आज 5 सप्टेंबर म्हणजेच शिक्षक दिन . या जगात आई-वडिलांनंतर कोणला महत्वाचे स्थान दिले जाते तर ते म्हणजे गुरु.याच गुरुंविषयी आदर, भावना व्यक्त करण्याचा दिवस म्हणजेच ‘शिक्षक दिन’. भारतात दरवर्षी 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा केला जातो. या दिवशी विद्यार्थी त्यांच्या गुरूंसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करतात. विद्यार्थ्याच्या जीवनात शिक्षकाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. भारतात शिक्षकांनाही पालकांच्या बरोबरीचे स्थान दिले जाते.
विद्यार्थ्याच्या जीवनात शिक्षकाचे योगदान अनन्य साधारण आहे. शिक्षकांशिवाय विद्यार्थी पूर्ण होत नाही. याच शिक्षक दिनाचा नेमका इतिहास काय हे आपण जाणून घेणार आहोत.
भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस म्हणजेच 5 सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. राजकारणात त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला. भारताचे उपराष्ट्रपती आणि राष्ट्रपती अशी दोन्ही पदे भूषविली असली, तरी शेवटपर्यंत आदर्श शिक्षकाची ओळख त्यांनी जपली. म्हणूनच त्यांच्या स्मरणार्थ 5 सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जाऊ लागला. भारतामध्ये सर्वप्रथम सन 1962 मध्ये शिक्षक दिन साजरा करण्यात आला. माझा जन्मदिवस शिक्षक दिनाच्या रुपात साजरा करणे माझ्यासाठी गौरवास्पद असेल, असे राधाकृष्णन यांनी सांगितल्याची आठवण सांगितली जाते.
युनेस्कोने 5 ऑक्टोबर हा दिवस आंतराराष्ट्रीय शिक्षक दिन म्हणून जाहीर केला आहे. रशियामध्ये 1965 ते 1994 पर्यंत ऑक्टोबर महिन्यातील पहिला रविवार शिक्षक दिन म्हणून साजरा केला जात होता. 1994 सालापासून युनेस्कोच्या निर्णयानंतर त्यांनी 5 ऑक्टोबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून स्वीकारला. इंडोनेशिया, व्हिएतनाम देशात नोव्हेंबर महिन्यात, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, ब्राझील, कॅनडा, चीली, जर्मनी यासारख्या देशात ऑक्टोबरमध्ये शिक्षक दिन साजरा करण्यात येतो.