Saturday, December 7, 2024
Homeताज्या बातम्याJP Gavit: माकपने दिंडोरीत रणशिंग फुंकले; जे.पी.गावीतांचा उमेदवारी अर्ज दाखल

JP Gavit: माकपने दिंडोरीत रणशिंग फुंकले; जे.पी.गावीतांचा उमेदवारी अर्ज दाखल

JP Gavit : दिंडोरी मतदारसंघातील लक्षावधी मतदारांच्या आग्रहास्तव आज दि.२६ एप्रिल रोजी कॉ.जीवा पांडु गावीत (JP Gavit) यांनी हजारो समर्थकांच्या पाठिंब्यावर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला.

यावेळी माकपचे पॉलिट ब्यूरो सदस्य डॉ.अशोक ढवळे, राज्य सचिव आणि केंद्रीय कमिटीचे सदस्य डॉ. उदय नारकर, केंद्रीय कमिटीच्या सदस्या मरियम ढवळे, राज्य सचिवमंडळ सदस्य डॉ. डी. एल. कराड, किसन गुजर, सुनील मालुसरे, नाशिक जिल्हा सचिव भिका राठोड, राज्य कमिटी सदस्य इरफान शेख, सुभाष चौधरी, सीताराम ठोंबरे, इंद्रजीत गावीत आदी उपस्थित होते.

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या महाराष्ट्र राज्य कमिटीने कॉ.जे.पी.गावीत (JP Gavit) यांना नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी (अज) लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास मान्यता दिली आहे.

दिंडोरी मतदारसंघ अनुसूचित जमातींसाठी राखीव असून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा या भागात गेली अनेक दशके भक्कम पाया आहे. पक्षाच्या नेतृत्वाखाली नाशिक जिल्ह्यातील सर्व थरांतील जनतेचे अनेक आक्रमक आणि प्रभावी लढे झाले आहेत. किसान लॉंग मार्च हे जनतेचे प्रश्न सोडवण्याचे एक प्रभावी लोकशाही हत्यार पक्षाने विकसित केले असून इतरही राजकीय शक्ती राज्यात त्याचा अवलंब करू लागल्या आहेत.

माकपच्या नेतृत्वाखाली आजवर शेतकरी, कामगार, आदिवासी, महिला, युवक आणि विद्यार्थ्यांची लढाऊ आंदोलने यशस्वी झाली आहेत. तथापि, सत्तास्थानी नसल्याने जनतेचे प्रश्न सोडवण्यात काही मर्यादा येतात. आपल्या जिवाभावाचा प्रतिनिधी निवडून दिल्यास कष्टकरी जनता, आदिवासी, दलित, अल्पसंख्याक, महिला आणि श्रमिक बहुसंख्याक आदी उपेक्षित घटकांना आत्मबळ प्राप्त होते. यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने जे. पी. गावीत यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे.

याबाबत बोलताना माकपचे राज्य सचिव डॉ. उदय नारकर म्हणाले, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाच्या संविधान मोडू पाहणाऱ्या, धर्मांध फॅसिस्ट मनुवादी राजवटीला सत्तेवरून खाली खेचणे हे पक्षाचे मुख्य उद्दिष्ट आहे. स्वतः अनुक्रमे पंतप्रधान आणि गृहमंत्री असलेले नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे केवळ मतांसाठी जनतेत फूट पाडण्यासाठी अतिशय विद्वेषी विचार पसरवत आहेत. सर्व शासकीय आणि संविधानिक तपास यंत्रणा त्यांनी राजकीय स्वार्थापोटी बटीक बनवल्या आहेत. दुर्दैवाने निवडणूक आयोगही जणू आपण त्यांचे शरणागत असल्यासारखे वागत आहे. भाजप एका बाजूला संविधानिक रचना मोडत दुसरीकडे भ्रष्ट मार्गाने अमाप संपत्ती जमवत आहे. शासकीय यंत्रणांचा धाकदपटशा आणि भ्रष्ट संपत्तीचा वापर करत विरोधी सरकारे पाडणे, मुख्यमंत्र्यांसकट विरोधी नेत्यांना बेकायदेशीरपणे तुरुंगात डांबणे, विरोध मोडत आपल्याला मलिदा पुरवणाऱ्या कॉर्पोरेट मित्रांना जनतेची लूट करण्यास खुला वाव देणे हाच भाजप राजवटीचा गेल्या दहा वर्षांचा इतिहास आहे.

या पक्षाने महाराष्ट्रातील जनतेचा तर घोर अपमान केला आहे. देशातील सर्वात अनैतिक सरकार म्हणून आजच्या महाराष्ट्र सरकारची नोंद इतिहासात झाली आहे. या महाराष्ट्रद्रोही राजकीय संधिसाधूंच्या टोळीला तातडीने हद्दपार करण्याची गरज निर्माण झाली आहे. दिंडोरी मतदारसंघातील भाजपच्या उमेदवाराविषयी त्यांच्या अकार्यक्षम, जनताविरोधी कारभारामुळे मतदारांत कमालीचा असंतोष असून तो दिवसागणिक वाढीस लागला आहे. त्यांनी आणि त्यांच्या पक्षाने मुख्यतः कांदा उत्पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे, असेही डॉ.नारकर म्हणाले.

या पार्श्वभूमीवर माकपने पक्षाच्या वतीने ज्येष्ठ आणि प्रखर लढाऊ नेते कॉ. जीवा पांडु गावीत यांना दिंडोरी (अज) मतदारसंघात उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. कॉ. गावीत यांची प्रदीर्घ राजकीय कारकीर्द जनतेने पाहिलेली आहे. त्यानी सात वेळा आमदार म्हणून जनतेचे महाराष्ट्र विधानसभेत प्रतिनिधित्व केले आहे. त्यांनी जनतेला कधीही अंतर दिलेले नाही. आज देशातील आदिवासी, दलित, महिला, अल्पसंख्याक, शेतकरी, कामगार आणि मध्यमवर्गीय जनतेचे खरे प्रतिनिधित्व करणाऱ्या नेत्यांना लोकसभेत निवडून दिले पाहिजे. कॉ. जे. पी. गावीत हेच भ्रष्ट आणि अनैतिक भाजपचा पराभव करू शकतात. हे पाहता महाविकास आघाडीने कॉ. जे. पी. गावीत यांना समर्थन देत भाजपचा पराभव करण्यासाठी भक्कम एकजूट उभारावी, असे आवाहन डॉ.अशोक ढवळे यांनी केले.

दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील जनता मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील, असा विश्वास आहे असेही डॉ.नारकर म्हणाले.

लाल वादळ पुन्हा नाशिकच्या रस्त्यावर

दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी नाशिकच्या रस्त्यावर पुन्हा एकदा लाल वादळ परतले. मात्र यावेळी कुठल्याही मोर्चा आंदोलनासाठी नाही तर माजी आमदार जे पी गावीत यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी लाल वादळ नाशिकमध्ये दाखल झाले. ज्या रस्त्यावर ठिय्या आंदोलन केले होते. त्याच ठिकाणाहून जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज भरण्यासाठी माकप पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

ब्रेकिंग : EVM बाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

कांदा निर्यातीच्या धोरणावरून डॉ. कोल्हे यांचा केंद्र सरकारवर जोरदार हल्ला

मोठी बातमी : माजी आमदार जे.पी.गावित यांना माकप कडून उमेदवारी जाहीर

मोठी बातमी : शिवसेना ठाकरे गटाचा जाहीरनामा प्रसिद्ध, वाचा काय आहेत घोषणा !

मोठी बातमी : राष्ट्रवादी शरद पवार गटाचा जाहीरनामा प्रसिद्ध, वाचा कोणकोणत्या केल्या घोषणा !

’महामानव विश्वकाव्य दर्शन काव्यसंग्रह’ निर्मितीसाठी साहित्य पाठविण्याचे बार्टीकडून आवाहन

शिरूर लोकसभेसाठी 46 उमेदवारांचे 58 अर्ज

देशातील सर्वात श्रीमंत उमेदवार आहे तरी कोण ?, वाचा सविस्तर !

संबंधित लेख

लोकप्रिय