जुन्नर (प्रतिनिधी):-ग्रामपंचायत आंबे पिंपरवाडीचे माजी सरपंच श्री सावळे गुरुजी यांचा नैसर्गिक मृत्यु झाल्याने रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी शुक्रवार दिनांक 29 मे रोजी मतदान पार पडले. या अत्यंत अटीतटीच्या झालेल्या लढतीत कॉम्रेड मुकुंद पांडुरंग घोडे विजयी झाले. श्री सावळे गुरुजी यांचे निधन झाल्याने उर्वरित 7 सदस्यांपैकी 2 सदस्य हे सरपंच पदासाठी इच्छुक होते, दोन्ही उमेदवारांकडे प्रत्येकी 3 सदस्य होते व एक सदस्य हा तठस्थ राहिल्याने पेच निर्माण झाला होता, परंतु शेवटी चिट्ठी पद्घत करुन कॉम्रेड मुकुंद घोडे हे विजयी झाल्याचे निवडणूक अधिकारी यांनी घोषित केले. स्वातंत्र्याच्या 70 वर्षानंतर प्रथमच गावाला तरुण होतकरु व उच्च शिक्षित सरपंच मिळाल्याने ग्रामस्थांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.
मुकुंद घोडे हे 24 वर्षाचे असून उच्चशिक्षित आहेत. त्यांनी पुणे विद्यापीठातुन M.A.इकॉनॉमिक्स हि पदवी प्राप्त केली आहे. विद्यार्थी दशेपासुन ते SFI या विद्यार्थी संघटनेत काम करत होते आता ते मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सभासद आहेत.
त्यांच्या रूपाने जुन्नर तालुक्यात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने प्रथमच आपला झेंडा फडकवला असल्याचे बोलले जात आहे. तब्बल 37 वर्षानंतर पिंपरवाडी या महसूली गावाला सरपंच पद मिळाल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.