नवी दिल्ली : दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये रविवारी झालेल्या आशिया कप मालिकेत भारताने पाकिस्तानवर ५ गडी राखून रोमांचक विजय नोंदवला. या विजयात हार्दिक पांड्या, विराट कोहली, रवींद्र् जडेजा, भुवनेश्वर कुमार अगदी नव्याने दाखल झालेल्या अर्षदीप सिंग यानेही उल्लेखनीय कामगिरी केली.
आशिया कप मालिकेच्या या सामन्यानंतर आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा मुलगा आणि बीसीसीआयचे सचिव असणाऱ्या जय शहा यांचा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी जय शहा यांना धारेवर धरले आहे. या व्हिडिओ मध्ये भारताच्या विजयानंतर दुबईच्या स्टेडियममध्ये जल्लोष सुरु झाला. याच जल्लोषावेळी जय शहा यांच्या शेजारी असणाऱ्या व्यक्तीने शहा यांच्या हातात तिरंगा देण्याचा प्रयत्न केला, मात्र जय शहा यांनी तो घ्यायला नकार दिल्याचे व्हिडिओत दिसत आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
यावरून शहा यांना नेटकऱ्यांनी ट्रोल केले आहे. एका बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा मोहीम राबविली असताना ही घटना समोर आली आहे.