Thursday, November 21, 2024
Homeविशेष लेखअप्रतिम नाट्यसापेक्षता - आईन्स्टाईनची

अप्रतिम नाट्यसापेक्षता – आईन्स्टाईनची

अकस्मात आणि संपूर्ण विनाशापासून सुरक्षित अशी एकही जागा आज पृथ्वीवर नाही. यावर विश्वास ठेवायला जड जाते, पण ते सरळ सत्य आहे. राज्यकर्ते म्हणतात की एकत्र चर्चा करून अण्वस्त्रांच्या संख्येवर मर्यादा घातली आणि युद्धाचे काही नियम बनवले तर धोका किमान पातळीवर आणता येईल, पण युद्ध म्हणजे खेळ नव्हे, जिथे सगळे खेळाडू नियमांच्या चौकटीत खेळतील. कल्पना करा, दुष्ट आणि नीच माणसांची वस्ती असलेलं एक शहर आहे. प्रत्येक जण कंबरेला खंजीर बाळगणारा आणि वर्षानुवर्ष भर रस्त्यावर खून पडत आल्यानंतर आता नगर परिषद ठरतेय की, घरातून बाहेर पडताना नागरिकांनी कमरेवर जो सुरा त्याची लांबी किती असावी, आणि तो किती तीक्ष्ण असावा.

तुम्ही एकतर युद्धखोर असता किया युद्धविरोधी . युद्धखोर असला तर प्रश्नच नाही. लोकांच्या संघटना मोडून काढा, दंगली घडवून आणा, युद्ध-विज्ञान तंत्रज्ञानाला उत्तेजन द्या. वित्त, उद्यागधंदे, धर्म, त्रमशक्ती सगळ्यांना शस्त्र करायच्या कामाला लावा. जितकी घातक शस्त्रं बनवता येतील तितकी बनवा.

तुम्ही युद्धविरोधी असाल तर (गांधीच्या फोटोकडे निर्देश करीत) या महामानवाने दाखवलेल्या मार्गाने जा. प्रत्येकाला संपूर्ण शक्तीनिशी त्याचा प्रतिकार करायला उद्युक्त करा. एक निश्चितपणे सांगतो, येत्या महायुद्धानंतरच युद्ध लढलं जाईल ते दगडधोंड्यानी !

तेच शब्द अवकाशात घुमत होते. त्या सत्यवाणीनं सर्वानाच अस्वस्थ करून टाकलं होतं. ती वाणी होती अवकाश आणि काळ निरपेक्ष असतात हा न्यूटनचा सिद्धांत संशोधनानं खोडून टाकणान्या महान सत्यशोधकाची, विश्वाच्या कल्पनांमध्ये क्रांतिकारक बदल घडवणाऱ्या संशोधकाची. आपल्या सापेक्षता सिद्धांताने भल्याभल्यांची झोप उडवणाऱ्या अल्बर्ट आईनस्टाईनची . हो आम्ही आईनस्टाईनचा आवाज ऐकला, त्यांना पाहिलं, ते आमच्याशी ते बोलले आणि त्यांनी आम्हाला जिंकलं.

जर्मनी १८७९ला जन्मलेले, मिलेव्हाशी विवाह झालेले, हॅन्स अल्बर्ट आणि एडुआर्डचा बाप झालेले, E=mc2 हे प्रसिद्ध समीकरण मांडणारे, अनेक लेख लिहिणारे, नोबेल पारितोषिक मिळवणारे, शांतता करारावर सही करणारे आणि अखेरीस महात्म्याकडे अंगुलीनिर्देश करणारे आईनस्टाईन आम्हाला भेटले. नुसते भेटलेच नाहीत, बोललेच नाहीत तर त्यांनी त्यांचा सापेक्षतावाद आमच्या डोक्यात छान घुसवला आणि ते कायमचेच मनात ठसले.

काळाला आणि अवकाशाला भेदून आईनस्टाईन नावाच्या माणसाला या आजच्या माणसांचं मैत्र साधून देण्याची किमया केली कोल्हापूरच्या ‘प्रत्यय’ या संस्थेनं, त्या संस्थेच्या डॉ. शरद भुथाडिया या प्रतिभासंपन्न नटानं आणि गॅबियल इमॅन्युअल यांच्या नाटकाचा अत्यंत समर्थ अनुवाद करणाऱ्या विज्ञाननिष्ठ शरद नावरे यांनी सापेक्षता सांगणारा माणूस’ या एकपात्री प्रयोगानं.

या माणसाचं पहिलं दर्शनच सापेक्षता सांगत होतं. ‘टेबलावर मी दोनदा हात आदळला. एकाच जागी दोन वेगवेगळ्या क्षणी दोन आघात, बरोबर ?

या प्रश्नाबरोबरच दोन विजेच्या लोळांची, दोन वेगवेगळ्या दिशेने जाणाऱ्या ट्रेनची, त्याच वेळी शेतात उभे असलेल्या माणसांची उदाहरणे देत तो सापेक्षता इतका हळुवारपणे आणि सहजपणे उलगडून दाखवतो की, सामान्य प्रेक्षकालाही तो चटकन आकळतो आणि गणित तज्ज्ञांनीच माझा सिद्धांत कठीण करून ठेवलाय, तो माझा मलाच कळत नाही. अशा आशयाचे जे उद्गार काढतो ते यथार्थ वाटतात.

अल्बर्ट आईनस्टाईनचे जीवनचरित्र त्यांच्याच तोंडून उलगडत जातं. बालपणी त्याचं होकायंत्राकडे सतत पाहणं, जेकब काकामुळे त्यांच्यात निर्माण झालेली गणिताची गोडी, त्याला मिळालेले पुरस्कार, नोबेल पारितोषिक, लोकांनी त्याच्या इच्छेविरुद्धही त्याला डोक्यावर कसं बसवलं. सापेक्षतावादाच्या विरोधात शंभर प्राध्यापकांनी एकत्र येऊन पुस्तक प्रसिद्ध केलं, तेव्हा आईनस्टाईनची प्रतिक्रिया होती.

मला वाटतं, माझं म्हणणे चुकीचं असतं तर एक प्राध्यापक एक पुरेसा होता.

त्याच्या नावाचा व्यापारी वापर करायची चाल, त्यांना इस्त्राएलने अध्यक्षपद स्विकारण्यासाठी केलेली विचारणा, अशा कितीतरी गोष्टी इतक्या सहजपणे येतात , की त्यांची वर्गवारी कथानकातही करता येत नाही. हे श्रेय अर्थात साध्या सोप्या भाषेचं आणि ते नेमकेपणाने रुपांतरीत करणाऱ्या अनुवादकाचेही. आईन्स्टाईन भाषांतरीत बोलत नसून मातृभाषेतच बोलताहेत असं वाटत राहतं.

या सगळ्या लेखनाला एक साहित्यिक दर्जाही प्राप्त झालेला आहे. शास्त्रज्ञाची आत्मकथा असूनही ती कुठेही कधीही रुक्ष या कंटाळवाणी होत नाही. प्रेक्षकांतील दोघांना बोलावून जे प्रात्यक्षिक आईनस्टाईन सफरचंद आणि द्राक्षांच्या साहाय्याने करून दाखवतो, त्यातही गंमत आहे. प्रत्येक गोष्टीचं वैज्ञानिक स्पष्टीकरण देता येईल, पण त्याला काही अर्थ उरणार नाही. बिथोव्हेनची सिंफनी म्हणजे कर्णपटलावर पडणाऱ्या हवेच्या दाबातील बदल असल्या स्पष्टीकरणाला काही अर्थ आहे का?’ असं आईनस्टाईन म्हणतो, त्या वेळी उठसूठ वैज्ञानिक कारण मागणाऱ्यांची तोंडंच तो बंद करतो. या संहितेचं वैशिष्टय हे की, नाटकाच्या शीर्षकाप्रमाणे इथे आईनस्टाईनच्या माणूसपणाचाही विचार केला आहे. त्याचे आईपासून आलेलं संगीताचं वेड आणि व्हायोलिन वाजवण्यासाठी सिद्ध झाल्यावर त्याचा बो हरवल्याचं लक्षात येणं, तो अचूक वेळी सापडून ती घटनाच नाटयपूर्ण होय. जागोजाग पसरलेला त्याचा साधा मिष्कील विनोद, मोठ्यांचा निरर्थकपणा- मी फर्स्ट क्लासने प्रवास करीत नाही कारण फर्स्ट क्लासचा डबा लौकर पोहोचतो असे नाही.- आईनस्टाईनला वर्गाबाहेर घालवताना त्याच्या शिक्षकांनी दिलेली कारणं. डॉक्टरांनी तंबाखू विकत घ्यायची नाही म्हणून सांगितलं, पण चोरून घ्यायची नाही, असे नाही सांगितले.

शरद भुथाडिया आईनस्टाईनची भूमिका समर्थपणे साकारत

तो हळवा असल्यामुळे त्याला इलेक्ट्रीशियन करू नये, असे आई सांगते तर बाबा म्हणतात हळवे इलेक्ट्रिशियन असतात. असे कितीतरी खुसखुशीत सवाद नाटकभर शास्त्रज्ञांचं माणूसपण आणि विक्षिप्तपणही पटवत जातात. आनंद देतात. एका बिशपबरोबर वाद घालताना धर्माबद्दल आईनस्टाईन म्हणतात,

‘आजच्या जडवादी काळात खरे धार्मिक जर कुणी असतील तर ते म्हणजे शास्त्रज्ञ. नाहीतर त्यांनी आपलं आयुष्य विश्वनिर्मिती कशी झाली याचा शोध लावण्यात का बरं घालवलं असतं?”

या संहितेतील विधानं आईनस्टाईन यांच्या भाषणातून आणि त्यांच्या शोध निबंधातून आणि लेखातूनच घेतली आहेत. त्यात नाटककारांचं कल्पित काही नाही. त्यानं मांडणी केली. ती करताना मात्र देव या संकल्पनेविषयी शास्त्रज्ञांचं ठाम स्पष्ट मत दडपून ठेवल्यासारखं वाटलं. किंबहुना आईन्स्टाईन देव मानणारा होता असंच वाटावं, अशा रीतीने रचना केली आहे. ती मात्र शास्त्रज्ञांच्या प्रतिमेला छेद देणारी आणि धोकादायक आहे. त्या दृष्टीने ‘गॅलिलिओ’ हे ब्रेख्तचं नाटक अधिक उजवं वाटत आणि तरीही शास्त्रीय दृष्टिकोन निर्माण होण्यासाठी, तो विकसित होण्यासाठी प्रत्येकाने हे नाटक आवर्जून पाहायला हवं. प्रेक्षक, मग तो कुठल्याही दृष्टिकोनाचा असो सर्वांनाच गुंतवून ठेवेल, असंच हे नाटक आणि प्रयोग आहे.

डॉ. शरद भुथाडिया अत्यंत शांतपणे, स्पष्ट शब्दोच्चाराने, संयत हालचालीने संशोधकाचे हे व्यक्तिमत्त्व प्रभावी करतात. त्यातील शांतता हाच त्यांनी नाट्यमयतेचा एक भाग केला आहे. शिक्षकाच्या भूमिकेपासून ते सांगत असताना समोरचा प्रेक्षक त्यांना आदरणीय, सन्माननीय आहे, असा भाव सतत प्रकट होत राहतो. आयुष्यातील सांगताना ते फ्लॅशबॅकमध्ये धुंद होत नाहीत. ते ती घटना जणू तुमच्यासमोरच मूर्तिमंत करतात. आईनस्टाईनना फक्त पडद्यावर वा छायाचित्रांतच प्रेक्षकांनी पाहिलेलं असतं, पण पत्यक्षात भेट झाली तर ते असेच चालतील, बोलतील याची खात्रीच भुथाडियांनी पटवून दिली. ‘राजा लियर’, ‘सत्यशोधक म. फुले’ संवाद आणि आता ‘आईनस्टाईन’ कमालीचे यशस्वी झाले आहेत. आजमितीला तरी मराठी रंगमंचावरआईनस्टाईनचा प्रत्यय देणारा दुसरा समर्थ कलावंत दिसत नाही.

मंचीय वस्तूंचा वापर, हालचाली अत्यंत स्वाभाविक आहेत, पण त्या बहुतांशी रंगमंचाशी समांतर आहेत. त्या त्रिकोणी-काटकोनी होतील तर नाट्याला अधिक पुरक होतील. अभ्यासिकेचं, रंगवलेल्या पडद्याचं दृश्य यथोदर्शीवाद आहे, पण एकपात्रीसाठी उपलब्ध होणारा रंगमंचीय अवकाश इतका विस्तृत असून उपयोगाचा नाही. नायक अवकाशाचंच गणित मांडणारा असला तरीही प्रकाश योजना कार्यकारी होती. देशभूषा आणि मंचीय वस्तूही व्यक्तिदर्शक आणि कालदर्शक होत्या. गंभीर शास्त्रज्ञांचं एकपात्रीला वेगळंच परिमाण देणाऱ्या या आईनस्टाईनचे प्रयोग ठिकठिकाणच्या विद्यालयांतून, शाळातून घडवले गेले पाहिजेत. शासनाने धंदेवाईक न होता खरं तर अशा प्रयोगामागे ठामपणे उभं राहलं पाहिजे, शिक्षणमंत्र्यांना तरी याबाबत काही करता येईल काय ?

आईनस्टाईनचे चरित्रकार बानेश हॉफमान म्हणतात,

‘आईनस्टाईन यांच्या अगाध ज्ञानाचे सार त्यांच्या साधेपणात आहे. तर त्यांच्या विज्ञानाचं सार त्यांच्या कलापूर्व, अभूतपूर्व अशा सौंदर्यबुद्धीत आहे.’ हेच वर्णन या प्रयोगाशीही नातं जुळवतं.

– कमलाकर नाडकर्णी

(प्रत्यय निर्मित आईन्स्टाईन- सापेक्षता सांगणारा माणूस या नाटकाचा सुवर्ण महोत्सवी प्रयोग २ जुलै रोजी कोल्हापूरच्या केशवराव भोसले नाट्यगृहात होत आहे. त्यावेळी प्रकाशित होणार्‍या स्मरणिकेतील लेख.)

मूळ लेखक – गब्रीएल इमॅन्युएल 

मराठी अनुवाद – डॉ. शरद नावरे 

दिग्दर्शन आणि भूमिका – डॉ. शरद भुथाडिया 

शनिवार, २ जुलै , संध्या. ४.३० वाजता 

केशवराव भोसले नाट्यगृह, कोल्हापूर 

संबंधित लेख

लोकप्रिय