घोडेगाव : फुलवडे (ता. आंबेगाव) येथे सहयाद्री आदिवासी नोकरदार मंडळ व लयभारी महिला ग्रुप यांच्या सौजन्याने गावातील एकूण पाच शाळांच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. आंबा, चिंच, सिताफळ, पिंपळ, करंज, वड अशा वनस्पतींची रोपटी मेजर नारायण हिले यांना वनविभागाकडून उपलब्ध करून दिली होती. मंडळाचे अध्यक्ष सुधीर घोटकर, उपाध्यक्ष मनोहर किसन मोहरे, सुदाम मोहरे, लयभारीच्या अध्यक्षा राजश्री मोहरे, कल्पना हिले तसेच शिक्षक, विद्यार्थी व ग्रामस्त यांच्या हस्ते शाळेच्या आवारात वृक्ष लागवड करण्यात आली.
एक झाड लावू … मोठं झाल्यावर त्याची गोड फळे चाखू असे म्हणत या रोपट्यांचे संगोपन व संवर्धन करण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांनी स्वीकारली. वृक्षांचे चांगले संवर्धन करणाऱ्या वर्गाला आकर्षक बक्षीस देण्याची घोषणा नारायण हिले यांनी केली. सर्व विद्यार्थी या उपक्रमात आनंदाने सहभागी झाले होते.
मंडळाचे सचिव मनोहर दुलाजी मोहरे यांनी वृक्षलागवड व वृक्षसंवर्धनाचे महत्त्व पटवून दिले. कार्यक्रमास गावडे सर, भोर सर, बांबळे सर, रामकिशन गवारी सर तसेच विद्यार्थी, पालक, ग्रामस्त व महिला भगिनी बहुसंख्येने उपस्थित होत्या. नोकरदार मंडळाच्या या उपक्रमाचे ग्रामस्तांनी कौतुक केले आहे.