Friday, April 26, 2024
Homeराज्यमुंबई सह राज्यात मुसळधार पाऊस, धरणांतील पाणीसाठ्यात वाढ

मुंबई सह राज्यात मुसळधार पाऊस, धरणांतील पाणीसाठ्यात वाढ

मुंबई :- मुंबईत बहुतांश ठिकाणी पाऊस थांबला असून कालच्या पावसानं साठलेलं पाणी आता ओसरत असून, रात्रभर अडकून पडलेले नागरिक घराकडे परतत आहेत. दक्षिण मुंबईत वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली असल्यानं काही ठिकाणी ते कापून रस्ते मोकळे करण्यात येत आहेत. 

कोकण, मध्य महाराष्ट्रात काल मुसळधार पाऊस झाला. मुंबईत काल १२ तासात हंगामातल्या आतापर्यंतच्या सर्वाधिक पावसाची नोंद झाली. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई आणि परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा काल आढावा घेतला. नागरिकांनी सावधानता बाळगावी आणि अत्यावश्यक कारणांसाठीच घराबाहेर पडावं, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. नागरिकांना जिथे गैरसोय होते आहे किंवा खंडित वीज पुरवठा, झाडे पडणे, साचलेले पाणी याविषयी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

रायगड जिल्ह्यातली पूरस्थिती काल सलग तिसऱ्या दिवशी कायम होती. जोरदार वादळी वारे आणि कोसळणारा पाऊस यामुळे आंबा, कुंडलिका आणि सावित्री या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. श्रीवर्धन – माणगाव मार्गावरील घोणसे घाटात दरड कोसळल्याने हा रस्ताही बंद पडला आहे. 

सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यात कालही पाऊस सुरुच होता.  

सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेले दोन दिवस सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे प्रमुख नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. 

रत्नागिरी जिल्ह्यात घाटमाथ्यावर पावसाचं प्रमाण अधिक असल्यानं जिल्ह्यातल्या नद्या मात्र धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत.

सांगली जिल्ह्यातल्या चांदोली परिसरात काल मुसळधार पाऊस झाला. वारणा धरणाची पाणी पातळी ३२ तासात चार मीटरनं वाढली. कोल्हापूर जिल्ह्यातही काल जोरदार पाऊस झाल्यानं पंचगंगा, कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. सातारा जिल्ह्यात कोयना धरण पाणलोट क्षेत्रासह जिल्ह्याच्या विविध भागात काल मुसळधार झाला. पाटण तालुक्यातल्या अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातल्या सिल्लोड शहरातही काल मुसळधार पाऊस झाला. पैठण तालुक्यातल्या पाचोड इथल्या गल्हाटी नदीला पूर आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवरुन सपंर्क साधून मुंबईसह राज्यातल्या इतर भागात सुरु असलेल्या पावसाचा आढावा घेतला. केंद्राकडून राज्याला सर्व प्रकारची मदत दिली जाईल, असं आश्वासन त्यांनी दिलं.  

दरम्यान, मुंबईसह कोकण आणि मध्य महाराष्ट्रात आजही मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. आपत्तीत मदत करण्यासाठी राज्यात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या १५ तुकड्या तैनात करण्यात येणार आहेत. यापैकी मुंबई आणि साताऱ्यात प्रत्येकी पाच, कोल्हापूरमध्ये चार, सांगलीत दोन, तर ठाणे पालघर आणि नागपूर इथं प्रत्येकी एक तुकडी तैनात करण्यात येणार आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय