जुन्नर : स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने सेंट्रल किचन बंद करा, अर्ज केलेल्या सर्व विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश द्या या प्रमुख मागण्यांसह इतर मागण्यांना घेऊन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय घोडेगाव येथे दि. 12 सप्टेंबर 2023 रोजी धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती एसएफआय चे राज्य अध्यक्ष सोमनाथ निर्मळ व जिल्हा सचिव नवनाथ मोरे यांनी दिली. ते जुन्नर येथे पत्रकारांशी बोलत होते. Project Office Morcha of SFI
सोमनाथ निर्मळ म्हणाले, गोहे आश्रमशाळा शाळेत शिकणाऱ्या अभिषेक गवारी या विद्यार्थ्यांचा प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे मृत्यू झाला आहे. असे असतानाही प्रशासन कोणतीही कारवाई करत नाही. तसेच सेंट्रल किचन आणून पुन्हा आश्रमशाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जीव धोक्यात घालत आहेत. निकृष्ट जेवनामुळे आणि विषबाधा झाल्यास याला जबाबदार कोण असा सवालही निर्मळ यांनी यावेळी उपस्थित केला.
ते पुढे म्हणाले, गाढवपणाचे निर्णय घेणाऱ्या प्रशासनाच्या विरोधात धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रशासनाने आश्रमशाळेत सेंट्रल किचन बंद करुन विद्यार्थ्यांनी मेस सुरू करावी. एसएफआय ने आंदोलन, निवेदन देत वसतिगृहातील सेंट्रल किचन बंद केले आहे. त्यामुळे सेंट्रल किचन विरोधातील लढा चालू राहणार आहे.
तर नवनाथ मोरे म्हणाले, सेंट्रल किचन बंद करा, अर्ज केलेल्या सर्व विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश द्या या प्रमुख मागण्यांना घेऊन होणाऱ्या आंदोलनात विद्यार्थी, पालक यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.
यावेळी राज्य सहसचिव विलास साबळे, जिल्हा सहसचिव प्रविण गवारी, जुन्नर तालुका सचिव अक्षय घोडे, जिल्हा समिती सदस्य निशा साबळे, कांचन साबळे, राष्ट्रीय आदिवासी अधिकार मंच चे संजय साबळे, एसएफआय चे सदस्य सूरज बांबळे, देवेंद्र मराडे आदी उपस्थित होते.