Friday, November 22, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवड73 हजार 207 मालमत्ता धारकांकडे 700 कोटींची थकबाकी "या" तारखेपासून जप्ती प्रक्रिया...

73 हजार 207 मालमत्ता धारकांकडे 700 कोटींची थकबाकी “या” तारखेपासून जप्ती प्रक्रिया होणार सुरू

थकबाकीदारांचे धाबे दणाणले ; थकीत कर भरून जप्ती टाळा, महापालिकेचे आवाहन

पिंपरी-चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर
: शहरातील 25 हजार रुपयांहून अधिक थकबाकी असलेल्या 73 हजार 207 मालमत्ता धारकांनी त्वरित कराचा भरणा करावा. अन्यथा 24 जुलैपासून मालमत्ता जप्ती मोहीम हाती घेण्यात येणार असल्याचा इशारा महापालिकेच्या कर संकलन व कर आकारणी विभागाच्या वतीने दिला आहे. त्यामुळे आता जप्ती पथके तयार ठेवली असून सात दिवसांचा शेवटचा अल्टीमेटम दिल्याने थकबाकीदारांचे धाबे दणाणले आहेत. वारंवार पाठपुरावा करून, आवाहनाची वेगवेगळी माध्यमे वापरूनही अनेक मालमत्ता धारक हे पालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद देत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे मालमत्तांची जप्ती करणे, त्यांचा लिलाव करणे, नळ कनेक्शन कट करणे याशिवाय पालिकेला पर्याय उरलेला नाही.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर संकलन व कर आकारणी विभागाच्या वतीने मालमत्ता धारकांसाठी 30 जूनपर्यंत संपूर्ण कराचा भरणा केल्यास किमान दहा टक्के व कमाल 20 टक्के सवलत मिळत होती. या सवलत योजनांचा तीन लाखांपेक्षा अधिक मालमत्ता धारकांनी लाभ घेतल्या. त्यामुळेच महापालिकेच्या इतिहासात प्रथमच पहिल्या तिमाहीत 447 कोटींचा कर पालिका तिजोरीत जमा झाला.

शहरातील 31 मार्च 2023 अखेर 25 हजारापेक्षा जास्त थकबाकी असणाऱ्या 73 हजार 207 मालमत्ता आहेत. या मालमत्ता धारकांकडे तब्बल सातशे कोटी रुपयांचा कर थकीत आहे. हा कर वसूल करण्यासाठी विभागाच्या वतीने एसएमएस, कॉलिंग, रिक्षाव्दारे जनजागृती, होर्डिंग आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली. जप्ती पूर्व नोटीसाही बजावल्या होत्या. तसेच थकबाकीदारांना कस्टमाईज मॅसेज पाठविण्यात आले होते. त्यामुळे 7 हजार 270 मिळकत धारकांनी पार्ट अथवा संपूर्ण पेमेंट असे 60 कोटी 88 लाख रुपयांचा भरणा केला आहे.

जप्ती मोहीम राबविण्यासाठी पथके सुसज्ज

24 जुलैपासून एकत्रित जप्ती मोहीम हाती घेण्यात येणार आहे. कर संकलन विभागाचे कर्मचारी, मीटर निरीक्षक, मंडलाधिकारी, सहाय्यक मंडालाधिकारी, एमएसफ जवान यांचे पथके सुसज्ज करण्यात आली आहेत. यावेळी मीटर निरीक्षक आणि प्लंबर यांची पथकाला जोड मिळाल्यामुळे जप्ती कारवाई अधिक तीव्र आणि परिणामकारक होणार आहे.

24 जुलै पासून कारवाई सुरू

25 ते 50 हजारांपुढील थकबाकीदारांना 21 जुलैपर्यंत नोटीसा देणार आहेत. शहरात 25 ते 50 हजारांपुढील 29 हजार 100 मालमत्ता आहेत. यांच्याकडे तब्बल 110 कोटी रुपयांचा कर थकीत आहे. या थकबाकीदारांना 21 जुलैपर्यंत नोटीसा बजावल्या जाणार आहेत. त्यानंतर 24 जुलैपासून जप्ती मोहीम राबविण्यात येणार आहे.

50 हजार रुपयांच्या पुढील थकबाकीदारांची जप्ती अधिपत्रे तयार

50 हजार रुपयांच्या पुढे थकबाकी असलेल्या 44 हजार 107 मालमत्ता आहेत. यांच्याकडे 652 कोटींचा कर थकीत आहे. या थकबाकीदारांची अधिपत्र तयार असून याची अंमलबजावणी 24 जुलैपासून करण्यात येणार आहे. त्यामुळे मालमत्ता जप्तीची अथवा नळ कनेक्शन तोडण्याची अप्रिय कारवाई टाळण्यासाठी मालमत्ता धारकांनी आपला थकीत कर त्वरित भरून पालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन कर संकलन व कर आकारणी विभागाचे सहाय्यक आयुक्त नीलेश देशमुख यांनी केले आहे.

या आर्थिक वर्षांपासून आपण मालमत्ता कर आणि पाणीपट्टी यांचे एकात्मिकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. कर संकलन विभागाची गत वर्षीची प्रभावी कामगिरी बघून पाणीपट्टी वसुलीचे कामकाज या विभागाकडे सोपविण्यात आले आहे. यंदा मालमत्ता कर आणि पाणीपट्टी वसुली उत्तम होईल अशी अपेक्षा आहे. एकूणच महापालिकेची कर प्रणाली एकात्मिक, लोकाभिमुख, कार्यक्षम करणे आणि त्यातून महापालिका आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे हे मुख्य उद्दिष्ट आहे.

शेखर सिंह, आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

यावेळी कर संकलनाच्या जप्ती पथकाबरोबर मीटर निरीक्षक आणि प्लंबर सोबत असल्याने कारवाई अधिक परिणामकारक होईल. यावेळी मालमत्ता जप्त करणे आणि नळ कनेक्शन कट करणे या कारवाया बरोबरीने करण्यात येतील. मालमत्ता कराबरोबर पाणी पट्टी वसुली करण्यावर भर राहील.

नीलेश देशमुख, सहायक आयुक्त, कर आकारणी व कर संकलन विभाग

हे ही वाचा

अभिनेता अभिषेक बच्चन राजकारणात प्रवेश करणार ? ‘या’ पक्षात होणार सहभागी चर्चांना उधान

धक्कादायक : ब्लेडने गुप्तांग कापून २० वर्षीय विद्यार्थ्यांची आत्महत्या

‘सीमे’पलीकडची सीमा हैदर कोण? चर्चेला उधाण

MBMC : मिरा भाईंदर महानगरपालिका अंतर्गत भरती; ई-मेल द्वारे करा अर्ज

मोटार : एक मानवीनिर्मित अरिष्ट – नवनाथ मोरे

मेगा भरती : महाराष्ट्र नगरपरिषद संचालनालय अंतर्गत 1782 जागांसाठी भरती

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत 133 पदांची भरती; आजच करा अर्ज

संबंधित लेख

लोकप्रिय