Saturday, May 18, 2024
Homeआंबेगावशाळांवर शिक्षक येणार; गटविकास अधिकारी यांचे लेखी आश्वासन

शाळांवर शिक्षक येणार; गटविकास अधिकारी यांचे लेखी आश्वासन

आश्वासन न पाळल्यास शाळा भरवली जाणार पंचायत समिती समोर

घोडेगाव : आंबेगाव तालुक्यातील पेसा क्षेत्रामध्ये असलेल्या शाळांमधील पूर्वीचे शिक्षक मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशाने बदली केल्याने त्या ठिकाणी अद्यापही नवीन शिक्षक रुजू न झाल्याने या शाळा शिक्षकाविना आहेत. याठिकाणी तात्काळ शिक्षकांची नियुक्ती करावी. यासाठी अखिल भारतीय किसान सभा व स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) यांनी गटविकास अधिकारी प्रमिला वाळूंज यांना निवेदन देवून आंदोलनाचा इशारा दिलेला होता.

किसान सभेच्या निवेदनावर, सकारात्मक प्रतिसाद दाखवत गटविकास अधिकारी यांनी गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख आणि किसान सभा व एसएफआय च्या शिष्टमंडळासोबत संयुक्त बैठक नुकतीच आयोजित केली होती.

या बैठकीत गटविकास अधिकारी यांनी या विषयाचा आढावा घेऊन आंबेगाव तालुक्यातील आदिवासी पेसा क्षेत्रामधील जवळजवळ 25 ते 30 शाळेमध्ये शिक्षकांची बदली केल्याने व त्या जागेवर नवीन शिक्षक न आल्याने येथील शाळेतील विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे हे मान्य केले.

यावेळी चर्चेत किसान सभेचे जिल्हा उपाध्यक्ष राजू घोडे म्हटले कि, ‘संबंधित अधिकारी यांनी पेसा क्षेत्रामध्ये शिक्षकांचे बदली करत असताना व त्या शिक्षकाला त्या शाळेमधून कार्यमुक्त करत असताना व त्याच्या जागेवर नवीन शिक्षक आले नसतानाही त्या शिक्षकांना कार्यमुक्त का केले? या ठिकाणी तात्काळ शिक्षकांची नियुक्ती करावी अन्यथा पालक,विद्यार्थी यांना सोबत घेऊन शाळांना कुलूप लावून आम्ही आंदोलन करू’ अशी भूमिका मांडली.

‘आज पेसा क्षेत्रांमधील शाळेमधील बऱ्याच शाळा अशा आहेत की तिथे एकही शिक्षक रुजू नाही, म्हणजेच पेसा कायदा संबंधित विभागाने पायदळी तुडवला आहे ! शासन देखील शिक्षक भरती करत नाही उलट सेवा निवृत्त झालेल्या शिक्षकांना मानधन देऊन त्यांनी पुनः शिकवण्याचे काम करावे असा निर्णय घेते. हा निर्णय डीएड, बीएड शिक्षण घेतलेल्या तरुणांवर अन्याय करणारा आहे. संबंधित विभागाने आदिवासी पेसा क्षेत्रात त्वरित कायमस्वरूपी शिक्षक रुजू करावे व नव्याने शिक्षक भरती करून बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यावा आणि विद्यार्थ्यांची शिक्षणापासून होणारी परवड थांबवावी. अन्यथा एसएफआय राज्यभर तीव्र आंदोलन करेल. समीर गारे, सचिव एसएफआय आंबेगाव तालुका यांनी अशी भूमिका यावेळी मांडली.

सदरील बैठकीत गटविकास अधिकारी व गटशिक्षण अधिकारी यांनी संघटनेच्या शिष्टमंडळास असे आश्वासन दिले की, ज्या शाळांना शिक्षक नाही तेथे नियमित शिक्षक यांची नियुक्ती करणेसाठी तातडीने मुख्य कार्यकारी अधिकारी यांना प्रस्ताव सादर केला जाईल. व तोपर्यंत स्थानिक पातळीवर, संयोजन करून, जवळच्या शाळेतील शिक्षक तेथे पाठवून शाळा सुरू ठेवल्या जातील.

गटविकास अधिकारी प्रमिला वाळुंज व गटशिक्षण अधिकारी यांनी तातडीने दखल घेत घेतलेल्या बैठकीमुळे व प्रश्न सोडवण्याची दाखवलेली इच्छाशक्ती यामुळे किसान सभेने आपले आंदोलन तात्पुरते स्थगित केले आहे. पण पुढील पंधरा दिवसात नियमित शिक्षक, शाळेवर रुजू न झाल्यास पालक, विद्यार्थी व संघटनेचे कार्यकर्ते पंचायत समिती समोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करणार आहे व पंचायत समिती समोरच शाळा भरवली जाईल, अशी भूमिका किसान सभेचे नेते अशोक पेकारी, रामदास लोहकरे यांनी मांडली आहे.

या बैठकीला किसान सभेचे जिल्हा सहसचिव अशोक पेकारी, जिल्हा उपाध्यक्ष राजू घोडे, आंबेगाव तालुका सचिव रामदास लोहकरे, सहसचिव दत्ता गिरंगे, कार्याध्यक्ष बाळू काठे, एसएफआय आंबेगाव तालुका समिती सचिव समीर गारे, तालुका अध्यक्ष दिपक वालकोळी, अर्जुन काळे, सागर पारधी आदी उपस्थित होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय