Friday, April 26, 2024
Homeजिल्हाविद्यापीठातील अन्यायकारक शुल्कवाढ मागे घेतलीच पाहिजे - डॉ. बाबा आढाव

विद्यापीठातील अन्यायकारक शुल्कवाढ मागे घेतलीच पाहिजे – डॉ. बाबा आढाव

शिक्षणाची जबाबदारी आईच्या दुधाप्रमाणे सरकारने घ्यायला हवी

पुणे : स्वातंत्र्याच्या वेळी आम्हाला मोफत शिक्षणाचे आश्वासन दिले होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ शिक्षणाचे माहेरघर आहे. विद्यापीठातील शुल्कवाढ हा अन्याय आहेच, ती मागे घेतलीच पाहिजे. त्याचबरोबर मोफत शिक्षण मिळाले पाहिजे ही आपली मागणी असायला पाहिजे. विद्यापीठ पैसे नाही असे म्हणत आहे, यावर काय बोलायचे. शिक्षणाची जबाबदारी आईच्या दुधाप्रमाणे सरकारने घेतली पाहिजे. शुल्कवाढी विरोधात तात्पुरता लढा नाही तर ही प्रवाहातील वाटचाल आहे. या आंदोलनात मी सहभागी असेल, असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांनी व्यक्त केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथील संविधान स्तंभ येथे भरमसाठ शुल्कवाढीविराधात बैठक आयोजित करण्यात आली होती. ११ ऑक्टोबर रोजी विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समितीच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव आणि कायदेतज्ज्ञ ऍड. असीम सरोदे उपस्थित होते. यावेळी ऍड. भाऊसाहेब आजबे, राहुल डंबाळे, सचिन पांडुळे, नवनाथ मोरे, निश्चय साक्षात साधना, प्रा. सुरेश देवढे, ओंकार मोरे, संतोष मदने, अमोल शिंदे, सुरज गायकवाड, सोमनाथ लोहार, चेतन दिवाण, सचिन शिरसाठ यांच्यासह विद्यार्थी, विविध पक्ष व संघटनांचे पदाधिकारी यांनी शुल्कवाढीविराधात मत व्यक्त केले.

शुल्कवाढी विरोधात बोलताना कायदेतज्ज्ञ ऍड. असीम सरोदे म्हणाले, कोरोनाचे कारण करून शुल्कवाढ केली असल्यास चुकीचे आहे. कोणत्या आधारे शुल्कवाढ केली हा प्रश्न विचारला पाहिजे, त्यामागील नेमकी कारणे शोधली पाहिजेत. विद्यापीठ हे कमाई करण्याचे साधन नाही. शिक्षण ही वस्तू नाही, त्यामुळे त्याचे बाजारीकरण करण्याचा निषेध केला पाहिजे. शुल्कवाढ करणे हे षडयंत्र असेल तर लढले पाहिजे. सर्वसामान्य विद्यार्थ्यांना शिकताच येणार नाही अशी व्यवस्था केली आहे. विद्यापीठाच्या बाबतीत सुद्धा शुल्क निर्धारण समिती असली पाहिजे. शुल्कवाढ चुकीची नसेल तर विद्यापीठाने स्पष्ट करावे. अन्यथा चुकीची असल्यास मान्य करायला पाहिजे, असे ते म्हणाले. या सोबतच अहिंसक पध्दतीने रस्त्यावर लढाई झाली पाहिजे, आम्ही सोबत आहोत, असे म्हणत ऍड. असीम सरोदे यांनी विद्यार्थ्याच्या आंदोलनाला पाठिंबा दिला.

अक्षय निर्मळ याने सूत्रसंचालन तर वैष्णवी पाटील हिने आभार मानले. ओम बोदले आणि पौर्णिमा गायकवाड यांनी प्रास्ताविक केले.

संपादन – कमलाकर शेटे

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय