मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमपीएससी, यूपीएससी विद्यार्थ्यांसंदर्भात महत्वाची घोषणा केली आहे. खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) ची स्थापना केली आहे. अमृत संस्थेमार्फत या घटकांच्या उन्नतीसाठी शैक्षणिक योजना, स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच नोकरीसाठी इच्छुक युवकांसाठी यूपीएससी, एमपीएससीचे अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी संस्थेला यावर्षी 150 कोटी रुपये देणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमृत संस्थेच्या अडीअडचणी आणि भविष्यातील योजनांबाबत आढावा बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते. तसेच अमृत संस्थेचे कामकाज प्रभावीपणे व्हावे यासाठी व्यवस्थापकीय संचालक या पदासह इतर पदांची निर्मिती करण्यात आली आहे. अमृत संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांनी संस्थेच्या भविष्यातील योजनांची माहिती यावेळी सादरीकरणाद्वारे दिली.
या संस्थेची स्थापना करण्यामागचा उद्देश म्हणजे, खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी अभ्यासक्रम, परिषद, व्याख्याने, चर्चासत्रे आयोजित करणे आणि सुलभ करणे आणि पुस्तके, जर्नल्स आणि शोधनिबंध प्रकाशित करणे, स्पर्धात्मक परीक्षांसाठी अभ्यास केंद्रे स्थापन करणे, विविध व्यवसाय, उद्योग विकास असा आहे.