Saturday, April 27, 2024
Homeजिल्हासिकलसेल अनेमिया आजारावर विद्यापीठात आयुर्वेदिक औषधीची निर्मिती

सिकलसेल अनेमिया आजारावर विद्यापीठात आयुर्वेदिक औषधीची निर्मिती

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्राध्यापिका व विद्यार्थ्यांचे संशोधन

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागातल्या प्राध्यापक डॉ. पूजा दोशी व त्यांचे विद्यार्थी नितीन कदम, युवराज काळे यांनी संशोधन करून ‘डिजाइन इनोवेशन सेंटर’ च्या माध्यमातून ‘हिमआधार’ या आयुर्वेदिक औषधाची निर्मिती केली आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ‘रिसर्च पार्क फाउंडेशन’च्या माध्यमातून या आयुर्वेदिक औषधाची माहिती व व्यावसायीकरण करण्यात आले. इनोवेशन इन मेडिकल, फार्मास्युटिकल अँड अलाईड सायन्सेस फॉर कमर्शिअलायझेशन ऑफ टेक्नलॉजी (इम्पॅक्ट २.०) या कार्यक्रमात या औषधाबाबतची घोषणा करण्यात आली. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.कारभारी काळे, प्र- कुलगुरू डॉ.संजीव सोनवणे, केंद्रीय शिक्षण मंत्रालयातील मुख्य नवोपक्रम अधिकारी डॉ.अभय जेरे, विद्यापीठाच्या रिसर्च पार्क फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अरविंद शाळिग्राम, कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसचे संशोधन संचालक (अतिरिक्त) डॉ. डी.के.अगरवाल, कुलसचिव डॉ.एम.व्ही.घोरपडे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी या औषधाचे संशोधन करणाऱ्या डॉ.पूजा दोशी म्हणाल्या. मी स्वतः ‘सिकलसेल अनेमिया’ या आजाराची रुग्ण होते, त्यातूनच यावर औषध असावे अशी कल्पना पुढे आली. मी विद्यापीठात रसायनशास्त्र विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. माझ्या विद्यार्थ्यांच्या मदतीने मी याचा अभ्यास सुरू केला.

जगात ‘सिकलसेल अनेमिया’ या आजाराचे प्रमाण एकूण लोकसंख्येच्या पाच टक्के आहे. आणि भारत आणि नायजेरियात हे प्रमाण सर्वाधिक आहे. या आजारात माणसाच्या शरीरात रक्त फार कमी प्रमाणात तयार होते. तसेच सामान्य माणसाच्या तुलनेत लाल पेशीही कमी असतात. यामुळे व्यक्तीला थकवा येण्याची लक्षणे आढळतात.

अभ्यासादरम्यान आम्ही ५० ते ६० पेक्षा जास्त औषधी वनस्पतीवर प्रयोग करून तसेच आदिवासी भागातील रुग्णांचे नमुने घेत आम्ही अनेक दिवस प्रयोग केले. त्यानंतर आम्ही हिमआधार या आयुर्वेदिक औषधाची निर्मिती केली. त्याचे पेटंट मिळवले. हे औषध बाजारात उपलब्ध असणाऱ्या औषधांच्या तुलनेत स्वस्त असून आयुर्वेदिक असल्याने याचे दुष्परिणाम होणार नाही असेही डॉ.दोशी यांनी सांगितले.

‘हिमआधार’ हे औषध ‘सिकलसेल अनेमिया’ आजारासाठी आणि रक्तवर्धक,रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी, रक्तशुद्धी करण्यासाठी उपयोगी असल्याचे रिसर्च पार्क फाऊंडेशनकडून सांगण्यात आले.

आपल्याकडे आयुर्वेद, योगशास्त्र याचा खूप मोठा ठेवा आहे याला तंत्रज्ञानाची जोड देत आता ते जगासमोर मांडायची वेळ आली आहे. विद्यापीठाकडून झालेल्या या संशोधनाचा अभिमान आहेच पण भविष्यात अशा प्रकारच्या संशोधनाला आमच्याकडून नेहमीच सहकार्य करण्यात येईल.

हिमआधार सारखे संशोधन हे पुढील काळातही विद्यापीठात व्हावे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अशा प्रकारे संशोधन होणे ही देशाची गरज आहे. विद्यार्थ्यांमधील नवोपक्रमाला आणि संशोधनाला पुढे नेण्यासाठी आविष्कार आणि रिसर्च पार्क फाउंडेशनच्या माध्यमातून विद्यापीठ प्रयत्न करत आहे.

  • डॉ.संजीव सोनवणे, प्र- कुलगुरू सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
Lic
जाहिरात
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय