हरिद्वार : योगगुरु रामदेव बाबा यांनी कोरोना विषाणूवर पहिलं आयुर्वेदिक औषध शोधल्याचा दावा आहे. या औषधामुळे 100 टक्के रुग्ण बरे होतात आणि 0 टक्के मृत्यूदर असल्याचाही दावा रामदेव बाबा यांनी केला आहे. त्यांनी हरिद्वार येथे या औषधाचं उद्धाटन केलं. श्वासारी वटी कोरोनील असं या औषधाचं नाव आहे.
रामदेव बाबा म्हणाले, “संपूर्ण देश आणि जग कोठे तरी कोरोनावरील औषध निघेल या आशेवर होतं. आज आम्ही कोरोनाचं पहिलं आयुर्वेदिक औषधं शोधलं आहे, अशी घोषणा करतो. पतंजली संशोधन संस्था आणि निम्स यांच्या संयुक्त विद्यमाने या औषधाचं संशोधन करण्यात आलं. ही औषधं वैद्यकीय तपासण्या आणि चाचण्यांमध्ये देखील सिद्ध झालं आहे. यासाठी मी या संशोधनातील सर्व वैज्ञानिकांचे आणि संशोधकांचे आभार मानतो. हा खूप अभिमानाचा दिवस आहे. पूर्ण जग पुराव्यांच्या आधारे संशोधित औषधांवरच अवलंबून आहे. आज अॅलोपॅथ संपूर्ण वैद्यकीय यंत्रणांचं नेतृत्व करत आहे.”
रामदेव बाबा म्हणाले, “आज आम्ही कोरोनील आणि श्वासारीचं लाँचिंग करत आहोत. या औषधांवर आम्ही दोन प्रयोग केले. एक ‘क्लिनिकल कंट्रोल स्टडी’ आणि दुसरा ‘क्लिनिकल कंट्रोल ट्रायल’. पहिला प्रयोग देशभरातील विविध शहरांमध्ये करण्यात आला. आम्ही 280 रुग्णांचा यात समावेश केला. याचा निकाल अप्रतिम होता. यात 100 टक्के रुग्णांची रिकव्हरी झाली. एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. आम्ही सिप्टेमेटिक उपचारासोबत सिस्टमेटिक उपचार देखील केले. यातून आम्ही कोरोनाची गुंतागुंत असतानाही त्याला नियंत्रित केलं.”