दापोली : रत्नागिरी जिल्ह्यातील आदिवासी कातकरी बांधवांना मरणाची जागा नाही, पाण्याची सोय नाही, अजूनही येथील आदिवासी नदी – नाल्याचे पाणी पित आहेत, ही एक फार मोठी शोकांतिकाच आहे. आरोग्य, पाणी, शिक्षण, मूलभूत सोयीसुविधा मिळविण्यासाठी अजूनही येथील आदिवासी बांधव झुंजत आहे. निवडणूक आली की, आम्ही आदिवासींसाठी हे करु, ते करू म्हणणणारे येथील राजकीय पुढारी आदिवासींच्या समस्यांवर गप्प आहेत, अशी टीका बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांनी केली आहे.
सुशिलकुमार पावरा म्हणाले, आदिवासी बांधवांना अजूनही मूलभूत सुविधांपासून वंचितच आहे. अजूनही स्वतःच्या हक्काची जागा नाही, जमीन नाही, राहायला घर नाही, पाण्याची सोय नसल्यामुळे नदी नाल्यातील व पावसाचे पाणी पित आहेत, आपला मृतदेह जाळण्यासाठी जागाही मिळत नाही. आदिवासींना शिक्षणाच्या प्रवाहापासूनही दूर ठेवले, मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष केले अशी खंत व्यक्त करत येथील राजकीय पुढाऱ्यांनी आदिवासी समाजाच्या अज्ञानाचा फायदा घेत फक्त मतांसाठी वापर करून घेतला असा आरोप पावरा यांनी केला आहे.