Thursday, April 25, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडपिंपरी चिंचवड : महावितरणने पारावरच्या प्राचीन पिंपळ वृक्षाच्या फांद्या तोडल्या, आयुक्तांकडे चौकशी...

पिंपरी चिंचवड : महावितरणने पारावरच्या प्राचीन पिंपळ वृक्षाच्या फांद्या तोडल्या, आयुक्तांकडे चौकशी करण्याची मागणी

पिंपरी चिंचवड : चिंचवड गावातील वाल्हेकर वाडी येथील १५० वर्षे वयाच्या पिंपळाच्या वृक्षाच्या विस्तारलेल्या फांद्यांची महावितरणने दोन आठवड्यापूर्वी छाटणी केली आहे. मुंजोबाचे देवस्थान असलेल्या या एकमेव पिंपळ वृक्षाच्या एका बाजूच्या सर्व फांद्या महावितरणने तोडल्या आहेत.

 

महावितरणच्या मोठ्या उच्च दाबवाहीनीला पिंपळाचा विस्तार अडथळा ठरत असल्याने या फांद्या तोडण्यात आल्याची माहिती नागरिकांनी दिली.

वाल्हेकरवाडी येथील जेष्ठ नागरिक हरिभाऊ चिंचवडे आणि अशोक चिंचवडे यांनी सांगितले की, आमच्या जन्माच्या आधी पासून हा पिंपळ वृक्ष आहे. पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून असे प्राचीन वृक्ष माणसाच्या जीवनात प्राणवायू देतात. बिजलीनगर येथे एक मोठे नांदुलकी नावाने प्रसिद्ध असलेले वडाचे झाड होते, चार दशकांपूर्वी तिथे राज्य विद्युत मंडळाने पॉवर हाऊससाठी जागा ताब्यात घेतल्यावर ते वडाचे मोठे झाड भुईसपाट करण्यात आले.

 

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पर्यावरण विभागाचे क्रांतिकुमार कडुलकर यांनी सांगितले की, शहरातील प्राचीन वृक्ष रस्ता रुंदीकरण आणि शहर विकासाच्या प्रक्रियेत बेलगाम तोडण्यात आले, चिंचवडगाव पुणे जुन्या औंध मार्गावरील वड, पिंपळाची ब्रिटिश काळातील झाडे तोडण्यात आली. आम्ही मनपाच्या पर्यावरण विभागाकडे विशेष निवेदन देऊन  शहरातील प्राणवायू देणाऱ्या झाडांचे जतन करा, तसेच ७० टक्क्यांहून जास्त ऑक्सिजन देणाऱ्या वड, पिंपळ या झाडाचे प्रत्येक प्रभागात पार निर्माण करा, अशी मागणी केलेली आहे. 

जगामध्ये हवेचे प्रदूषण वाढून उष्मांक वाढत आहे, कोरोना काळात ऑक्सिजनची किंमत कळली आहे. तरी सुद्धा शहरातील अनेक प्राचीन वृक्षाची मनपाने गणना केलेली नाही, वृक्ष अडथळे ठरत नसतात, टॉवर लाईन, रस्ते वळवून प्रशासनाला पिंपळ वृक्ष वाचवता येत नाहीत काय? वाल्हेकरवाडीतील या पिंपळ वृक्षाची छाटणी करून महावितरणने पर्यावणाचा नाश केला आहे, आणि त्या प्राचीन झाडाला वेदना दिलेल्या आहेत, आयुक्त साहेबांनी पिंपळ वृक्षाला जीवदान देऊन त्या वृक्षाभोवतालची जमीन संरक्षित करावी, तसेच शहरातील जुन्या वृक्षाना ओळखपत्र देऊन त्याचा इतिहास उद्यान, स्थापत्य, पर्यावरण विभागाकडे ठेवावा, अशी मागणी माकपचे क्रांतिकुमार कडुलकर यांनी केली आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय