सनातन धर्म या विषयाची सध्या जोरदार राजकीय चर्चा सुरू आहे. जनतेच्या कोणत्याही जिव्हाळ्याच्या आणि जीवन मरणाच्या प्रश्नांपेक्षा धर्म आणि राजकारण यांची सांगड घालत, लोकांची माथी भडकवत आणि मती गुंग करत ज्यांना राजकीय पोळी भाजायची असते ते सनातन धर्म म्हणजे काय हे स्पष्ट करणार नाहीत पण हा विषय चर्चेत ठेवणार. कर्मविपाकाच्या सिद्धांतापासून चातुर्वर्ण्य व्यवस्थेपर्यंतच्या विषयावर ते सोयीस्कर मौन बाळगणार हेही उघड आहे. खरे तर स्वामी विवेकानंद म्हणाले होते, ‘भारतात धर्माचा शोध अविरतपणे चालू राहिला तर त्याला कधीच मरण नाही. परंतु जर राजकीय आणि सामाजिक संघर्षामध्ये त्याचा वापर केला गेला तर त्याची अधोगती आढळ आहे.’ पण अलीकडे महामानवांना सोयीनुसार व सोयीपुरते अधोरेखित वा उल्लेखित करायची एक परंपरा विकसित झाली आहे. त्यांना सत्यपचनी पडत नसते. One hundred and fifty years of establishment of Satyashodhak Samaj
पण धर्म आणि सत्य याबाबतीतील आपला सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि सांसृतिक दृष्टिकोन विकसित करायचा असेल तर सार्वजनिक सत्यशोधक समाजाची भूमिका समजून घेतली पाहिजे. आत्ता हे लिहिण्याचे औचित्य म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाला आता दीडशे वर्षे पूर्ण होत आहेत. २४ सप्टेंबर १८७३ रोजी पुण्यामध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना झाली. अमेरिकेतील विचारी मानवतावादी लोकांनी निग्रोंना गुलामगिरीतून मुक्त केले. त्याच पद्धतीने पुरोहित वर्गाच्या बौद्धिक दास्यातून या देशातील विचारवंतांनी शूद्रातीक्षुद्राना मुक्त केले पाहिजे ही भूमिका महात्मा फुले मांडत होते. १८५५ साली महात्मा फुले यांनी ‘तृतीयरत्न ‘ हे नाटक लिहिले. त्यातून त्यांनी पुरोहित वर्गाचे वर्चस्व कसे शोषण करते हे मांडले. पुढे त्यांनी १८७३ मध्ये ‘गुलामगिरी’ नावाचे पुस्तकही लिहिले होते. या पुस्तकातूनच सत्यशोधक समाजाचा जन्म झाला. तसेच ज्योतिबांनी पुनर्विवाह घडवून आणण्यात पुढाकार घेणे, बालकाश्रम सुरू करणे, शिवाजी महाराजांची समाधी शोधून पोवाडा रचणे, अस्पृश्याने हौद खुला करणे, केशवपनाविरोधी आवाज उठविणे असे विविध स्वरूपाचे कार्य अंगीकारले. इथल्या मानवनिर्मित जाती व्यवस्थेत श्रमाने जगणाऱ्या वर्गाला इंग्रज सरकारने शिक्षण द्यावे म्हणजे ते विद्या मिळवून मानसिक दास्यातून मुक्त होतील असे जोतिबांचे मत होते. ‘सारे अनर्थ एका अविद्याने केले’ हे त्यांचे मत होते.
इंग्रजांनी आपल्या स्वार्थासाठी का असेना पण इथे शिक्षणाची दारे खुली केली. त्यामुळेच भारतात सर्व जातीच्या लोकांना शिक्षणाची कवाडे उघडली गेली. इंग्रजांच्या अंकित झालेल्या मराठेशाहीत एक व कोर्ग सूज्ञ होत होता.लोकहीतवादींपासून महात्मा फुले यांच्यापर्यंत अनेकजण कार्यरत झाले होते. अशीच सुज्ञ झालेली काही मंडळी महात्मा फुले यांच्याकडे जमलेली होती. त्यांनी विविध बाबींवर सांगोपांग विचार केला. त्यातून धर्म, कर्म, व्यवहार आदी बाबत शूद्र नाडले जाऊ नयेत म्हणून ‘सत्यशोधक समाजाची’ जाहीरपणे स्थापना केली.
या समाजाने काही नियम आणि कर्तव्य निश्चित केली.सत्यशोधक समाजाच्या सभासदत्वासाठी काही महत्त्वाच्या अटी होत्या. उदाहरणार्थ( १) मी निर्मिका शिवाय इतर कशाचीही पूजा करणार नाही.(२) मी निर्मिकाने दिलेल्या शुद्ध मानवी अधिकारांना धक्का लावणार नाही. दुसरे आपल्यापेक्षा नीच आहेत असे ज्या ग्रंथात नमूद केले आहे अशा धर्मग्रंथांना मानणार नाही. आणि ज्या धर्मग्रंथाद्वारे दुसऱ्यांना नीच समजले जाते त्यांना मी सन्माननीय मानणार नाही.(३) जनावरांना मारण्यात मी सहभागी होणार नाही.दारूच्या व्यसनापासून अलिप्त राहण्याचा यशस्वी प्रयत्न करेन. (४) सत्याचा सन्मान करेन. वृद्ध, अपंग, बालके यांना मदत करीन. मानवी अधिकार समजावेत म्हणून मुला-मुलींना पुरेशी शिक्षण देईन. (५) समाजाचा खर्च चालावा म्हणून मी माझ्या उत्पन्नातून वर्गणी देईन.(६) समाजाचा कारभार चालवण्यासाठी लोकशाही पद्धतीचे कार्यकारी मंडळ निवडण्यात येईल. बहुमताने निर्णय घेण्यात येतील. वर्षातून चार वेळा सर्वसाधारण सभा होईल. असे काही नियम होते.
सत्यशोधक समाजाच्या सभासदांनी सत्याचा प्रसार आणि सद्विचार लोकांमध्ये रुजवण्याचे काम करावे. मानवी हक्क आणि कर्तव्यांचा त्यांनी आपल्या लेखनातून व भाषणातून प्रचार व प्रसार करावा हे अभिप्रेत होते. अनिष्ट चालीरीतींचे निर्मूलन करणे हे समाजाच्या उद्देशातील मुख्य कलम होते. तसेच महात्मा ज्योतिराव फुले, तुकाराम तात्या पडवळ, दादोबा पांडुरंग आदींची पुस्तके समाजाची विचारधारा म्हणून उपयोगात आणावीत असेही ठरवण्यात आले. प्रस्थापित धर्मग्रंथातील विषमतेवर व पक्षपातावर ज्योतिरावांना आसूड ओढायचे होते. सत्य काय आहे ? ते लोकांसमोर मांडायचे होते. म्हणूनच त्यांनी ‘ सत्यशोधक ‘ हे नाव धारण केले. मूळ सत्यशोधक समाज एक निर्मिक, एक धर्म, एक मनुष्यजात मानणारा म्हणून स्थापन झाला. सर्वच धर्माच्या धर्मग्रंथातून सर्वांनी प्रमाण मांडण्याजोगा भाग नसल्याने सत्यशोधक समाजाला ग्रंथाचे सर्वप्रामाण्य मान्य नव्हते. अवतारवाद, मूर्तीपूजा, विभूतीपूजा त्याला मान्य नव्हती. नामस्मरणाचा भक्तिमार्गही त्याला पसंत नव्हता. परलोक व ईश्वराची साक्षात भेट त्याला अमान्यच होती. स्वर्ग व दैववाद खरा नाही. स्त्री पुरुष समान आहेत.उलट पुरुषापेक्षा स्त्री श्रेष्ठ आहे अशी सत्यशोधक समाजाची भूमिका होती. महात्मा फुलेंचे चरित्रकार पद्मभूषण डॉ.धनंजय कीर यांनी सार्वजनिक सत्यधर्म पुस्तकाचा ‘भावी स्वातंत्र्याचा जाहीरनामा ‘आणि ‘विश्व कुटुंबवादाची गाथा’ असे सार्थ वर्णन केले होते.
सत्यशोधक समाजाला महात्मा फुले यांच्यानंतर डॉ. विश्राम रामजी घोले, कृष्णराव भालेकर, भास्करराव जाधव, प्रा.डोंगरे, लठ्ठे, मुकुंदराव पाटील रामैया अय्यावारू, वा.रा.कोठारी, विचारे गुरुजी, मोरोबा वाळवेकर, यशवंतराव परांजपे आदी अनेकांनी पुढे नेण्याचा प्रयत्न केला. पुढच्या काळात या चळवळीला राजकीय पक्षाचे स्वरूप येत गेले. आणि सत्यशोधक समाजाची तात्विक वाढच खुंटली. सत्यशोधक समाजाचे मूळ स्वरूप लोपले. त्यातून जातीपातीच्या शिक्षण संस्था, वस्तीगृहे निघाली. शिक्षणात प्रसार झाला हे खरे पण मूळ भूमिका काहीशी बाजूला पडली. १९१८ साली केशवराव बागडे यांच्या अध्यक्षतेखाली सत्यशोधक परिषद भरली. त्यातूनच पुढे कर्मवीर भाऊरावांच्या रयत शिक्षण संस्थेची स्थापना झाली. आज या शिक्षण संस्थेचे प्रचंड वटवृक्षात रूपांतर झालेले दिसते.
पण सत्यशोधक समाजाच्या चळवळीला महात्मा फुले जी क्षुद्रातीक्षुद्रांची चळवळ म्हणत होते ती मूल्ये रुजली नाहीत. परिणामी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अतिक्षुद्रांची वेगळी चळवळ पुढे उभी केली. महात्मा फुले यांना डॉ. आंबेडकर गुरु मानत होते.कारण ज्योतीरावांनीच अस्पृश्य उद्धारक चळवळीला जन्म दिला. पण त्यांच्यानंतर त्यांचे विचार व सत्यशोधक समाजाची चळवळ यात अंतर पडत गेले.व्यापक विचार मांडणारे कार्यकर्ते, उत्कृष्ट साहित्य, समर्थ असे दीर्घकालीन नेतृत्व न लाभल्याने सत्यशोधक समाजाची विचारधारा विस्तारू शकली नाही त्यात बहुजन समाज स्वतः परंपरी स्वभावाचा राहिल्याने प्रबोधन व परिवर्तन रुढीप्रियते पुढे पराभूत झाले. हा इतिहास असला तरी सत्यशोधक समाजाच्या स्थापनेमागील मुळ व्यापक भूमिका आजही महत्त्वाचीच आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांनी समाज प्रबोधनाची विविध कामे केली. त्यापैकी सत्यशोधक समाजाची स्थापना हे अतिशय महत्त्वाचे काम आहे. अखेरच्या काळात ‘सार्वजनिक सत्यधर्म’ हे पुस्तक अर्धांगवायूने आजारी असतानाही त्यांनी डाव्या हाताने लिहून पूर्ण केले होते. त्यांनी दाखवलेला ज्ञानमार्ग, विद्यामार्ग अनेक अर्थाने महत्त्वाचा आहे. आजच्या असत्यतेच्या बोलबाल्यात आणि दैववादाच्या विकृत फेऱ्यात अडकविणाऱ्या अस्वस्थ वर्तमानात त्याचे महत्त्व नाकारता येत नाही. राष्ट्रपिता महात्मा गांधी सुद्धा ‘ईश्वर सत्य है’ म्हणत अखेरीस ‘सत्य ही ईश्वर’ है असेच म्हणाले होते हे ध्यानात घेण्याची गरज आहे.
– प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी
Prasad.kulkarni65@gmail.com
(लेखक समाजवादी प्रबोधिनी, इचलकरंजीचे गेले अडतीस वर्षे कार्यकर्ते आहेत. तसेच गेली चौतीस वर्षे नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘मासिकाचे संपादक आहेत.)