Friday, April 26, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडप्लॅस्टिक कारवाईबाबत व्यापाऱ्यांना विश्वासात घ्या - आमदार महेश लांडगे

प्लॅस्टिक कारवाईबाबत व्यापाऱ्यांना विश्वासात घ्या – आमदार महेश लांडगे

– महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन

पिंपरी चिंचवड : प्लॅस्टिक कॅरी बॅग बंदीच्या कारवाईबाबत व्यापाऱ्यांना विश्वासात घेवून निर्णय घ्यावा. मनमानीपणे दंड आकारणी करून व्यापारी-प्रशासन अशी वादाची परिस्थिती करू नका, असे आवाहन भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांनी केले आहे. याबाबत महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले आहे.

निवेदनात आमदार लांडगे यांनी म्हटले आहे की, पर्यावरण रक्षण आणि स्वच्छ भारत अभियानाची अंमलबजावणी करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासन निश्चितपणाने चांगले काम करीत आहे. शहरातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने प्रशासनाची भूमिका स्वागतार्ह आहे. प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर दैनंदिन व्यापार आणि व्यवहारात बंद करावा, हा निर्णय सार्वजनिक लोकहितातच आहे. मात्र, त्यासाठी व्यापारी आणि व्यावसायिकांना विश्वासात घेवून कारवाईची भूमिका घ्यावी.

गेल्या काही दिवसांपासून शहरात प्लॅस्टिक कॅरी बॅग वापरणाऱ्या व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे व्यापारी आणि प्रशासनातील कर्मचारी यांच्यामध्ये वादाचे प्रसंग घडत आहेत. प्रशासन अन्यायकारकपणे कारवाई करीत आहे, असा संदेश जनमानसात जात आहे. महापालिका प्रशासनाने प्लॅस्टिक विरोधी पथक तयार केले आहे. त्याद्वारे एकाच दुकानात १० ते १५ अधिकारी अचानक धाड टाकतात आणि कॅरी बॅगची तपासणी करतात. व्यापाऱ्यांशी आणि दुकानातील कर्मचाऱ्यांशी अरेरावीने बोलतात, अशा तक्रारी पुढे येत आहेत, असेही आमदार लांडगे यांनी म्हटले आहे.

प्लॅस्टिक कॅरी बॅग उत्पादकांवरच कारवाई करा – लांडगे

प्लॅस्टिक बॅग बंदीची आणि त्याची अंमलबजणीची प्रशासनाची भूमिका योग्य आणि नियमाला धरून असली, तरी शहरातील व्यापारी आणि दुकानदार यांच्याकडून २ ते ५ हजार रुपयांपर्यंत दंड आकारणी केली जाते. कोविड काळात आणि लॉकडाउनच्या काळात व्यापारी, व्यावसायिक, छोटे दुकानदार यांची आर्थिक घडी विस्कळीत झाली होती. दोन वर्षांनंतर आता व्यवहार सुरळीत सुरू आहेत. अशा परिस्थितीत कॅरी बॅग वापरावरून आर्थिक अवास्तव दंड आकारणी योग्य होणार नाही. याउलट, शहरातील व्यापारी आणि संबंधित संघटनांचे पदाधिकारी यांची विशेष बैठक घ्यावी. क्षेत्रीय कार्यालयनिहाय प्लॅस्टिक कॅरी बॅग वापराच्या बंदीबाबत जनजागृती करावी आणि विशेष म्हणजे, ज्या ठिकाणी अशा प्लॉस्टिक कॅरी बॅग उत्पादीत केल्या जातात. त्या उत्पादनावरच बंदी आणावी. कॅरी बॅग उत्पादनच बंद झाले, तर लोकांनी वापर करण्याचा प्रश्नच येणार नाही. दुसरीकडे, शहरात कापडी बॅग वापरावर जनजागृती करावी. तसेच, दुकानदार, व्यावसायिकांनी कापडी बॅग विक्री बंधनकारक करावी, अशी आग्रही मागणीही आमदार लांडगे यांनी केली आहे.

संपादन – क्रांतिकुमार कडुलकर

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय