Friday, November 22, 2024
Homeग्रामीणसहायक पशुधन विकास अधिकारी व पशुधन पर्यवेक्षक बेमुदत संपावर

सहायक पशुधन विकास अधिकारी व पशुधन पर्यवेक्षक बेमुदत संपावर

चांदवड (सुनिल सोनवणे) : पशुचिकित्सा व्यावसायिक संघटनेच्या सेवाविषयक व आर्थिक लाभाच्या न्याय मागण्या प्रलंबित असल्याने पशुचिकित्सा व्यवसायी संघटना शाखा नाशिकचे सर्व सहायक पशुधन विकास अधिकारी व पशुधन पर्यवेक्षक हे दि 1/8/2021 पासून बेमुदत संपावर गेले आहेत. 

याबाबत सविस्तर वृत्त असे की, पदवीधर पशुवैद्यकांप्रमाणेच जनावरांवर उपचार करण्याचे अधिकार मिळावे, या मागणीसाठी ‘नियमानुसार काम’ आंदोलन करणाऱ्या राज्यभरातील सर्व पदविकाधारक पशुवैद्यक रविवारपासून बेमुदत संपावर गेले आहेत. त्यामुळे राज्यभरातील सुमारे ८ कोटी पशूंच्या चिकित्सेवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

पदविकाप्राप्त डॉक्टरच सध्या राज्यातील ग्रामीण भागात पशुचिकित्सेचे काम करीत आहे. शासनाच्या अनेक दवाखान्याचे प्रमुखही पदविकाधारक पशुवैद्यक आहेत. मात्र त्यांना नियमाप्रमाणे पदवीधर डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली व सल्ल्यानेच उपचाराचे अधिकार आहेत. अनेक वर्षांपासून सर्व प्रकारचे उपचार करीत असतानाही शासनाने त्यांना पूर्ण उपचाराचे अधिकार बहाल केले नाही. ते मिळावे म्हणून त्यांचे जून महिन्यापासून आंदोलन सुरू आहे. मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास १ ऑगस्टपासून बेमुदत संपावर जाऊ, असा इशारा पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेने यापूर्वीच दिला होता. मात्र शासनाने त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे त्यांनी १ ऑगस्टपासून बेमुदत संपावर गेले आहेत. पदविका डॉक्टर पंचायत समिती किंवा पशुचिकित्सालयापुढे धरणे देतील, असे या संघटनेचे म्हणणे होते.

या संबंधीचे निवेदन गट विकास अधिकारी चांदवड व तहसीलदार यांना देण्यात आले आहे. या निवेदनावर व्ही एम पाटील, एस डी अहिरे, एस बी बच्छाव, वाय एच गायकवाड, आर एल जावरे, जिल्हा सरचिटणीस अजय ठोके, बाळू वानखेडे, तुषार सोनवणे, गौतम कापडणीस, प्रकाश जाधव, अर्जुन गांगुर्डे, अमोल जाधव, अमोल काळे, गेनू बरकले यांचेसह तालुक्यातील पशुधन पय॔वेक्षक यांच्या स्वाक्षरी आहेत.

संबंधित लेख

लोकप्रिय