Saturday, May 4, 2024
Homeआरोग्यकोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सांगितली त्रिसूत्री

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सांगितली त्रिसूत्री

मास्क, हात धुणे, अंतर राखणे हाच पर्याय, साताऱ्यातील कोविड हॉस्पिटलचे उद्घाटन

सातारा : छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने उभे असलेल्या संग्रहालयाचं रूपांतर  कोविड हॉस्पिटलमध्ये करून त्यांच्या विचारांनाच अभिप्रेत असलेले कार्य आपण करत आहोत. हे निश्चितच अभिमानास्पद आहे. या ठिकाणी उत्तम सुविधा आहेत. त्याचा वापर करून कोविड बाधितांना उत्तम आरोग्य देण्यासाठी प्रयत्नरत रहा. कोविडची लस येईपर्यंत आपण मास्क वापरणे, हात धुणे आणि अंतर राखणे या त्रिसूत्रीचा वापर करून कोविडच्या प्रादुर्भावापासून स्वत:ला दूर ठेवूया असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

सातारा येथील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात उभारलेल्या कोविड हॉस्पिटलच्या ऑनलाईन उदघाट्न प्रसंगी ते आज ( दि. ९) बोलत होते. यावेळी पुण्याच्या विभागीय आयुक्त कार्यालयातून उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, आरोग्यमंत्री राजेश टोपे दूरदृश्य प्रणालीद्वारे तसेच सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील,  गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई, खा. श्रीनिवास पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, आ. छत्रपती शिवेंद्रराजे भोसले,  आ.जयकुमार गोरे, आ. मकरंद पाटील, आ. दिपक चव्हाण, आ. महेश शिंदे, जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  विनय गौडा, जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, कोविड हॉस्पिटल उभारणीत मदत करणाऱ्या संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

अवघ्या २० दिवसात अतिशय चांगल्या सुविधा असलेले कोविड हॉस्पिटल उभे केल्याबद्दल जिल्हा प्रशासनाचे कौतुक करून जगभरातील देशात लाट ओसरली ओसरली म्हणता म्हणता दुसरी कोरोना प्रादुर्भावाची लाट आल्याचे उदाहरण असल्यामुळे आपल्याला अधिक सजग राहून काम करावे लागेल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले.  माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम आपण लोकांना या प्रादुर्भावापासून दूर ठेवण्यासाठी राबवत असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने उभे असलेल्या संग्रहालयात रयतेच्या आरोग्यसेवेसाठी काम होणार असल्याचे सांगून खरं तर इथे कोणाला यायची वेळच येऊ नये अशा सदिच्छा व्यक्त करतो. जिल्ह्यात एक सुसज्ज कोविड हॉस्पिटल असावं अशी सर्वांचीच इच्छा होती त्या इच्छेची पूर्तता होत असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. यावेळी  जंबो कोविड हॉस्पिटल उभं केल्यानंतर जबाबदारीही तेवढीच मोठी असल्याची जाणीव जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेला त्यांनी यावेळी करून दिली.  लोकप्रतिनिधी, प्रशासन या कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अविरत प्रयत्न करीत असल्याचा उल्लेख करून खाजगी हॉस्पिटलच्या एक लाखाच्या पुढच्या बिलाचे ऑडिट करावे. त्यावर लक्ष ठेवून राहा अशा सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या. पुणे विभागाला कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी करायच्या उपाययोजनेसाठी १५१ कोटी रुपये दिले असून पाच जिल्ह्यापैकी सातारा जिल्ह्याला ४५.५९ कोटी रुपये दिल्याची घोषणाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी केली.


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय