पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : गणपती बाप्पाला अर्पण केलेली फुले, हार, बेल, नारळ, दुर्वा, रुई, नैवेद्य, अगरबत्तीचे खोके नारळाच्या करवट्या, सजावटीचे मखर आदी निर्माल्य आपण नदी, विहिरी, तलावामध्ये विसर्जन केल्यास महानगरातील जलस्रोत प्रदूषित करतात. त्यामुळे गणेशोत्सवामध्ये आम्ही निर्माल्य संकलन करून पर्यावरण रक्षणाचा संकल्प केला आहे. आमची टीम गेले काही वर्षे सायकल वारी चे उपक्रम राबवून जनतेमध्ये प्लास्टिक मुक्त परिसर निर्माल्य कंपोस्टिंगचा उपक्रम राबवत आहे, असे दिघी येथील सुप्रसिद्ध सायकल पटू व पर्यावरण अभ्यासक दत्ता घुले यांनी निर्माल्य तुमचे, संकलन आमचे उपक्रमाची माहिती देताना सांगितले. Collecting Nirmalya to preserve the water resources of the metropolis – Cyclist Datta Ghule
या उपक्रमात विविध शालेय विद्यार्थी सामील झाले आहेत. दिघी येथे घरोघरी, गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांकडून कलशामध्ये निर्माल्य संकलित करून ते कंपोस्टिंग करणाऱ्या संस्थांकडे पाठवले जात आहे. प्रदूषणमुक्त नदी, ओढे-नाले, तलाव, विहिरी ही निसर्ग संपदा आपण जपली पाहिजे.
आज पर्यंत विविध समाजिक विषयांची जनजागृती सायकल प्रवासातून पुणे, सोलापूर, पंढरपूर, मुंबई, शिर्डी, नाशिक, राळेगणसिध्दी, अलिबाग, शिवनेरी आदि महाराष्ट्रातील प्रमुख ठिकाणी जनजागृती यशस्वी पूर्ण केली आहे. मंजूरीबाई विदयालय, आर्मी पब्लिक स्कुल, दिघी आदी शाळेतील विद्यार्थ्यांनी निर्माल्य संकलन मोहिमेत सामील झाले आहेत.