल्याचे मान्यवरांनी मनोगतातून व्यक्त केले.
लायन्स क्लब ऑफ मॅट्रोपाॅलीसचे अध्यक्ष शंकर गावडे म्हणाले,” ग्रामीण भागात अशा प्रकारचे उपक्रम करण्यासाठी संधी उपलब्ध करून दिल्या बद्दल शाळेचे आभार मानले.
शाळेचे प्राचार्य भाऊसाहेब आगळमे यांनी प्रास्ताविकातून या परिसरातील शैक्षणिक व भौगोलिक परिस्थितीचा आढावा घेतला. रोशनी मराडे व भारत काळे यांनी सुत्रसंचालन केले. बापुसाहेब पवार यांनी आभार मानले.