इंदूर : गेल्या वर्षी भारत जोडो यात्रा मध्य प्रदेशात दाखल होण्यापूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. याप्रकरणी गुरुवारी एका ६० वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.
भारत जोडो यात्रा मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये दाखल होताच राहुल गांधींना बॉम्बने उडवण्याची धमकी पत्राद्वारे देण्यात आली होती. इंदूरमधील एका मिठाईच्या दुकानाबाहेर हे पत्र सापडले होते. नोव्हेंबर 2022 मध्ये हे पत्र सापडल्यानंतर लगेचच, अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम 507 अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला होता. आता हे पत्र पाठवल्याचा आरोप असलेल्या एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. दयासिंग उर्फ ऐशीलाल झाम असे या इसमाचे नाव आहे. त्याला राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत अटक करण्यात आली असून तो रेल्वेने पळून जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
दरम्यान, पोलीस उपायुक्त (गुन्हे शाखा) निमिष अग्रवाल यांनी सांगितले की, जिल्हा प्रशासनाने झामला एनएसए अंतर्गत तुरुंगात टाकण्याचा आदेश जारी केला आहे. अग्रवाल म्हणाले की, आरोपीने राहुल गांधींना पत्र का पाठवले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही नसून चौकशी सुरू आहे.