Sunday, December 8, 2024
Homeराजकारणसरकार पाडण्याच्या कारस्थानात राज्यपालही सहभागी, माकपचा आरोप; महाविकास आघाडीला पाठिंबा 

सरकार पाडण्याच्या कारस्थानात राज्यपालही सहभागी, माकपचा आरोप; महाविकास आघाडीला पाठिंबा 

मुंबई : भ्रष्ट मार्गाने जमा केलेला प्रचंड पैसा आणि केंद्रीय तपासयंत्रणा यांचा गैरवापर करून महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार उलथून टाकण्याचे भारतीय जनता पक्षाचे कारस्थान आता उघड झाले आहे. या कारस्थानात राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी सहभागी असल्याचा आरोप मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने केला आहे. तसेच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि आमदार विनोद निकोले महाविकास आघाडीच्या पाठीशी असून उद्या बहुमत चाचणीत माकपचे आमदार विनोद निकोले महाविकास आघाडीला पाठिंबा देणार आहेत.

राज्यपालांनी तातडीने ३० जून रोजी सभागृहात बहुमत सिद्ध करण्याचा महाविकास आघाडीला आदेश देत महाराष्ट्राचे राज्यपाल या कारस्थानात सहभागी झाल्याचे दिसून येते. विधान परिषदेच्या १२ आमदारांची आणि नियमित सभापतींची नियुक्ती करण्यात दीर्घकाळ आडवे येणाऱ्या राज्यपालांचा हा आदेश संविधानाची हत्या करणारा असल्याचे माकपचे राज्य सचिव डॉ. उदय नारकर यांनी म्हटले आहे.

संविधानातील लोकशाही, धर्मनिरपेक्षता आणि संघराज्य प्रणालीचे रक्षण करण्यासाठी, महाराष्ट्राचा सन्मान राखण्यासाठी केंद्रातील भाजपच्या फॅसिस्ट व धर्मांध एकाधिकारशाहीला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष नेहमीच कसून विरोध करत आला आहे आणि यापुढेही करत राहणार असेही म्हटले आहे.

जेव्हा महाविकास आघाडीचे सरकार विधानसभेला सामोरे जाईल तेव्हा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार कॉ. विनोद निकोले वरील मूल्यांचे रक्षण करण्यासाठी महाविकास आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे राहून तिच्या सरकारच्या समर्थनार्थ मतदान करतील, असेही डॉ. नारकर यांनी स्पष्ट केले.

संबंधित लेख

लोकप्रिय