Saturday, April 27, 2024
Homeविशेष लेखNose Ring विशेष लेख : नथ मोत्याची नाका मधी गं अंबा इतिहास

Nose Ring विशेष लेख : नथ मोत्याची नाका मधी गं अंबा इतिहास

नथ आहे नाकात म्हणून दूनिया आहे धाकात

महाराष्ट्रीयन पारंपरिक पद्धतीने पेहराव करण्यासाठी महिला ‘नऊवारी साडी’ आणि ‘मोत्यांची नथ’ आवर्जून घालतात. महाराष्ट्रीयन नथींमध्ये पेशवेकालीन नथ, मराठा नथ, ब्राम्हणी नथ, कारवारी नथ, बानू नथ असे विविध प्रकार आहेत. वास्तविक नथ हा पेशवाई संस्कृतीतील नटलेला एक अजरामर दागिना आहे. कारण प्राचीन काळापासून ते आजतागायत या दागिन्याचा नखरा मुळीच कमी झालेला नाही. मात्र या सर्व नासिकाभूषणांमध्ये उठून दिसते ती नथच. नथीमुळे स्त्री च्या सौंदर्यांमध्ये अधिकच भर पडते. नथ घालून नाक मुरडून दाखविण्यात एक वेगळीच मौज असते.(Nose Ring)

नथ किंवा “कारवारी नथ” ही कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र या मराठी मुलखांत खूप प्रचलित आहे. या दागिन्याला मोत्याचा  साज असतो. नथीमध्ये बहुधा दुर्मिळ असे “बसरा मोती” असतात. नथ सुशोभित करण्यासाठी मोत्यासोबत पाचू आणि माणिक ही रत्‍नेदेखील वापरली जातात.पूर्वीपासून स्त्रिया नाकात नथ घालतात. नथ हा अलंकार स्त्रियांचा जिव्हाळ्याचा दागिना आहे. पिवळेधम्मक मोती आणि लाल, हिरव्या आणि पांढऱ्या हिऱ्यांनी आणि मोत्यांनी गुंफलेला एक अप्रतिम दागिना म्हणजे नथ. मात्र काळानुरूप नथीचे आकार आणि प्रकार यामध्ये अनेक बदल झालेले आहेत. पूर्वीच्या काळी मोठ्या मोठ्या आकाराच्या आणि जड वजनाच्या नथी वापरल्या जायच्या. आता सुधा या दागिन्याला तेवढेच महत्व लाभले आहे.(Nose Ring)



पूर्वी नथ हा अलंकार आपल्या समाजात अज्ञात होता. नाकातील दागिन्यांचा उल्लेखही प्राचीन साहित्यात फारसा आढळत नाही. हजारो वर्ष जुन्या मूर्ती आणि पेंटिंग्जमध्ये स्त्रिया डोके ते पायापर्यंत अनेक दागदागिने परिधान केलेल्या आढळतात, पण नाकात काहीही सापडत नाही. अगदी चित्रकार राजा रविवर्माच्या चित्रातील शकुंतलेच्या नाकातही महाराष्ट्रीयन युवतीची नथ नाही. भारतातील परंपरागत हिंदू महाकाव्ये आणि पुराणांतील कथांवर रविवर्माने काढलेली चित्रे आजही प्रमाण मानली जातात.(Nose Ring)



स्त्रियांच्या नाकाला टोचणे आणि त्यात दागिने घालण्याची प्रथा

संस्कृत वाङ्मयात देखील नायिकेच्या आपादमस्तकाचे अलंकारांचं (jewelry) वर्णन कवींनी केलेलं आहे, पण गंमत अशी की एकाही नासिकालंकाराचा त्यात उल्लेख नाही. ही आपली परंपरा नाही, याचा पुरावा देखील आहे. म्हणून, हे निःसंकोचपणे म्हणता येईल की स्त्रियांच्या नाकाला टोचणे आणि त्यात दागिने घालण्याची प्रथा नंतर नंतर सुरू झाली. सुप्रसिद्ध इतिहासकार डॉ. भागवत शरण उपाध्याय असे प्रतिपादन करतात की प्राचीन काळापासून जगभरात सांस्कृतिक देवाणघेवाण होत आहे आणि आज भारतीय वधूच्या नाकातील “नथ” ही या प्रक्रियेचाच परिणाम आहे.(Nose Ring)


‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटातील काशीबाई साकारण्यासाठी प्रियांका चोप्राने जी नथ घातली होती, ती नंतर फार लोकप्रिय झाली. तसेच काही दिवसांपूर्वी ‘नथीचा नखरा’ देखील सोशल मीडियावर धुमाकूळ घालत होता. नथ हा प्रकार ईजिप्तच्या रानटी टोळ्यांकडून अरबी लोकांकडे गेला. बायबलच्या ‘ओल्ड टेस्टॅमेंट’ मध्ये कर्णालंकार आणि नासिकालंकार या दोन्हीचे तुरळक उल्लेख आढळतात. काहीही असलं तरी भारताच्या ( INDIA ) कानाकोपऱ्यातील वेगवेगळ्या संस्कृतीत नासिकालंकाराचं अस्तित्व हे गेल्या हजार वर्षांचच आहे. संस्कृतमध्ये इतके अलंकार सांगितले आहेत, पण त्यात नथीचा उल्लेख नाही.(Nose Ring)

श्रीमंतीचा तोरा दाखवत होती नथ

9 व्या आणि 10 व्या शतकात नथीची प्रथा वाढली आणि ती स्त्रीच्या वैवाहिक जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनली. राजे, मंत्री आणि श्रीमंत कुटुंबातील बायका आपली संपत्ती आणि उच्च आर्थिक स्थिती दर्शविण्यासाठी मोत्या, नीलमणी आणि कुंदनसहित सोन्याची नथ परिधान करत. 15 व्या शतकात सोन्याच्या दागिन्यांच्या  वापरामध्ये वाढ झाल्यामुळे नथींचे आकार आणि डिझाइनमध्ये वैविध्यपूर्णता आली होती.(Nose Ring)


मध्य पूर्व (MIDDLE EAST) हे नाकपुडीचे जन्मस्थान आहे, ज्यामध्ये नाकपुडी छेदण्याची पहिली नोंद ४,००० वर्षांपूर्वीची आहे. उत्पत्तीच्या पुस्तकात, अब्राहमचा सेवक तरुण रिबेकाला तिचा भावी पती, इसहाक याच्या वतीने लग्नाचे अर्पण म्हणून दागिने भेट देतो. भेटवस्तू आणि ट्रिंकेट्समध्ये “शान्फ” नावाचे सोन्याचे कानातले होते, ज्याला नाकाची अंगठी असेही म्हणतात.

भारतीय संस्कृती ही पूर्वी स्त्रीप्रधान होती व सामायिक कुटुंब पद्धतीत राहणारी होती. स्त्री कुटुंबाचे सर्व व्यवहार हाताळीत असे, स्त्रियांना वेगवेगळे सोने, चांदी इ. धातूने बनविलेल्या आभूषणे परिधान करण्याची मुभा होती जसे आजच्या काळातसुद्धा आहे. जन्मानंतर लहान बाळाचे पूर्ण शरीर कापडाने बरेच मोठी होई पर्यंत झाकलेली ठेवत असत त्यामुळे स्त्री म्हणून त्वरित व्यक्तीची ओळख व्हावी म्हणून तिचे नाक टोचायची व रूप खुलून दिसावं म्हणून त्यात आभूषणांचा वापर करण्याची प्रथा रूढ होत गेली तीच कालांतराने भारतीय संस्कृती मध्ये नाकात अलंकार असलेली सुसंस्कृत स्त्री म्हणून तिची ओळख जगविख्यात झाली…

नाकात नथ आणि कपाळाला टिकली या भारतीय स्त्रीच्या पारंपरिक रूपाची भुरळ साऱ्या विश्वाला पडली आहे. अनेक परदेशी महिला सुद्धा या रूपात सोशल मीडियावर पाहायला मिळतात. कितीही पाश्चिमात्य कपड्यांचा ट्रेंड आला तरी नथीने येणारा क्लासिक लुक कधीक कालबाह्य होणार नाही. मागील कित्येक वर्षात नथींच्या अनेक डिझाईन बाजारात आल्या. अलीकडे मोत्याच्याच नव्हे तर ऑक्सिडाइज किंवा चांदीच्या नथी किंवा नोजपिन सुद्धा वापरल्या जातात. काही भागात नोज पिन (Nose Ring) ही दोन्ही नाकपुड्यांवर तर काही ठिकाणी नाकाच्या मधील हाडावर सुद्धा घातली जाते पण तुम्हाला माहित आहे का तुमच्या डाव्या नाकपुडीवर नथ घातल्यास केवळ रूपातच नाहीतर आरोग्यातही मोठे बदल दिसून येतात. म्हणूनच तर नथ आहे नाकात, म्हणून दूनिया आहे धाकात’


संकलन : क्रांतीकुमार कडुलकर
पिंपरी चिंचवड

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय