Friday, April 26, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडपिंपरी चिंचवड : पैसे घेऊन परस्पर गाळे वाटप करणाऱ्यांवर खंडणीचे गुन्हे दाखल...

पिंपरी चिंचवड : पैसे घेऊन परस्पर गाळे वाटप करणाऱ्यांवर खंडणीचे गुन्हे दाखल करण्याची मागणी

  • कृष्णानगर भाजी मंडई येथील फळ विक्रेत्यांची मागणी
  • फ क्षेत्रीय कार्यालयावर टपरी, पथारी, हातगाडी पंचायतचे आक्रमक धरणे आंदोलन

पिंपरी चिंचवड : ‘फ’ क्षेत्रीय अधिकारी यांच्यासह इतर मध्यस्थांवर खंडणीचे गुन्हे दाखल करा अशी मागणी कृष्णानगर भाजी मंडई येथील फळ विक्रेत्यांनी केली आहे. टपरी, पथारी, हातगाडी पंचायतीचे अध्यक्ष बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली चिखली पोलीस स्टेशन येथे निवेदन देण्यात आले. या वेळी संघटनेचे पदाधिकारी, फळ विक्रेते उपस्थित होते.

यावेळी टपरी, पथारी, हातगाडी पंचायतचे अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे, बळीराम काकडे, सरचिटणीस प्रकाश यशवंते, इस्माईल बागवान, रंजना दातीर, भाग्यश्री शेलार, सचिन पवार, पल्लवी दाखले, संजय चव्हाण, गुडीया यादव, रेश्मा सय्यद, सोनल फराटे, सोमनाथ कांबळे, अश्विनी जाधव, हिराबाई चौरे, महावीर घोडके, कैलास डूकळे, देव अम्मा धोत्रे, आदींसह फळभाजी विक्रेत्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

संघटनेच्या वतीने आक्रमक आंदोलन करत फ क्षेत्रीय कार्यालयावर तासभर धरणे आंदोलन केले. यावेळी अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांच्या मध्यस्थीनंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.

निवेदनात नमूद केले आहे की, कृष्णानगर येथील भाजी मंडई गाळे वाटपामध्ये तसेच घरकुल येथील गाळे वाटपामध्ये अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर पैसे घेतले आहेत. गाळे वाटपासाठी मध्यस्थी व्यक्ती नेमून पैसे घेऊन गाळ्यांचे वाटप केले आहे. यामध्ये खरे व्यवसाय करणाऱ्या गोरगरीब, कष्टकऱ्यांनी पैसे न दिल्यामुळे त्यांना गाळे वाटप करण्यात आले नाही. ज्यांचा या व्यवसायाशी काही संबंध नाही, जे येथे व्यवसाय देखील करत नाहीत, अशा व्यक्तींना गाळे वाटप करून गोरगरीब, कष्टकरी मागासवर्गीयांवरती अन्याय केला आहे. मध्यस्थांनी प्रत्येक गाळेधारकाकडून ५० हजार रुपये वसूल करून ते संबंधित अधिकारी यांच्यामार्फत पोचवले आहेत. यामुळे गाळे वाटपामध्ये पैसे खाणाऱ्या तथाकथित एजंट वरती खंडणीचे गुन्हे दाखल करावेत, अशी तक्रार टपरी, पथारी, हातगाडी पंचायतीच्या वतीने चिखली पोलीस स्टेशन येथे करण्यात आली.

यावेळी बाबा कांबळे म्हणाले की, आम्ही महानगरपालिका आयुक्त राजेश पाटील, अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ व संबंधित अधिकार्यां शी अनेक वेळा चर्चा केली. त्यानंतर देखील गोरगरिबांना गाळे मिळत नाही, ही अत्यंत खेदाची बाब आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार झाला आहे. त्यामुळे असा गैरव्यवहार करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. याबाबत त्वरित दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा या वेळी देण्यात आला.

संपादन – क्रांतिकुमार कडुलकर

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय