Wednesday, May 22, 2024
Homeकृषीशेतकरी आक्रोश मोर्चा : अमोल कोल्हेंची बारामतीत अजित पवारांवर जोरदार टीका...

शेतकरी आक्रोश मोर्चा : अमोल कोल्हेंची बारामतीत अजित पवारांवर जोरदार टीका…

बारामती : आमच्या शेतकरी आक्रोश मोर्चावर अनेक मंत्री अचानकच टीका करु लागले आहेत, कारण अनेक वतनदारांना वतने वाचवायची आहेत, रयतेच्या कल्याणाचे कोणाला देणे घेणे नाही असा ऐतिहासिक संदर्भ देत खासदार अमोल कोल्हे यांनी टीकाकारांचा समाचार घेतला.उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नामोल्लेख टाळत अमोल कोल्हेंनी त्यांचाही आज समाचार घेतला.

शेतकरी आक्रोश मोर्चा शुक्रवारी (ता. 29) रात्री बारामतीत आला, त्या नंतर झालेल्या सभेत कोल्हे यांनी पाच मिनिटांच्या भाषणात टीकाकारांचा नामोल्लेख टाळून समाचार घेतला. रात्री दहाची मर्यादा असल्याने पाच मिनिटात कोल्हे यांना भाषण आटोपते घ्यावे लागले, मात्र या पाच मिनिटात त्यांनी अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांना जोरदार चिमटे काढले. अमोल कोल्हे म्हणाले, वाघ आपल्याला खुप आवडतो, जेव्हा तो जंगलात वावरतो तेव्हा तो जंगलचा राजा असतो, जेव्हा सर्कशीत तोच वाघ जेव्हा रिंगमास्टरच्या इशा-यावर कसरती करतो, तेव्हा काळजाला घरे पडतात, की ज्या वाघावर प्रेम केल, त्याला आज रिंगमास्टरच्या इशा-यावर चालाव लागत, जेव्हा हाच वाघ पिंज-यात बघायला मिळतो.

तेव्हा काळजाला घरे पडतात की याच्या डरकाळीने भल्या भल्यांचा थरकाप उडत होता, त्याला पिंज-याच्या आडून फक्त गुरगुराव लागत, कुणीही येणार जाणार त्याला दगड मारु शकत…ही भावना जेव्हा वाघाची होते, असच महाराष्ट्राच्या हितासाठी डरकाळी फोडणारे जेव्हा दिल्लीच्या इशा-यावर तोंडातून शब्द काढत नाहीत तेव्हा ही भावना मनात जागी होते. वतन वाचवायच असल्याने मांडलिकत्वाची भावना स्विकारुन दिल्लीश्वराच्या नजरेला नजर भिडवून माझ्या महाराष्ट्राचे नुकसान का करताय हे विचारण्याची हिंमत राहिली नाही, असा घणाघाती आरोप करत वतन वाचवायची तर ही धडपड नाही ना अशी शंका येते.

खासदार सुप्रिया सुळे यांनी आमचे सरकार सत्तेवर आल्यानंतर राज्यातील सर्व शेतक-यांना सरसकट कर्जमाफी दिली जाईल, अशी घोषणा केली. बारामतीतील जुन्या आठवणींना उजाळा देत सुळे यांनी दा.सु. वैद्य यांनी लिहीलेल्या श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचे पाणी या कवितेच्या ओळी म्हणत शरद पवारांच्या बुलंद आवाजाची आठवण करुन दिली. दिल्लीत पूर्णवेळ कृषीमंत्रीच नाही, हे दुर्देवी असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी कांद्याच्या व आरक्षणाच्या प्रश्नावर दिल्लीत आवाज उठवावा असे आवाहन केले. आपला वैयक्तिक कोणाला विरोध नाही तर केंद्रातील भाजपच्या चुकीच्या धोरणांना असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.

संघर्षाचा पर्याय निवडला.

मधल्या काळात दोन पर्याय होते. दडपशाहीपुढे गुडघे टेकले असते तर नक्की फायदा झाला असता, स्वार्थ साधला गेला असता, दुसरा पर्याय ताठ मानेन उभे राहून संघर्ष करुन सवाल विचारण्याचा मार्ग मी व सुप्रिया सुळे यांनी स्विकारल्याचे डॉ. कोल्हे यांनी सांगितले.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय