Friday, May 10, 2024
Homeआरोग्यकोरोनाकोरोनाच्या काळात माणूसकीचा हात देणाऱ्या पूर्णेतील तरूणांची कहाणी

कोरोनाच्या काळात माणूसकीचा हात देणाऱ्या पूर्णेतील तरूणांची कहाणी

पूर्णा (प्रतिनिधी):-

       25 मार्चला कोरोना विषाणूच्या धर्तीवर संपूर्ण भारतात लॉक डाउन करण्यात आला. आणि तिथून सुरु झाला गरीब कष्टकरी जनतेच्या हाल अपेष्टांचा प्रवास. कष्टकरी जनता ज्यांचे हातावर पोट आहे, ज्यांना आज कमावले तरच आज जेवण्याची हमी असते अशा कुटुंबांनी आता काय करायचे हा प्रश्न आ वासून उभा झाला. या कष्टकरी वर्गाकडे बचत म्हणायला काहीच नसतं, तरी पदरमोड करून जे काही ठेवलेलं असतं ते 2-4 दिवसातच संपून जातं. अशात पुढे काय असा प्रश्न पडला असता भारतातील वेगवेगळ्या राज्यातील विविध सामाजिक संस्था, स्वयंसेवी संस्था आणि व्यक्ती पुढे येऊन अशा कष्टकरी गरजू व्यक्तींना मदत करण्यासाठी पूढे आले.

      परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील असेच काही तरुण एकत्र येऊन त्यांनी माणुसकीची साथ समूह पूर्णा स्थापून त्यांच्या कार्याला सुरुवात केली. विद्यार्थी लढ्यात सक्रिय राहिलेले आणि आता डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडियाचे जिल्हा सचिव तसेच राज्य कमिटी सदस्य नसीर शेख यांनी पुढाकार घेऊन मार्च महिन्याच्या शेवटी अशा गरजू लोकांना मदतीसाठी धान्य वाटपाची संकल्पना मांडली. त्यांच्यासोबत त्यांचे बालमित्र व वर्गमित्र अनिल मगरे, तसेच एक कृतिशील व नाविन्यपूर्ण कल्पकता असलेला तरुण मित्र भूषण भुजबळ होता! या तिघांनी मिळून बामसेफ या चळवळीत सक्रिय असलेले भीमा वाव्हळे यांना संपर्क साधला व आपली कल्पना मांडली त्यांनी सुद्धा आधीपासून असे काहीतरी नियोजन करून ठेवले होते ते सुद्धा या मोहिमेत सामील झाले. पूर्ण शहरातील प्रसिद्ध व्यक्तिमत्व व सामाजिक-राजकीय क्षेत्रात कृतिशील असलेले त्यांचे मित्र साहेबराव सोनवणे हे सुद्धा या मोहिमेत सहभागी झाले. इतर मित्रांमध्ये सचिन नरनवरे, संदीप साबणे, चंद्रकांत खंदारे, नितेश जोंधळे, अजय खंदारे, तुषार मोगले, महेंद्र खरे, स्वप्नील जमधाडे, अनिल नरवाडे, कुंदन ठाकूर, शुभम गायकवाड, प्रशांत भालेराव, अभय वावळे, अल्लाबक्ष आणि अनुरथ पुंडगे इत्यादींनी आपापल्या संघटना, विचारधारा व मतभेद बाजूला सारून या मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला.

     25 तारखेला लॉक डाउन सुरु झाले आणि पुढच्या 2/3 दिवसातच त्याचे परिणाम दिसायला लागले. हातावर पोट असणारे लोक त्रस्त व्हायला लागले. अशात पूर्णेच्या तरुणांनी एकत्र येत माणुसकीची साथ समूह स्थापन करून त्या गरजू लोकांच्या घरापर्यंत जाऊन अन्नधान्य वाटपाला सुरुवात केली. या कामासाठी लागणारे धान्य नक्कीच सहज उपलब्ध होणारे नव्हते.  या समूहातील बरेच तरुण हे विद्यार्थी व बेरोजगार आहेत. धान्य उपलब्ध होण्यासाठी या तरुणांनी सुरुवातीला स्वतः 100, 200, 500 रुपये जमा केले तसेच त्यांनी आपल्या संपर्कात असलेल्या मित्र, शिक्षक, शेजारी यांना आर्थिक मदतीची विनंती केली त्यासाठी त्यांनी अकाउंट डिटेल्स सुद्धा उपलब्ध करून दिले.

     आश्चर्य वाटण्यासारखी गोष्ट आहे या तरुणांवर मागील 2 महिन्यात जवळपास 200 लोकांनी विश्वास दाखवत जवळपास 150000 रुपयांची आर्थिक मदत व धान्य स्वरूपाची मदत केली ज्यामध्ये परभणीतील ग्राम स्वराज फाउंडेशन या NGO (25800 रु) चा सुद्धा समावेश आहे. बऱ्याच मित्रांनी त्यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करीत गरजू लोकांना मदत व्हावी म्हणून माणुसकीची साथ समूहाला आर्थिक तसेच स्वरूपाची मदत केली, काही जनांनी पुण्यतिथीचा कार्यकतं न घेता या समूहाला वाटपासाठी धान्य खरेदी करून दिले. माणुसकीची साथ समूहाला ज्यांनी विविध प्रकारे मदत केली त्यात, विद्यार्थी, शिक्षक, सैनिक, गृहिणी, डॉक्टर्स व इतर आरोग्य विभागातील कर्मचारी,रिक्षा चालक, व्यावसायिक, विविध क्षेत्रातील कामगार व कर्मचारी या सर्व विभागातील लोक आहेत.

       मागील दोन महिन्यात 4 ते 5(संचार बंदीचा काळ) दिवसांचा गॅप सोडला तर या समूहाने आजवर जवळपास 1800 कुटुंबांना धान्य पुरविले. या धान्यात त्यांनी 3 किलो तांदूळ, अर्धा किलो तूरडाळ, अर्धा किलो मीठ आणि एक 10 रुपयांची साबण यांचा समावेश आहे. सुरुवातीला काही दिवस 200 मि.ली. खाद्यतेलाचा सुद्धा त्यांनी प्रयोग केला पण जास्त लोकांपर्यंत धान्य पोचवायचे असेल तर काही खर्च कमी करता यावा म्हणून त्यांनी तेल वाटपात कपात केली.

      नसीर शेख यांच्याशी आम्ही संपर्क साधला असता ते म्हणाले,” माणुसकीच्या या काळात ज्यांनी ज्यांनी शक्य ती मदत करून माणुसकीची साथ समूहाला मदत केली त्या सर्वांचे व माणुसकीची साथ समूहातील प्रत्येक व्यक्तीने जे योगदान दिले त्यांचे तसेच त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्यावर जो विश्वास दाखवून त्यांना या कार्यात योगदान देण्यास पाठबळ दिले त्या सर्वांचे मनःपूर्वक आभार!

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय