महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांपासून सार्वजनिक जीवनात बारमाही वाचाळ धुळवडीचा कार्यक्रम सुरू आहे.वैचारिक व सांस्कृतिक भान नसलेल्या माध्यमांसमोर एकमेकांबद्दल काहीही बोलावे, वैयक्तिक टीका टिपण्णी,दुष्ट,द्वेषमूलक शाब्दिक कोटी करून कॅमेऱ्यासमोर यथेछ थोबाड मोकळे करावे,आणि दिवसभर चर्चेत राहावे,असा किळसवाणा प्रकार आपण पहात आहोत.2012 पासून या देशात ट्रोलिंग संस्कृती निर्माण करण्यासाठी एजन्सी निर्माण करण्यात आल्या. मोठ्या कार्पोरेट कंपन्यांसारखे आयटी सेल त्यासाठी स्थापन करण्यात आले.त्याद्वारे महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, स्वातंत्र्यलढ्यातील इतिहासाचे विकृतीकरण सोशल मीडियावर प्रसारित करण्यात येऊ लागले. (Special Article)
पूर्वीची माऊथ पब्लिसिटी करणारी कुजबुज गॅंगची द्वेषमोहिम डिजिटल झाली. या देशात हिटलर राजवटीतील गोबेल्स प्रचार मोहीम राबवण्यासाठी विशिष्ट तंत्र वापरून विरोधकांचे खच्चीकरण करण्यात आले, 2 जी स्पेक्टम, कोयला घोटाळा आणि अण्णा आंदोलन ही 2011 मधील प्रचार मोहीम गोबेल्स रणनीतीचा भाग होती.
आज कोण कोणाबद्दल काय बोलेल याचा नेम राहिलेला नाही. अति उजव्या राष्ट्रभक्तीचे नेतृत्व उदयास आणण्यासाठी देशात अच्छे दिन ईई साठी एक विशिष्ट वातावरण तयार करणे ही भारतातील निवडक क्रोनी कार्पोरेटची गरज होती.त्यासाठी समाज माध्यमे,खाजगी दुरचित्रवाहिन्या पेरोलवर काम करू लागल्या.
एकेकाळी हिटलरचे राजकीय गुरू मुसोलिनीला भेट घेणाऱ्या तथाकथित विचारधारेच्या लोकांनी 1925 पासून या देशात योजनापूर्वक बदनामीचे महान कार्य सुरू केले होते.महात्मा गांधी,नेहरू व स्वातंत्र्य लढा तसेच कम्युनिस्ट,ख्रिश्चन,मुस्लिम त्यांचे टार्गेट होते.त्या काळात माध्यमक्रांती झालेली नव्हती,पण द्वेषभावना प्रसारित करण्यासाठी कुजबुज मोहीम राबवली जात होती. (Special Article)
तरी सुद्धा या देशात नेहरू ते अटलबिहारी या काळात ‘मर्यादापुरुषोत्तम’ आणि ‘लक्ष्मणरेषा’ मान्य असलेली राजकीय सभ्य संस्कृती टिकून होती. हे दोन्ही नेते एकमेकांचे वैचारिक विरोधक होते. त्यांचे लोकसभा, राज्यसभा तसेच देशाच्या सार्वजनिक व्यासपीठावर उत्कट, अभ्यासपूर्ण वादविवाद एका मर्यादेत असायचे.जॉर्ज फर्नाडिस, मधू लिमये, आचार्य अत्रे, ज्योती बसू, मधू दंडवते, नाना साहेब गोरे, एस एम जोशी आदी नेत्यांनी आपल्या राजकीय विचारांची सभ्य भाषेत मांडणी केली होती.
महाराष्ट्र हे पुरोगामी विचारांचा वारसा असलेले राज्य आहे.यशवंतराव चव्हाण ते शरद पवार या राजकीय कालखंडात विधानसभा व सार्वजनिक जीवनात टीका टिप्पणी करताना अनेक राजकीय नेते विचार करून अभ्यास करून बोलायचे. (Special Article)
जसा राजा असतो तसा विचार अनुयायी करतात
खालच्या पातळीवर जाऊन एकमेकांची मानहानी करण्यासाठी अलीकडच्या काळात विविध साधने वापरली जातात. त्यातील एक साधन म्हणजे वाचाळवीर, त्यांना संविधानिक पदावर बसवून ठेवण्यात आले आहे, महाराष्ट्राचे माजी राज्यपाल हे त्यापैकीच होते.
शिवराय, शाहू, फुले यांचा अपमान करणारी वक्तव्ये करून त्यांनी राज्यभर उच्छाद मांडला होता. राजकारणात प्रसिद्धी, पैसा काही मंडळींच्या डोक्यात जातो. असे हे नेते अनेकदा समोरच्या व्यक्तींना गृहीत धरून बेलगाम बोलून मोकळे होतात. एका नेत्याने दुसऱ्याला कलंक म्हटले होते. ‘त्या’ दुसऱ्या नेत्याला याचा राग आला आणि त्याने पहिल्या नेत्याला मानसोपचाराची गरज असल्याचे म्हटले. शिवसेनेने भाजपा पासून काडीमोड घेतल्यापासून एक शिवराळ संस्कृती जोरदार चालू आहे. (Special Article)
भाजपामध्ये राणे कुटुंबीयांसारखे दमदार नेते,आमदार गोपीचंद पडळकर सामील झाल्यापासून अशा तिखट भाषेचे पेव फुटले आहे. संजय राऊत यांनी तर भाजप विरोधात मॉर्निंग पत्रकार परिषदा सुरू करून आपणही वाचाळवीर आहोत,असे दाखवायला सुरवात केली. मुळात ही सर्व मंडळी स्वतःच्या मतदार संघात लोकमान्य आहेत.त्यांची राजकीय कारकीर्द सुसंस्कृत विचारातून सुरू झालेली आहे.
सोशल मीडियाचा प्रभाव वाढल्यापासून प्रसिद्धीचे सर्व नियम बदलले आहेत. पूर्वी प्रसिद्धीस पावणे म्हणजे सकारात्मक प्रसिद्ध होणे, असा अर्थ होता. मात्र, सोशल मीडियावर नकारात्मक प्रसिद्धीदेखील लाभदायक असते, असे लक्षात आल्यावर काहीही बोलले तरी त्याचे संपादन न होता ते प्रसारित होऊ लागले.
त्याचे परिणाम असे झाले की, कुणी कोणाबद्दल काहीही बोलले तरी कायदा काही करत नाही, त्यामुळे बिनधास्त बोल असेच सुरू झाले. (Special Article)
वाचाळता ही आता कोणा एका विशिष्ट पक्षाची मक्तेदारी राहिलेली नाही,सर्वच पक्षांमध्ये रोज नवनवे वाचाळवीर उदयास येताना दिसतात आणि त्यांच्या वाचाळतेचे नमूने माध्यमात प्रसिद्ध होतच असतात,जनतेच्या मूळ प्रश्नांना बगल देण्यासाठी वाचाळवीरांना आवरावे असे बहुधा कोणालाच वाटत नाही.
आपल्या देशात हिंदू मुस्लिम विवाद नवा नाही. 2012 पासून या दुफळीवर आधारित राजकीय ध्रुवीकरण करण्यात आले आहे.सत्तेचे जसे वारे तसेच आहे.अमेरिका जगातील विविध माध्यमावर नियंत्रण ठेवणारे राष्ट्र आहे, त्या द्वारे ते नको असलेल्या राजकर्त्यांची सरकारे पाडण्यासाठी विशेष मोहीम राबवत असते. (Special Article)
सद्दाम हुसेन, कर्नल गडाफी यांच्या विरोधात तेथील लोकांमध्ये विखार पसरवण्यासाठी माध्यमांचा वापर सी आय ए या गुप्तचर संस्थेच्या मार्फत करण्यात आला.
इराक, सीरिया, ट्युनिशिया, लिबियातील आजचे अराजकाला माध्यमे जबाबदार आहेत. खोटे पण रेटून बोलायचे ही गोबेल्सनीती जर्मनीमध्ये हिटलरला अवतारी पुरुष म्हणून जन्माला घालण्यात यशस्वी झाली, नाझी पार्टीचा उदय दुसरे महायुद्ध आणि नंतरचा इतिहास जगाला माहीत आहे.
महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला प्रदीर्घ इतिहास आहे. महाराष्ट्राला सामाजिक, धार्मिक, राजकीय सुधारणांचा, आंदोलनांचा प्रदीर्घ इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले – सावित्रीबाई फुले, न्या.रानडे, आगरकर, वि. रा. शिंदे, डॉ.आंबेडकर आणि छत्रपती शाहू यांचा वारसा लाभलेले हे राज्य आहे. या वारशांचा प्रभाव राज्याच्या राजकीय संस्कृतीवर पडावा ही एक अपेक्षा आहे.
एकमेकांना राजकारणातून संपविण्याचे प्रयत्न, पक्षांतर्गत नेतृत्व स्पर्धा, संघटनात्मक कार्याचा अभाव, वाढती पक्षांतरे, त्वरित सत्तेची अपेक्षा यामुळे अनेक वेळा नेत्यांची वाणी प्रभावित होते,आणि प्रचाराचे मुद्दे बाजूला पडतात.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीआधी राहुल गांधींनी मोदींना ‘चौकीदार चोर हैं’ म्हटले तर नरेंद्र मोदींनी आपण चौकीदार असल्याचे म्हटले आणि त्यानंतर देशवासीयांनीही ‘मैं भी चौकीदार’ म्हणत मोदींना भरघोस पाठिंबा दिला व लाचखोरी, भ्रष्टाचाराचा विरोध केला.
तत्पूर्वी समाजवादी पक्षाच्या अखिलेश यादवांनी २०१७ च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींना ‘गुजरातचे गाढव’ म्हटले होते. त्यावर पलटवार करताना नरेंद्र मोदींनी, “गाढव आजारी असो, उपाशी असो वा थकलेले असो, ते आपल्या मालकाने दिलेले काम पूर्ण करते. सव्वाशे कोटी भारतीय माझे मालक आहेत, त्यांनी माझ्याकडून कितीही काम करवून घेतले तरी मी ते करतो, थकलेला असलो तरी करतो. कारण मी गाढवाकडून अभिमानाने प्रेरणा घेतो,”असे प्रत्युत्तर दिले होते.
खर तर या राजकीय नेत्यांनी त्यावेळचे निवडणुकीतील मुद्दे घेऊन एकमेकांच्या पक्ष धोरणाबद्दल बोलायला हवे होते. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी कठोर व कडू होत्या, मात्र जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या आंदोलनात कुठेही सभा भाषणामध्ये व्यक्तिगत टीका टिपण्णी या दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर केलेली नाही.
गोपीनाथ मुंडे यांनी शरद पवार यांच्या विरोधात जबरदस्त मोहीम उघडलेली होती तरी, या दोघांचे वाढदिवस एकाच दिवशी आणि त्या कटू वातावरणातही ते दोघे परस्परांना न चुकता वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याचा सुसंस्कृतपणा दाखवत असत.
असुसंस्कृत राजकारणी,भ्रष्ट व असंवेदनशील प्रशासन आणि भाट झालेले पत्रकार हे काही समाज निरोगी नसल्याचं लक्षण आहे. महाराष्ट्रात मैद्याचं पोते, तेल लावलेला पहिलवान, वाकड्या तोंडाचा गांधी, कोंबडीचोर, टरबूज हे चालले होतेच. परंतु गेल्या काही वर्षात हे अती असभ्य वाटावे असे प्रकार समाज माध्यमांवर चाललेले असतात. आणि ट्रोल ही कोणत्याही एका राजकीय पक्षाची मक्तेदारी राहिलेली नाही.
एका पेक्षा एक भारी. सगळ्यांकडेच यांच्या झुंडीच झुंडी तयार आहेत. राजकीय नेत्यांची विरोधकाना उद्देशून वादग्रस्त विधाने असतात. या नेत्यांच्या विधानांचा जर नीट विचार केला तर त्यामागे पद्धतशीर डावपेच दिसून येतात- म्हणजे कधी आपल्या वोटबँकेला खूश करायचे, तर कधी विरोधकांच्या वर्मावर बोट ठेवायचे, आणि नंतर त्यावर मोजक्या शब्दात त्यांचे वैयक्तिक मत असे स्पष्टीकरण देऊन विषय संपवला जातो, आणि तेच तेच लोक पुन्हा ठेका घेतल्या सारखी ती विधाने करत असतात. (Special Article)
जसा राजा असतो तसा विचार समाजात पसरवला जातो. केंद्रीय शिर्ष नेतृत्व कोणता राजकीय विचार घेऊन उदयास आले आहे, याचा अभ्यास केल्यास ट्रोलिंग करणारा भक्त संप्रदाय व वाचाळ वीर असे का वारंवार असभ्य प्रदर्शन करतात, हे सुजाण नागरिकांना समजून येईल त्यामुळे राजाने संस्कृती जपली नाही तर अराजक निर्माण होऊन समाजात हिंसक परिस्थिती निर्माण होईल.
या वाचाळवीरांचे वागणे आणि बोलणे तसेच सुरू आहे.आपण किती निर्लज्य बोलत आहोत याची पण आता कोणाला लाज वाटत नाही. माध्यमे पण मर्यादा विसरली आहेत.हा तर आपल्यासाठी एक चिंतेचा विषय होऊन बसला आहे. कोणी थोडे जरी काही केले तर विनाकारण त्या व्यक्तीला चर्चेसाठी बोलवून प्राईम टाईमला चर्चा होत आहे.महाराष्ट्रात पन्नास खोके एकदम ओके या घोषणेमूळे अनेक ठिकाणी राडे झाले होते.
अलीकडच्या काळात राज्यात विविध ठिकाणी झालेल्या दंगलीला शिवराळ प्रचार कारणीभूत ठरला आहे. राजकारणात अभिव्यक्ती स्वातंत्र्य असले तरी तिखट, तिरसट आणि तुच्छतावादी वाणीला लगाम असला पाहिजे.
सुसंगती सदा घडो,सुजन वाक्य कानी पडो, कलंक मतीचा झडो विषय सर्वथा नावडो कलंक मतीचा झडो विषय सर्वथा नावडो—या कविश्रेष्ठ मोरोपंतांनी लिहिलेल्या या पंक्ती जीवनातील सर्व क्षेत्रात एक दिशा दर्शवितात.
आपण ज्या परिस्थितीत राहतो, ज्यांच्या सहवासात राहतो, त्या सर्वांचा परिणाम आपल्या जीवनावर होत असतो.आपण ज्यांच्या संगतीत राहतो,त्यांचे राहणीमान,त्यांचे विचार, त्यांचे गुण दोष यांचा परिणाम नकळतपणे आपला स्वभाव घडवण्यावर होत असतात. त्यामुळे सभ्य राजकीय संस्कृती जपण्यासाठी वाचाळ वीरांना राजकारणातून बाजूला ठेवण्यासाठी विविध राजकीय पक्षांनी लोकशाही टिकवण्यासाठी एक वैचारिक अधिष्ठान असलेली आचारसंहिता निर्माण करावी, त्यामुळे सत्ताकारण योग्य दिशेने पुढे जाईल,असे वाटते.
क्रांतीकुमार कडुलकर–पिंपरी चिंचवड