Saturday, May 18, 2024
Homeजिल्हाटाटा मोटर्सचे माजी व्यवस्थापकीय संचालक प्रकाश तेलंग यांचे निधन

टाटा मोटर्सचे माजी व्यवस्थापकीय संचालक प्रकाश तेलंग यांचे निधन

पिंपरी चिंचवड : टाटा मोटर्सचे माजी व्यवस्थापकीय संचालक प्रकाश तेलंग यांचे येथे निधन झाले. ते 74 वर्षाचे होते. प्रकाश यांनी 1967 मध्ये व्हीएनआयटी, नागपूर येथून यांत्रिक अभियांत्रिकीमध्ये पदवी प्राप्त केली आणि लार्सन आणि टुब्रोमध्ये तीन वर्षे काम केले. त्यांच्या मागे पत्नी, दोन विवाहित मुली असा परिवार आहे

त्यानंतर त्यांनी 1972 मध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIM) अहमदाबाद मधून पदवी पुर्ण केली. टाटा अडमिंनिस्ट्रेशन सर्व्हिस(TAS) मार्फत त्यांची टाटा मोटर्स पिंपरी येथील  ग्रोथ विभागात असिस्टंट मॅनेजर म्हणून काम करायला सुरुवात केली. सर्वात जेष्ठ कुशल टेक्निकल लीडर म्हणून त्यानी तीन दशके सर्वोत्कृष्ट कामगिरी केली.1980 च्या दशकात जपानी कंपन्यांनी वाहन उद्योगात मोठे आव्हान देण्यास सुरुवात केली. त्याच काळात टाटा मोटर्सच्या टाटा 407 या लोकप्रिय वाहनाच्या संशोधन आणि निर्मिती मध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता. या वाहनाने जागतिक आणि भारतीय वाहन उद्योगात मोठी क्रांती केली.

2005 मधील छोटा हत्ती (TATA ACE) या बहुउपयोगी किर्तीवंत क्रांतिकारक वाहनाची  यशोगाथा त्यांचे कारकिर्दीत लिहिली गेली.

शॉपफ्लोअरवर उत्पादन प्रक्रियेतील समस्या निवारण  करण्यासाठी स्वयंचलित छोट्या टीम(SDT/TEAM LEADER) मधील त्यांचे प्रेरणादायी संभाषणामुळे ते कामगारांमध्ये  अतिशय लोकप्रिय होते. टाटा उद्योग समूहातील अवजड आणि व्यापारी वाहन उत्पादन व्यवस्थापन, संशोधन क्षेत्रात त्यांनी भरीव कामगिरी केली.

टाटा मोटर्स मध्ये त्यांनी तीन दशके काम केले. 2012 मध्ये ते निवृत्त झाले होते. त्यांच्या निधनाने कर्मचारी शोकाकुल झाले आहेत.

कामगार युनियनचे सुशीलकुमार नहार म्हणाले, कामगारांना माणूस म्हणून सन्मान देणारे उच्च पदावरील मनमिळाऊ व्यक्तिमत्व होते. कंपनी आणि कामगार याना वैभवशाली बनवण्यासाठी त्यानी अथक प्रयत्न केले. वाहन उद्योगातील जागतिक आव्हाने पेलण्यासाठी कामगारांचा सहभाग कसा सहभाग वाढवला पाहिजे यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले.

      

तर युनियनचे माजी सदस्य शिवाजी शेडगे म्हणाले, “ते कुशल इंजिनिअर होते. शॉप फ्लोअर वरील उत्पादन प्रक्रिये मध्ये सुलभता येण्यासाठी त्यांनी कामगारांकडून विविध सूचना मागवून त्याची अंमलबजावणी केली. औद्योगिक मंदी 2000 साली होती. संचालक म्हणून ते कंपनीची बाजू मांडत असताना कामगारांच्या हक्काच्या आर्थिक तसेच कल्याणकारी मागण्याना न्याय देण्याचे काम त्यांनी केले होते. त्यांच्याच काळात कामगारांच्या मुलांना कंपनीत सर्वाधिक नोकऱ्या देण्यात आल्या.


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय