पिंपरी : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या संरक्षणात कपात करण्याचा निर्णय घेेतला आहे. महाविकास आघाडी सरकारने जाणिवपूर्वक व जातीय द्वेषभावनेतून केलेला असल्याचा आरोप करत रिपब्लिकन पक्षाच्या वतीने या निर्णयाविरोधात पिंपरीत डाॅ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या समोर निषेध करीत राज्यभरात तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती रिपब्लिकन पक्षाचे प्रदेश सचिव बाळासाहेब भागवत यांनी दिली.
शहराध्यक्ष सुरेश निकाळजे म्हणाले की, दलित, शोषित, वंचित समाजाच्या प्रश्नांसाठी रामदास आठवले हे पायाला भिंगरी लावून अहोरात्र फिरत असतात. दोन वर्षापूर्वी अंबरनाथ येथे एका कार्यक्रमात त्यांच्यावर एका माथेफिरूने हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्याअनुषंगाने आठवले यांना सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली होती. मात्र केंद्रातील मंत्री असताना ही महाराष्ट्रातील ठाकरे सरकारने जाणिवपूर्वक राजकीय सूडबुध्दीने हा निर्णय घेतला आहे. सरकारने त्वरित हा निर्णय मागे घ्यावा व रामदास आठवलेंची सुरक्षा व्यवस्था पूर्ववत करावी.
राज्याच्या राज्यमंत्र्याला जास्त सुरक्षा व केंद्रीय राज्यमंत्र्यांना कमी सुरक्षा हे कोणते सुरक्षेचे धोरण राज्य सरकारने व मुंबई पोलिसांनी अंगीकारले आहे, असा प्रश्न महाराष्ट्र वाहतुक आघाडी चे अध्यक्ष अजिजभाई शेख म्हणाले.
आंदोलनात युवक अध्यक्ष कुणाल व्हावळकर, कामगार आघाडी दुर्गाप्पा देवकर, एम्पलोईज फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष विनोद चांदमारे, शंकरशेठ इंगळे आदीसह मोठ्या संख्येने उपस्थित होते.