नवी दिल्ली : काँग्रेसची भारत जोडो यात्रा राहुल गांधी यांच्या नेतृत्वात कन्याकुमारी येथून सुरु झाली आहे. या यात्रेत काँग्रेसचे अनेक मोठे नेते सहभागी होत आहे. या यात्रेचा आजचा हा चौथा दिवस आहे. काँग्रेसच्या ‘भारत जोडो यात्रे’वर भाजपने टीका करायला सुरू केली आहे.
काँग्रेसच्या भारत जोडो यात्रे दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी घातलेल्या टी-शर्टच्या (Rahul Gandhi T-shirt) किंमती वरून भाजपने राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. भाजपने एका बाजूला राहुल गांधी यांचा पांढऱ्या टी-शर्टवरचा फोटो आणि दुसऱ्या बाजूला तशाच्या टी-शर्टची 41,257 किंमत असलेला फोटो शेअर करत ‘भारत देखो’ म्हणत भारत जोडो यात्रेची खिल्ली उडवली आहे.
भाजपच्या या टीकेला आता काँग्रेसनेही प्रत्युत्तर दिलं आहे. काँग्रेसने ट्वीट करत “अरे… तुम्ही घाबरलात का? भारत जोडो यात्रेत जमलेली गर्दी पाहून. मुद्दावर बोला, बेरोजगारी आणि महागाईवर बोला. बाकी कपड्यांवर चर्चा करायची असेल तर ही चर्चा मोदीजींच्या 10 लाखांचा सूट आणि 1.5 लाखांच्या चष्म्यापर्यंत जाईल, बोला करायची आहे का?” असं प्रत्युत्तर काँग्रेसने दिले आहे.