Sunday, May 19, 2024
Homeग्रामीणमानसिक, आर्थिक, सांस्कृतिक आव्हानांशी मुकाबला करण्यासाठी वाचन हे सर्वोत्तम उपयुक्त साधन -...

मानसिक, आर्थिक, सांस्कृतिक आव्हानांशी मुकाबला करण्यासाठी वाचन हे सर्वोत्तम उपयुक्त साधन – प्रसाद कुलकर्णी

इचलकरंजी : कोव्हिड – १९ मुळे आज जगभर एका अभूतपूर्व संकटाचा सामना मानवजातीला करावा लागतो आहे. या  संकटामुळे असंख्य माणसांना मानसिक, आर्थिक, सांस्कृतिक अशा विविध आव्हानांशी मुकाबला करावा लागतो आहे. जीवनातील हा संघर्ष योग्य तऱ्हेने पेलायचा असेल तर त्यासाठी वाचन हे सर्वोत्तम उपयुक्त साधन आहे. आज आपण वाचन प्रेरणा दिन साजरा करत असताना कोरोनामुळे गेले सात महिने सार्वजनिक ग्रंथालये बंद होती ती आज सुरू होत आहेत. लॉकडाऊनमुळे वाचन संस्कृती टिकवून ठेवण्यात व ती विकसित करण्यात मोठा अडथळा निर्माण झाला आहे. अशावेळी प्रत्येक सुशिक्षित नागरीक बंधू भगिनींनी सार्वजनिक वाचनालयाचे वाचक – सभासद होऊन होऊन वाचन संस्कृती विकसित केली पाहिजे. त्याद्वारे आपले कुटुंब, समाज व राष्ट्र बलशाली करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.तीच कालवश डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांना खरी आदरांजली ठरेल असे मत समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

ते प्रबोधन वाचनालयाच्या वतीने अयोजित ‘वाचन प्रेरणा दिन’ कार्यक्रमात बोलत होते. प्रारंभी माजी राष्ट्रपती व जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ कालवश डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिना निमित्त त्यांच्या शंकरराव भांबिष्ट्ये यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.

प्रसाद कुलकर्णी म्हणाले की, ज्ञान, मनोरंजन, आकलन, प्रबोधन, बुद्धीची मशागत करणे आणि नैतिक मूल्ये रुजविणे व आनंद निर्मिती करणे अशी अनेक उद्दिष्टे वाचनातून साध्य होत असतात. वाचन हे केवळ शब्दांचे वाचन नसते तर लेखकाच्या मनोभूमिकेचे व व्यक्तिमत्वाचे वाचन असते. म्हणूनच वाचन संस्कृती जपणे हे समाजातील सुशिक्षितांची जबाबदारी व कर्तव्य आहे. आणि ही संस्कृती स्वतः तून विकसित झाली पाहिजे. ही संस्कृती विकसित करण्यासाठी सार्वजनिक ग्रंथालये अतिशय उपयुक्त ठरत असतात. कोणत्याही देशाची सांस्कृतिक उंची वाढवायची असेल तर त्या देशातील सार्वजनिक वाचनालयांची सर्वांगीण अवस्था व उपयुक्तता अधिकाधिक सुदृढ केली पाहिजे. शासनाने याबाबीकडे गांभीर्याने व अग्रक्रमाने पाहिले पाहिजे ही काळाची गरज आहे. मानवी मनात निर्माण होणारी वाचन प्रेरणा सार्वत्रिक स्तरावर फुलवत ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे हा वाचन प्रेरणा दिनाचा संदेश आहे. या दिनाच्या निमित्ताने अबाल – वृद्ध आशा  प्रत्येक वयोगटातील व्यक्तीने सार्वजनिक वाचनालयाचे सभासद होऊन वाचन प्रेरणा संक्रमित करण्याची गरज आहे. 

कोरोना प्रतिबंधाचे सर्व नियम पाळून केलेल्या या कार्यक्रमास नौशाद शेडबाळे, पांडुरंग पिसे, सौदामिनी कुलकर्णी, नंदा हालभावी, अश्विनी कोळी, विशाल पाटील, अनिल जाधव आदींसह वाचक – सभासद उपस्थित होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय