Monday, May 6, 2024
Homeराज्यमॅक्स महाराष्ट्र (Max Maharashtra) चॅनेल युट्यूबने केला बंद, संपादकाची भावनिक पोस्ट

मॅक्स महाराष्ट्र (Max Maharashtra) चॅनेल युट्यूबने केला बंद, संपादकाची भावनिक पोस्ट

पुणे : सध्या भारतीय मेनस्ट्रिम मीडियाचा स्तर खालावत चालला असून जागतिक प्रेस फ्रीडम इंडेक्समध्येही २०१६ साली १३३ क्रमांकावरून भारत २०२२ मध्ये १५० वर आला आहे. अशात मेन स्ट्रिम मध्ये राहुन निष्पक्ष आणि सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारणारा एकमेव टिव्ही चॅनेल म्हणून “एनडीटीव्ही” राहिला असताना आता “एनडीटीव्ही” वर देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जवळचे मित्र आणि जगातील तीन नंबरचे श्रीमंत व्यक्ती उद्योगपती गौतम अदानी यांनी कब्जा करण्याचे काम सुरू केले आहे.

पत्रकारीतेच्या या अत्यंत कठीण परिस्थितीत सोशल मीडिया हा एकमेव खरे बोलणे आणि खरे दाखवण्यासाठीचा पर्याय उरला असल्याचे बोलले जात असताना युट्यूबने मॅक्स महाराष्ट्रचे (MaxMaharashtra) युट्यूब चॅनेल (Youtube Channel) अचानक बंद केले आहे. मॅक्स महाराष्ट्र या युट्यूब चॅनेलने सामान्यांचे मुख्य प्रश्न, दलित, शोषित आणि वंचितांचे प्रश्न जोरदारपणे उचलले. सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारत दीनदुबळ्यांचा आवाज व्यवस्थेपर्यंत पोहोचविण्याचे काम केले. मात्र काल अचानक युट्यूबच्या कम्युनिटी गाईडलाईन्सचे उल्लंघन केल्याचे कारण देत ५ लाखांच्या जवळपास सबस्क्राईबर असलेले चॅनेल बंद करण्यात आले आहे.

मॅक्स महाराष्ट्रने जवळपास ३ वर्षांपूर्वी दलित मुलांना काही जणांनी मारहाण केल्याचा व्हिडिओ प्रसिद्ध करत समाजातील भीषण वास्तव मांडले होते. या व्हिडिओवर आता युट्यूबने कम्युनिटी गाईडलाईन्सचे उल्लंघन केल्याचे कारण दित चॅनेल बंद केला आहे.

या प्रकरणावर मॅक्स महाराष्ट्राचे (MaxMaharashtra) संस्थापक संपादक रवींद्र आंबेकर यांनीही आपली भूमिका मांडली आहे. आंबेकर यांनी सोशल मीडियावर लिहले आहे की, आज मॅक्स महाराष्ट्रचे YouTube चॅनल बंद झाले आहे. YouTube ची स्वतःची काही मार्गदर्शक तत्त्वे देखील आहेत. त्या मार्गदर्शक तत्त्वानुसार मुलांवर हल्ल्याची परवानगी दिली जात नाही. मॅक्स महाराष्ट्रने एका दलित मुलाच्या मॉब लिंचिंगची बातमी दिली होती, ही बातमी २०१८-१९ ची होती, आता त्यावर कम्युनिटी स्ट्राइक लावण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वीच मी माझ्या कार्यालयात सर्वांना सांगितले होते की, आपले चॅनल कधीही बंद होऊ शकते किंवा हॅक होऊ शकते. त्यामुळे आज यूट्यूबने केलेल्या कारवाईनंतर मला आश्चर्य वाटले नाही. याआधीही आमचा चॅनल दोनदा हॅक झाले आहे. हे एक छोटेसे मीडिया हाऊस आहे, त्यामुळे मोठे लोक त्याबद्दल फारसे बोलत नाहीत. जर आमच्या चॅनलवर हल्ला झाला असता, तोडफोड झाली असती तर कदाचित काही चर्चा झाली असती. पण हॅकिंग प्रकरणाची फारशी चर्चा होत नाही. हॅकिंगनंतर आमच्या चॅनेलची कमाई जवळपास संपली. गेल्या दोन वर्षात यूट्यूबमधून आलेला महसूल नगण्य आहे. हॅक केल्यानंतर हॅकरने आमच्या चॅनलवर पॉर्न दाखवले. तेव्हा यूट्यूब कम्युनिटीने हॅकरला शिक्षा केली नाही. अनेकवेळा विचारणा करूनही यूट्यूबने हॅकरची माहिती दिली नाही.

महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता येताच त्यांनी आमची हॅकिंग प्रकरणी नोंदवलेली एफआयआर चौकशी न करता बंद केली. म्हणजेच हा खेळ काय आहे हे आपण देखील समजू शकता. सर्व लोक एकसारखे आहेत. आज कम्युनिटी स्ट्राइक नंतर आमचा चॅनल बंद झाला, त्याचवेळी युट्यूबवर लैंगिक हिंसाचाराची फसवणूक करणारे लाखो चॅनल बिनदिक्कतपणे चालू आहेत. आमच्या अनेक व्हिडीओवर हे चॅनल बंद व्हावे, अशा कमेंट येत राहतात. जिथे ४ लाख ७० हजार लोकांनी आम्हाला सबस्क्राइब केले होते, तिथे एकूण ९१ हजार लोकांनी अनसब्सक्राइब सुध्दा केले. मॅक्स महाराष्ट्रला अनफॉलो करण्यासाठी मोहीमही चालवली जाते. आता ज्यांना खूश व्हायचे आहे त्यांनी व्हावे, पण सर्वांनी एका गोष्टीचा विचार केला पाहिजे, आंदोलन, आत्महत्या, अत्याचार, महिला अत्याचार, शोषण, जातीय – धार्मिक हिंसाचार, वाढती हिंसा, कटुता, जर कम्युनिटी स्टँडर्डचे उल्लंघन होत असेल तर तुमचे प्रश्न उचलणार कोण?

गोमूत्राने कॅन्सर बरा होतो, असे म्हणणाऱ्यांवर टीका करणारा व्हिडीओ अशास्त्रीय म्हणत काढून टाकतो आणि अशास्त्रीय दावे करणाऱ्यांच्या व्हिडीओला लाखोंच्या संख्येने व्ह्यूज मिळतात… आता सोशल मीडियावर अवलंबून पत्रकारिता करताना या प्लॅटफॉर्मशी पंगा कसा घेणार ? आता हे पोस्ट केल्यानंतर ट्रोल करणाऱ्यांना कसं समजवायचं, की उद्या तुम्ही काही अडचणीत अडकलात, तर तुमचं दु:ख सांगणं हे कम्युनिटी गाइडलाइनचे उल्लंघन आहे. अशी भावनिक पोस्ट मॅक्स महाराष्ट्राचे संस्थापक संपादक रवींद्र आंबेकर यांनी केली आहे.

युट्यूबच्या या कारवाईनंतर देशभरातील अनेक पत्रकारांनी नाराजी व्यक्त करत युट्यूबने कारवाई मागे घ्यावी असे आवाहन केले आहे. त्यामध्ये ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई, NDTV चे ब्युरो चीफ सोहीत मिश्रा, ज्येष्ठ पत्रकार आशुतोष यांनी मॅक्स महाराष्ट्रचे चॅनेल पुन्हा सुरू करावे असे आवाहन युट्यूबला केले आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय