कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरातील कामगारांना १ कोटी ८९ लाखाचा आर्थिक लाभ दिला असल्याची माहिती कामगार कल्याण अधिकारी विजय शिंगाडे यांनी दिली. तसेच कोरोनाच्या काळातही कामगार व कुटुंबियांना आर्थिक लाभ देण्याचे काम महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाकडून अविरत सुरु असल्याचे हि त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, महाराष्ट्र राज्य शासनाचा एक उपक्रम हे शिस्त, सेवा, सुधार, समृध्दी हे ब्रिद घेऊन आणि महाराष्ट्र राज्यात समाजातील विविध घटकातील नोंदणीकृत कामगारांना दर्जेदार कल्याणकारी योजना, कार्यक्रम व सुविधा पुरवुन त्यांचे व त्यांच्या कुटुंबियांचे जीवनमान उंचविणे, मंडळाच्या कल्याणकारी योजनांद्वारे त्यांची सामाजिक,शैक्षणिक,सांस्कृतिक आर्थिक व मानसिक उन्नती घडविणे या ध्येयानुसार आपले कार्य अविरत चालु आहे. कामगारांचे सर्वंकष समाधान करणाऱ्या कल्याणकारी कार्यक्रमांचे नियोजनबद्ध व पध्दतशीर आयोजन करुन मंडळाचे उद्दीष्ठ साध्य करणे. अशा गुणवत्ता धोरणाच्या आधारावर हे मंडळ कार्यरत आहे.
कामगार कल्याण निधी अधिनियम १९५३ च्या कक्षेत येणारे विविध आस्थापणेतील कर्मचारी, ज्यांचा दरवर्षी जुन व डिसेंबरच्या वेतनातुन, कामगार कल्याण निधी कपात होतो. त्या सर्वांकरिता या मंडळाद्वारे विविध उपक्रम राबविले जातात.
कष्टकरी कामगारांचे हित जोपासणारे या मंडळाचे गट कार्यालय, कोल्हापुर शहरात बिंदुचौक, महात गल्ली, भोई गल्ली तालीमीच्या मागे इमारती मध्ये आहे. या गट कार्यालयांतर्गत कोल्हापुर येथे ०४ स्थानिक, कागल, इचलकरंजी, कराड व वारणानगर अशा ०८ कामगार कल्याण केंद्रे (वेल्फेअर सेंटर) सुरु आहेत. नामदार दिलिप वळसे-पाटील, कामगार मंत्री व बच्चु उर्फ ओमप्रकाश कडु, कामगार राज्यमंत्री तसेच महेंद्र तायडे, प्रभारी कल्याण आयुक्त यांचे मार्गदर्शनाखाली कामगार व त्यांच्या कुटुंबियांसाठी कल्याणकारी योजना व उपक्रम राबविले जातात.
कोल्हापुर गटांतर्गत सन २०१९-२० मध्ये विविध कल्याणकारी योजनांचा आलेख हा महाराष्ट्र राज्यात सर्वोत्कृष्ट असाच आहे. या मागील वर्षात सर्वसाधारण शिष्यवृत्ती योजनेचा लाभ ४०४८ कामगार व कुटुंबिय लाभार्थींना रक्कम १ कोटी १२ लाख २१ हजार ५०० रुपये इतका देण्यांत आला. पाठ्यपुस्तक सहाय्य अंतर्गत २४९ लाभार्थी व रक्कम रुपये २ लाख ४२ हजार ४१०, एम.एस.सी.आय.टी. योजनामधुन २९९ लाभार्थी रक्कम रुपये ५ लाख ९५ हजार ३५०, गंभीर आजार उपचार सहाय्यता योजनेचे ४२ लाभार्थी रक्कम रुपये ७ लाख ५ हजार, अपंगाना विविध योजनांची रक्कम, १० वी व १२ वी गुणवत्ता प्राप्त ०६ विद्यार्थ्यांना प्रत्येकी ५ हजार, रुपये देण्यात आली. सदरची रक्कम संबधीत लाभार्थी यांना त्यांचे बँक खातेवर आरटीजीएस / एनईएफटी व्दारा जमा करण्यात आली आहे.
तसेच सन २०१९-२० मध्ये ते सन २०२०-२१ करीता स्पर्धा परीक्षा (बँकींग, राज्यसेवा, लोकसेवा आयोग) मार्गदर्शन वर्गातुन ७७ कामगार व कुटुंबियांनी नाममात्र फी मध्ये लाभ घेतला असुन त्याकरीता मंडळाकडुन १३ लाख २२ हजार इतकी रक्कम खर्च करण्यात आली आहे.
गतवर्षी ४० कामगार व कुटुंबियांची निसर्गरम्य व ऐतिहासिक ठिकाणी सहल नेण्यांत आली. ०८ केंद्रांमधुन मंदिर करीता २०२ बालकांना लाभ देण्यांत आला. शिवणवर्गामधुन १०५ कामगार कुटुंबिय महिलांना लाभ देण्यांत आला. ज्याद्वारे सर्व ०८ केंद्रांची एकत्रीत सर्वसाधारण सभासद संख्या २२ हजार ५७६ इतकी नोंदविण्यांत आली. सध्या कोरोना कोव्हीडमुळे मंडळाचे योजना व उपक्रम शासनाच्या निर्देशानुसार सुरु असुन त्यात केंद्रातील महिलांनी स्वत: बनविलेले मास्क, वृक्षवाटप, वृक्षरोपण तसेच ऑनलाईन विविध स्पर्धा, कोरोना विषयी जनजागृती करणारे कार्यक्रम राबविले जात आहेत.
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाकडुन या वर्षात विविध आर्थिक लाभाच्या योजना व उपक्रमाच्या माध्यमातुन १ कोटी ८९ लाख रुपयांचे अर्थसहाय्य कामगार व कुटुंबिय यांना गट कार्यालयाच्या वतीने वितरीत करण्यात आले आहेत.