Friday, April 26, 2024
Homeग्रामीणसांगोला : दुधात खुलेआम भेसळ करून तालुक्यात माजले पांढरे बोके..!

सांगोला : दुधात खुलेआम भेसळ करून तालुक्यात माजले पांढरे बोके..!

अन्न व औषध प्रशासनाने दुधाच्या शुद्धतेवर करडी नजर ठेवण्याची गरज

सांगोला / अतुल फसाले : सर्वसामान्य नागरिकांचे पूर्णान्न किंवा सकस आहार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दुधात मोठ्या प्रमाणावर भेसळ करून कृत्रिम दुधातून लाखोंची आर्थिक उत्पन्न मिळवणारी मोठी टोळीच तालुक्यात सक्रिय झाली असल्याची चर्चा जोर धरत आहे. 

गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत प्रत्येकाच्या आहारात अविभाज्य घटक असलेल्या दुधात युरिया पाम तेल दुधाची पावडर आणि मेलामाइन सारखे विषारी रसायन मिसळून स्वतःचे उखळ पांढरे करण्याचा गोरखधंदा सांगोला तालुक्यातील दूध संकलन करणाऱ्या मंडळींनी मांडला असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. दुधात मोठ्या प्रमाणात विषारी पदार्थ मिसळून दररोज लाखो रुपये मिळवणारी सांगोला तालुक्यात अशा पांढऱ्या बोक्यांची टोळीच माजली असल्याचे धक्कादायक चित्र समोर येत आहे.

निसर्गतः दुष्काळी असलेल्या सांगोला तालुक्यात शेती बेभरवशाची असल्याने अनेकांचे संसार दूध उत्पादनावर सुरू आहेत, यामुळे जिल्ह्यात दूध उत्पादनात सांगोला तालुक्याचा वरचा क्रमांक लागतो. परंतु गेल्या काही वर्षांपासून जिल्हा दूध संघाच्या बरोबरच इतर खासगी संस्थाही सांगोला तालुक्यात दूध संकलन आणि दूध प्रक्रिया उद्योगात मोठ्या प्रमाणात सक्रिय झाल्यामुळे गोरगरिबांचे पूर्णान्न असलेल्या दुधाच्या या गुणवत्तेवर आणि विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले आहे. तालुक्यात दररोज लाखो लिटर दुधाचे संकलन होत असतानाही गेल्या या काही वर्षात अन्नभेसळ विभागाची कोणतीही कार्यवाही न झाल्याने सर्व काही आलबेल आहे की गोलमाल आहे हे नक्की सांगता येत नाही. 

लहान बालकापासून ते वृद्ध नागरिकापर्यंत प्रत्येकाच्या आहारात हमखास आढळणारा अन्नपदार्थ म्हणून ओळख असलेल्या दुधात सध्या युरिया, दुधाची पावडर आणि अन्य आरोग्यास घातक रसायने मिसळून दुधाचा गोरखधंदा मांडलेल्या पांढरपेशा बोक्यांवर प्रशासनाने करडी नजर ठेवून दुधात भेसळ होणार नाही याकडे अन्नभेसळ प्रशासनाने लक्ष देणे खूप आवश्यक बनले आहे. 

गेल्या काही महिन्यांपासून दुधात भेसळ करण्याचा धंदा सांगोला तालुक्यात तेजीत असल्याचे बोलले जात आहे. सध्या दुधात भेसळ करण्याचे प्रमाण आणि संबंधित प्रशासनाच्या कार्यवाहीकडे पाहता सांगोला तालुक्यातील पांढरपेशा बोक्क्यांचा हा गोरखधंदा प्रशासनाच्या वरदहस्ताने तरी सुरू नाही ना असाच प्रश्न आता सामान्य नागरिकांतून उपस्थित होत आहे.

भेसळयुक्त दूध म्हणजे नागरिकांच्या आरोग्याशी खेळच असल्याचे तालुक्यातील सामान्य व नोकरदार नागरिकांतून बोलले जात आहे. अन्न व औषध प्रशासनाने दुधाच्या शुद्धतेवर लक्ष ठेवून सामान्य लोकांच्या जीवाशी सुरू असलेला खेळ तत्काळ थांबवावा. आणि दररोज दुधात हजारो लिटर भेसळ करून त्यातून लाखो रुपये मिळवून स्वतःचे उखळ पांढरे करणाऱ्या टोळीच्या मुसक्या अवळाव्या अशी भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय