Monday, January 13, 2025
Homeजुन्नरपुणे : जुन्नर न्यायालय परिसरात अस्वच्छता करणाऱ्यांना जागेवर दंड

पुणे : जुन्नर न्यायालय परिसरात अस्वच्छता करणाऱ्यांना जागेवर दंड

जुन्नर / हितेंद्र गांधी : न्यायालय हे न्यायदानाचे मंदिर असून या व्यवस्थेतील घटकांनी येथील पावित्र्य, स्वच्छता राखणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती अभय ओक यांनी जुन्नर येथे केले होते. मागील आठवड्यात न्यायालयाच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी ते जुन्नरला आले होते. या सूचनेची अंमलबजावणी सध्या न्यायालयात सुरू आहे. याकरिता येथील कर्मचाऱ्यांना न्यायाधीशांनी कडक सूचना दिल्या असून सीसीटीव्हीद्वारे येणाऱ्या जाणाऱ्यांवर नजर ठेवली जात आहे. नुकतेच या इमारतीत थुंकणाऱ्या एका व्यक्तीला फरशी पुसायला लाऊन स्वछता करण्याची शिक्षा करण्यात आली. तर दुसऱ्या एका थुंकणाऱ्या व्यक्तीकडून न्यायालय परिसर झाडून घेण्यात आला आहे.

दरम्यान विविध शासकिय कार्यालयात अनेकदा अस्वच्छता आढळत असते. मात्र न्यायालयाच्या नव्या व आकर्षक इमारतीत येणाऱ्या पक्षकारांना सुरुवातीपासूनच शिस्त लावल्याने इतर अधिकाऱ्यांसाठी ही घटना एक आदर्श ठरत असल्याची चर्चा होत आहे. या नूतन  इमारतीच्या प्रवेशद्वारावरच नागरिकांनी आतमध्ये येताना जवळील पान, तंबाखु, गुटखा व तत्सम पदार्थ बाहेरील बॉक्समध्ये काढून ठेवाव्यात, अशा सुचना देण्यात आल्या आहेत. शिवाय सहन्यायाधीश व पदाधिकारी इमारतीत फिरून अधून मधून पाहणी करत आहेत.  अस्वच्छता करणारा आढळल्यास जागेवरच पोलिसांकरवी कारवाई केली जात आहे. तसेच आर्थिक दंडात्मक कारवाईचा देखील करण्यात येत आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय