Friday, November 22, 2024
Homeग्रामीणओळख पडद्यामागील योध्दांची : लॉकडाऊन काळात मदतीचा हात देणाऱ्या माणसांची.

ओळख पडद्यामागील योध्दांची : लॉकडाऊन काळात मदतीचा हात देणाऱ्या माणसांची.

           सकाळी नेहमी प्रमाणे बेकरीमध्ये पोहचलो. थोड्या वेळात खुशी नाईक ताईंंचा फोन आला आणि आपल्या NH – 4 हायवे वरती काही स्थलांतरित लोक प्रवास करत असलेची माहिती दिली. अंदाजे १५ लोक आहेत असे समजले. त्यांना ती माहिती त्यांचे पती नारायण नाईक यांनी दिली.

        मी खुशी ताईंंना सोबत बेकरी शॉप मधून थोडा कोरडा खाऊ आणि पाणी सोबत दिले. जेवणाची विचारपूस करा, मी घेवून येतो असे सांगितले. पण त्या तेथे पोहचताच लक्षात आले की जवळपास ३५ पुरुष, महिला, वृध्द, आणि लहान मुले एका झाडाच्या सावलीत बसले आहेत. सर्व सांसारिक साहित्यसोबत घेवून मलकापूर कराड येथून ते साताऱ्याला चालत जाणार आणि तेथून मग रेल्वेने छत्तीसगढ असा प्रवास करण्याची योजना त्यांनी सांगितली. त्यांचे कपडे, सोबत असलेले साहित्याची गाठोडी, आणि पायातील वाहना त्यांची आर्थिक स्थिती नोंदवत होत्या. लहान मुले सुरुवातीलाच चालून चालून थकली होती. एक मतिमंद दिव्यांग मूल सुध्दा या प्रवासात चालण्याचे कष्ट घेत होते. त्यांनी सोबत आणलेला कोरडा खावू आणि पाणी त्यांना दिले पण, ते पुरेसे नाही झाले त्यांची तहान एवढी होती की सोबत आणलेले सर्व पाणी खूपच कमी पडले.

             आसपास कोठे ही पाण्याची सोय नव्हती. त्यांनी मला फोन केला व पुरेसा कोरडा खाऊ, मुलांसाठी दूध, पिण्याचे पाणी घेवून पटकन येण्यास विनंती केली. सांगितले प्रमाणे वेळेत सर्व साहित्य सोबत घेवून ते थांबलेल्या ठिकाणी पोहचलो.  प्रत्येकाची भूक आणि तहान एवढी जास्त होती की अक्षरशः दोन दोन बॉटल पाणी त्यांनी घश्याखाली घालवले, काही जणांनी पाण्यामध्ये बिस्कीट बुडवून खाल्ली. हे सर्व मी पाहत होतो आणि त्यांच्याशी बोलत होतो. परंतु माझ्याकडे त्यांनी मान वर करून पाहिलं ही नाही एवढी प्रचंड भुकेची आग त्यांच्या पोटात असावी. 

            जेवणाची विचारपूस केली असता त्यांच्या पैकी एक तरुण ‘सनतकुमार महिलाग ‘ म्हणाला “अब पेट भर गया है। खाना आने में देर लगेगी ओर हमें आगे भी जाना है, थोड़ा आटा है हमारे पास। आप ने जो दिया वही बहुत है।”..

             हमें खाना नाही, गाव जाना हे साहब। मी त्याचा मोबाईल नंबर घेतला आणि नक्की मदत करेन असे आधार शब्द बोललो. माझ्या जवळील माझ्यासाठी असावी म्हणून आणलेली एक पाण्याची बॉटल मी एका वृध्द महिलेला दिली. झालेल्या खावूच्या रिकाम्या पॅकेट चा कचरा एकत्र गोळा करून ते कुटुंब सामानाची सावरासावर करून मार्गस्थ ही झाले. आणि मी… निशब्द त्यांना पाठमोरी पाहत राहिलो अगदी भावनिक होऊन.

           साताराकडे जाताना त्यांच्या जेवणाची सोय व्हावी. या हेतूने परिवर्तन संस्थेचे किशोर ढगे दादा आणि सचेतना फाऊंडेशनचे उमेश चव्हाण यांना मदती साठी फोन केला. सचेतना फाऊंडेशनचे उमेश चव्हाण यांनी सनतकुमार यास फोन केला. तेव्हा समजले की पोलिसांनी त्यांना आणि त्यांच्या अजून काही सहकाऱ्यांना (जवळपास ७० लोक) ट्रेन कॅन्सल असलेमुळे सुव्यवस्थित पणे गाडी करून पुन्हा मागे मलकापूरमध्ये त्यांच्या राहत्या ठिकाणी पोहचवले. त्यामुळे किशोर दादानी जेवणाची सोय करू नये, असे मी त्यांना कळवले.

         आमच्या ग्रुपच्या सीमाताई घार्गे यांनी याबाबत पुढाकार घेवून त्यांच्या जेवणाची सोय केली. मी, खुशी नाईक ताई आणि सचेतनचे उमेश दादा यांनी मलकापूर नगर पंचायत आणि ग्रामसेवक यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना घरी छत्तीसगढला जाण्याची सोय करण्याबद्दल विनंती केली, त्यांनी ही त्यांचे संपूर्ण सहकार्य दिले. 

          सनतकुमार मला वारंवार फोश करून रडत रडत सांगे की साहब हमें घर जाना है, किरपा करो हमें यह कोई ठीक से नहीं बता रहा और कोई ठीक से बात भी नहीं करता. मी त्यांच्याशी संवाद साधून त्यांचे मनोबल स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करत राहिलो.

   आज सकाळी सनतकुमारने मला फोन केला आणि सांगितले की मलकापूर नगरपंचायत मधून एक व्यक्तीने त्यांना आज बसची व्यवस्था होईल म्हणून सांगितले आणि आम्ही सर्व त्यासाठी एकत्र जमलो आहोत. आम्हाला सातारापर्यंत जाण्यासाठी बस सुध्दा आलेल्या आहेत.

             मी आभारी आहे, मलकापूरचे तलाठी सचिन निकम यांचा ज्यांनी कर्तव्याला प्रथम प्राधान्य दिले. त्यांनी उलट पक्षी उमेश दादांंचे आभार मानले की सनतकुमार आणि कुटुंबाची त्यांना माहिती दिल्याबद्दल मी आभारी आहे. सचिन निकम यांचे योगदान मोलाचे होते, त्यांच्याच पुढाकाराने हे होऊ शकले. वरील सर्व लोकांनी ज्यांनी माणुसकीचे योगदान दिले.

           सनतकुमार जेव्हा रेल्वेमध्ये बसला, तेव्हा त्यांने फोन करून सांगितले. सनतकुमार जेव्हा बिलासपूर येथे पोहोचला, तेव्हा त्याने फोन करून आभार मानले.

उदय कदमकराड

सदस्य समाजसेवक ग्रुप

संबंधित लेख

लोकप्रिय