Monday, May 20, 2024
Homeग्रामीणपिंपरी चिंचवड शहर बनतंय गुन्हेगारीचा अड्डा ?नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया

पिंपरी चिंचवड शहर बनतंय गुन्हेगारीचा अड्डा ?नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया

आकुर्डी (पिंपरी चिंचवड) : पिंपरी चिंचवड शहरात वाढत्या गुन्हेगारी मुळे नागरिक त्रस्त आहेत. पिंपरी चिंचवड शहरातील वाढती गुन्हेगारीला बेधुंद जीवनशैली कारणीभूत आहे. वाहतूक नियमांचा भंग, चोऱ्या, वाहनांची जाळपोळ, घरफोडी, बेकायदेशीर धंदे तसेच अनेक समाज विघातक घटनांचा आलेख वाढत आहे. 

कायदा आणि सुव्यवस्था टिकवणाऱ्या पोलिसांवर हल्ले करून संपूर्ण नागरी समाजाला वेठीस धरण्याच्या घटनांचा निषेध करत असल्याची टिका पिंपरी चिंचवड मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य गणेश दराडे यांनी केली.

महानगरातील झुंडशाहीला लगाम लावला पाहिजे. पोलिसांवर हल्ले करणारे सभ्यसंस्कृतीचे शत्रू आहेत. असे असताना ‘महाराष्ट्र जनभूमी’ने नागरिकांची मते जाणून घेतल्या आहेत.

शाहूनगर येथील नागरिक सुनील कोल्हे म्हणतात, शहरातील नवश्रीमंत कारसंस्कृतीत जन्म घेतलेली एक पिढी सभ्य नागरी संस्कृतीला आव्हान देत आहे. पोलीस सरकारी अधिकारी आणि नागरी नियम पायदळी तुडवणाऱ्या आणि पोलिसांना बोनेटवर फिरवणाऱ्या अशा घटना घडत आहेत.

तर रावेत येथे राहणारे राजू सुतार म्हणतात, की उच्च विद्यविभूषित तरुणाई महानगरात आहे. एकीकडे १० हजारात जीवन जगणारा कामगार आहे. आणि कार्पोरेट इन्कम अति झालेला आहे. उच्च शिक्षणात  संस्कृतीचा अभाव आहे. पोलिसांना दमदाटी करून तुफान वेगाने गाड्या चालवणाऱ्या आणि महानगरीय मर्दानगीला कायद्याने लगाम घाला. नाही तर मुंबईच्या फुटपाथवर माणसे चिरडणारी नवी पिढी पिंपरी चिंचवड शहरात तयार होईल.

निगडी प्राधिकरण येथील बाजीराव गुजर म्हणाले, की पोलीस हे शासनव्यवस्थेचे प्रतिनिधी आहेत. कायद्याची अमलबजावणी करण्याचे त्यांना अधिकार आहेत. मात्र काही नवश्रीमंत उर्मट घटकांना आम्ही सर्वोच आहोत, कारण आम्ही पैसेवाले आहोत. त्यामुळे शहरात नवश्रीमंतांची बेदरकार पिढी तयार झाली आहे. पोलिसांनी कठोर कारवाई करावी.

तर भोसरी येथील महेंद्रकुमार गायकवाड सांगतात, की आर्थिक उदारीकरणामुळे बळी तो कान पीळी असा वर्ग तयार झाला आहे. शहरात सत्ता संपत्तीचे ओंगळ प्रदर्शन आहे. सामाजिक नीतिनियम त्यांनी झुगारून दिले आहेत. पबसंस्कृती आणि मनी पावर मुळे शहरात एक दादागिरी करणारी संस्कृती तयार झाली आहे. शासनव्यवस्था टिकवण्यासाठी यांच्यावर कठोर शिक्षा करावी.

नागरिकांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया निश्चितच दखलपात्र आहेत. प्रशासनाने कठोर कारवाई करण्याची गरज आहे. जागतिकीकरणामुळे ग्रामीण आणि शहरी संस्कृतीला विचित्र वळण लागले आहे. एकदम तळात गरिबी आहे आणि एकीकडे नवश्रीमंती आहे. समाजातील नीतिमूल्ये जोपासावीत आणि बेजबाबदार वागणाऱ्या जिंदगीला पायबंद घालणारे कायदे असावेत.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय