घोडेगाव : आंबेगाव तालुक्यातील आदिवासी दुर्गम भागात असलेले म्हाळुंगे तर्फे आंबेगाव या गावात मागील तीन वर्षे डॉ.शेखर बेंद्रे आरोग्य केंद्र हे दर रविवारी मोफत आरोग्य सुविधा पुरविते. याबरोबरच सातत्याने विविध तज्ञ डॉक्टर यांचे शिबिरे ही आयोजित केली जातात.
नुकतेच या आरोग्य केंद्राच्या वतीने मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामध्ये पाटण, कुशिरे, पिंपरी, म्हाळुंगे तर्फे आंबेगाव या परिसरातील अनेक आदिवासी बांधवानी आपल्या डोळ्यांची तपासणी करून घेतली. यावेळी रुग्णांना मोफत औषधे ही देण्यात आले. तसेच यावेळी एकूण २० रूग्णांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले.
डॉ.शेखर बेंद्रे, आरोग्य केंद्रात कायमस्वरूपी नेत्रचिकित्सा करता यावी म्हणून डॉ.बबन डोळस यांच्या वतीने नेत्र तपासणी करणारी आधुनिक उपकरणे याठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहे. रुग्णांची तपासणी, पिंपरी चिंचवड शहरातील नेत्ररोगतज्ञ डॉ. बबन डोळस, स्त्रीरोगतज्ञ डॉ. अनुराधा डोळस, तसेच डॉ. ऋतुजा कांबळे, डॉ. पेनी यांनी केली.
या शिबिराचे स्थानिक संयोजन किसान सभा, आंबेगाव तालुका समितीच्या वतीने करण्यात आले होते. या शिबिराप्रसंगी किसान सभेचे कृष्णा वडेकर, हिरा पारधी, शंकर काठे व अशोक जोशी हे उपस्थित होते.