Friday, November 22, 2024
Homeकृषीशेतकरी, शेतमजूर व योजना कामगारांच्या मागण्यांना घेऊन किसान सभेचा मोर्चा

शेतकरी, शेतमजूर व योजना कामगारांच्या मागण्यांना घेऊन किसान सभेचा मोर्चा

वणी : देशातील सर्वात जुनी व मोठी असलेली शेतकरी संघटना “किसान सभा” ही शेतकरी व शेतमजूर यांचे साठी सातत्याने संघर्ष करीत आहे. या देशातील भूमिहीन शेतमजुरांना स्वतःची जमीन असावी ह्यासाठी वनजमीन, देवस्थान जमीन, गायरान जमीन, महसूल जमीन ह्यावर शेती करून उपजीविका चालविणाऱ्या कष्टकरी शेतमजुराला सात बाराचे पट्टे मिळविण्यासाठी आंदोलन सुरू आहे. ह्या अनुषंगाने तीन वेळा लॉंग मार्च, मंत्र्यांचा घरावर मोर्चा असे अनेक आंदोलन करून राज्य सरकारला अनेक मागण्या मान्य कराव्या लागल्या, परंतु अजूनही मंजूर मागण्यांची अंमलबजावणी न केल्या गेल्याने दि. ५ जून २०२३ रोज सोमवार ला वणी एसडिओ कार्यालयावर भव्य मोर्चाचे आयोजन अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने करण्यात आले आहे.

हा भव्य मोर्चा किसान सभेचे जेष्ठ नेते कॉ. शंकरराव दानव यांचे नेतृत्वाखाली निघणार असून यावेळेस माकपचे जिल्हा सचिव कॉ. कुमार मोहरमपुरी, किसान सभेचे राज्य कमिटी सदस्य कॉ. ऍड. दिलीप परचाके, कॉ. चंद्रशेखर सिडाम, कॉ. मनोज काळे, कॉ. अनिताताई खुनकर, कॉ. उषा मुरखे, कॉ. प्रीती करमरकर आदी प्रामुख्याने उपस्थित राहून मोर्चाला संबोधित करणार आहेत.

महाराष्ट्र शासनाकडून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूल मंत्री व इतर मंत्री तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत मुंबई मंत्रालयात आणि अकोले ते लोणी दरम्यान निघालेल्या पायी मोर्चात ( २७/४/२३ ) महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे सोबत संगमनेर येथे किसान सभेच्या नेत्यांसोबत झालेल्या चर्चेत खालील मागण्यांवर चर्चा करून मागण्या मान्य करण्यात आल्या व मार्गी लावण्याचे आदेश काढलेले आहेत, त्याची त्वरित प्रभावी अंमलबजावणी करावी यासाठी मोर्चाचे आयोजन आहे.

देवस्थान जमिनी कसणाऱ्यांचे नावे करा, अपात्र वन हक्काचे दावे पात्र करा, ज्यांना वनहक्कांचे पट्टे मिळाले त्यांची सातबाऱ्यावर भोगवटदार १ म्हणून नोंद करा, महसूल जमीन, गायरान जमीन, सरकारी जमीन कसणाऱ्यांचे नावे करा व अतिक्रमण काढण्याची कार्यवाही रद्द करा, नरसापुर ता. कळंब, साखरा (तांडा पळशी) ता. आर्णी व शिंदोला ता. वणी येथील अतिक्रमणे काढण्याची कार्यवाही रद्द करा, मा. महसूलमंत्री यांनी अतिक्रमणे काढण्यावर स्थगनादेश दिला असतानाही वनविभागाकडून अतिक्रमणे काढण्याची कार्यवाही करणे निषेधार्य आहे, ते ताबडतोब थांबवा, सरकारी, गायरान, गावठाण व मुलकी फॉरेस्ट जमिनीवर घरे बांधून राहत असलेल्यांना मालकी हक्काचे पट्टे द्या, पी एम किसान निधीचे पेंडिंग प्रकरणे निकाली काढा, सातबारा नोंदी, वारसानोंदी,खातेफोड, वहिवाटी नोंदी, रस्ते वाहिवाट, विस्तार नोंदी, पीक पाहणी नोंदी, जमीन नोंदणी सोपी व्हावी यासाठी उपाययोजना करा, जंगली जनावरांपासून पिकांचे रक्षण करण्यासाठी योग्य उपाययोजना करा, शेतीसाठी लागणारी वीज दिवसा १२ तास उपलब्ध करून देऊन थकीत वीज बिल माफ करा, कापसाचे भाव वाढेल या आशेत कमी भावात कापूस विकलेल्या शेतकऱ्यांना तेलंगणा धर्तीवर नवीन पीक पेरणी साठी अनुदान द्या.

तसेच पीक विमा कंपनीच्या लुटमारीला आळा घालून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विम्याची नुकसानभरपाई देण्यात यावी, निराधारांच्या पेंशन मध्ये ५०० रू वाढ होऊन १५०० रू. झाले ती त्वरित निराधारांच्या खात्यात जमा करावी, रेशनचे मिळणारे मोफत धान्यासोबत विकतचे रेशन पूर्ववत देण्यात यावे, बांधकाम कामगारांना घर बांधण्यासाठी ५ लाख रुपये तसेच त्यांना आरोग्य व अपघात विमा देण्यात यावा, अंगणवाडी, आशा, आशा सुपरवायझर, स्त्री परिचारिका, शालेय पोषण कर्मचारी यांचे थकीत मानधन, वेतन ताबडतोब देण्यात यावा तसेच त्या सर्व योजना कामगारांना कायम नोकरीत समाविष्ट करावे, घरेलू कामगारांना किमान वेतन, पगारी सुट्टी, निवृत्ती वेतन, सामाजिक सुरक्षा, आरोग्य विमा, घर बांधणीसाठी ५ लाख रु. अनुदान, शिक्षणासाठी मुलांना शिष्यवृत्ती, प्रधानमंत्री आवास योजनेचे अनुदान १ लाख ४० वरून ५ लाख रू. करण्यात यावे, वंचित लाभार्थ्यांचा सर्वे करून त्यांची नावे ड यादीत समाविष्ट करून त्यांना त्याचा लाभ देण्यात यावा, ग्रापं चे डाटा ऑपरेटर, रोजगार सेवक, पोलीस पाटील ह्यांना शासकीय कर्मचारी घोषित करून शासकीय वेतश्रेणी लागू करा, अन्नधान्य, गॅस सिलेंडर, पेट्रोल, डिझेल व इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती कमी करून वाढत्या महागाईवर आळा घाला, शेतीपयोगी खते, बियाणे, औषधी इत्यादी वस्तूचे रास्त भावात विक्री करून बोगस बियाणे, औषधी विकणाऱ्यांवर कार्यवाही करा आदी मागण्या या ५ जून रोजी होणाऱ्या मोर्चात केल्या जाणार आहेत.

५ जून २३ ला होणाऱ्या किसान सभेचा भव्य मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन किसान सभेचे कॉ. कवडू चांदेकर, किसन मोहूरले, सुधाकर सोनटक्के, नंदकिशोर बोबडे, शिवशंकर बंदूरकर, खुशालराव सोयम, रामभाऊ जिड्डेवार, गजानन टाकसंडे, उरकुडा गेडाम, बळीराम मेश्राम, ऋषी कुलमेथे, शंकर गौतरे, शंकर भगत, पांडुरंग टेकाम, सुरेखा बिरकुरवार, चंदा मडावी, सदाशिव मेश्राम, भाऊराव टेकाम, संजय वालकोंडे आदींनी केली आहे.

हे ही वाचा :

डॉ.पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशनची व्याप्ती वाढविली

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी : राज्य सरकार ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजना’ राबविणार; मिळणार ‘इतके’ पैसे

शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! केवळ एक रुपयात पीक विमा योजनेचा लाभ

कामगार संहितेस राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी; कोणते बदल होणार पहा !

भारतीय नौदलात तब्बल 1365 अग्निवीर पदांची भरती; आजच करा अर्ज

NDA & NA : राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी अंतर्गत बंपर भरतीची घोषणा; 12वी उत्तीर्णांसाठी मोठी संधी..!

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत 209 पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती

संबंधित लेख

लोकप्रिय